Sign In New user? Start here.

 

 

 
 
 
 
 
 

माझी जाहिरातबाजी भाग - १

 

अदिती मोहिले

आत्तापर्यंत तुम्ही मला अदिती मोहिले, झगमग ची creative director या नावाने ओळखता. पण हा blog आहे १८ वर्ष आधीचा. इतक्या पूर्वीही मी तितकीच जाहिरातींनी झपाटलेले होते. किंबहुना जाहिरातींनी मला झपाटलेलं होतं. सांगायचा मुद्दा हा आहे की यातले बरेचसे products आपण आजही आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की या products ची marketing strategy, जाहिरातीचा गाभा अजूनही बर्याच अंशी तोच आहे. Fascinating .. Isn't it ?

मी काहीही फेरफार नं करता हे तसच्या तसं इथे type करतेय.. काश त्या काळी माझ्याकडे computer असता type करायला.. ;)
असो, नमनाला घडाभर तेल.
साल: १९९४
नाव: अदिती चौघुले

तुम्ही अ.र. चौघुले या Great लेखिकेला ओळखता की नाही? हो हो. बरोबर. मीच ती. खरं तर स्वतःची स्तुती अशी स्वतःच्याच तोंडाने मी करायला नको. पण त्याचं काय आहे, मी जर हे तुम्हाला नाही सांगितलं, तर माझ्याशिवाय हे कोणीच सांगायची शक्यता नाही म्हणून जरा विनय बाजूला ठेऊन सांगतेय.

आता जरा माझ्या दिनचर्येकडे वळू. माझी सकाळ भल्या पहाटे ६.३० ला होते. मात्र आज मी सकाळी आळोखे पिळोखे देत उठले तर घड्याळात ८ वर काटा वाकुल्या दाखवत होता. 'आई मला उठवलं का नाही' माझा तक्रारीचा सूर. तेवढ्यात मला आठवला की कालच आपण 'curl on' या नव्या mattress वर झोपलो तर लवकर जाग कुठून येणार? स्वतःलाच दोष देत मी बेसीन च्या दिशेने निघाले तर दात एकदम स्वच्छ. अरेच्च्या! दातात कुठेच किडे उर्फ किटाणू दिसत नाहीत.

मग लक्षात आला, की काल आपण pepsodent ने दात घासले. 'Pepsodent सारी रात किटानोंसे लडता रहेता हैं'. पण मग मनात एक शंका आली, अरे pepsodent तर आज जन्माला आली आणि माणूस नावाचा प्राणी जन्मून तर जमाना लोटलाय. मग या पूर्वीचे लोक तोंडातले किडे खात होते की काय! तरीच ते एवढे तंदुरुस्त. म्हणजे या तंदुरुस्तीचे कारण हे किडेच की काय? असेल असेल. मग आपणही त्यांच्यासारखेच किडे खाऊन तंदुरुस्त व्हायला काय हरकत आहे? जाऊदे, जमाना बदलला, आपणही बदलू आणि pepsodent लावू.

फ्रेश झाल्यावर किचन च्या दिशेने आईकडे चहाची एक order ठोकून दिली. तर थोड्यावेळाने आई उडत उडतच चहा घेऊन आली. आईला उडताना बघून मी तर अगदी च्याट पडले. तेवढ्यात चहाचा गोडवा गळ्यात आणून तेवढ्याच लाडीकपणे आई म्हणाली, 'सकाळी हा घोटभर टाटा टी काय प्यायले आणि मी उडायलाच लागले. तू पण हा घोटभर चहा पी आणि मग बघ कसं हलकं हलकं वाटतं ते. पण उडण्याची कल्पना नं आवडण्यापेक्षा निदान माझ्यासाठी ते शक्य नसल्याने मी तिथून काढता पाय घेतला.

चहा नं प्यायल्याने सकाळ कशी निरुत्साही वाटत होती. अंघोळ करून तरतरीतपणा वाटेल म्हणून बाथरूम च्या दिशेने निघाले. जाऊन बघते तर साबण गायब. मी काही बोलायच्या आतच मगासच्याच उत्साहाने आईने माझ्या हातात फिल्मी सितारोंका Lux साबण दिला. आता सगळेच जर असे Lux वापरून सुंदर दिसायला लागले तर आपल्या माधुरी, जुही चे कसे होणार. पण आपली मुलगी सुंदर दिसावी, चार चौघांमध्ये जरा उठून दिसावी असं कुठल्याही माउलीला वाटणे साहजिकच आहे. मी मुकाट्याने त्या सौंदर्य उजळावणा-या साबणाने अंघोळ केली आणि बाहेर येऊन आपलं रूप किती लखलखतंय हे आरशात बघितलं तर सौंदर्याची जागा तारुण्यपिटिकानी घेतली होती. पण यासाठी मी मुळीच tension घेतलं नाही. म्हणजे मला कुठे party ला जायचं नव्हतं म्हणून नव्हे तर माझ्याकडे Ultra Clearsil होतं नं. पाच दिवसातच माझी कांती पूर्वीसारखी झळकणार होती.

हा विचार मी करते तोवरच फोन ची रिंग वाजली. हा फोन माझ्या मैत्रीणीचाच. उचलण्यापूर्वी एक क्षणभर मी त्या फोनकडे पाहिलं. नं जाणो, फोन चं रुपांतर एखाद्या निवडूंगामध्ये झालं असतं तर मी बाबांकडे BPL ची मागणी केली असती. पण तसं काहीच नाही घडलं. सकाळची ही वेळ म्हणजे मी आणि माझ्या मैत्रिणीची आज college ला जाताना कोणत्या colorचा ड्रेस घालायचा हे ठरतं. तर ती म्हणाली, आज तर white बाबा. Theme selection day ! मला कळेना white आणि theme selection चा काय संबंध? पण मग तिने माझ्या ज्ञानात भर पाडली की ५०१ साबणाने धुतलेले स्वच्च पांढरे कपडे घातले की बस्स!

तर ५०१ ने धुतलेले स्वच्छ पांढरे कपडे घालून मी college ला गेले तर एक सनसनाटी बातमी ऐकायला मिळाली, की आमच्या group मधल्या एका मुलाचं जमलं. तुम्ही म्हणाल यात सनसनाटी वगैरे काय आहे. झालं असं की ती ponds powder लावायची आणि याला मागे फिर फिर फिरवायची. मग शेवटी हा जेंव्हा finally धीर करून विचारायला गेला तर त्याचा घसाच बसला. आजूबाजूच्या जीवष्य कन्ठष्य मित्रांनी लगेच त्याला strepsil पुरवली. आता strepsil खाऊन हीच आपल्याला विचारणार ही त्याची अटकळ. एक strepsil झाली दुसरी झाली तरी याचं आपलं खोकणं चालूच. त्या strepsil चा त्याच्या खोकल्यावर परिणाम होईना आणि तिच्यावरही.. शेवटी वैतागून आणि पायातली चप्पल हातात घेऊन ती खेकसली, 'म्हता-या थांबवतोस तुझं खोकणं की जाऊ मी निघून'? नशीब की तिला लगेच त्याने पानपसंद दिली म्हणून. लगेच मिठाळून आणि चप्पल टाकून त्याऐवजी त्याचा हात हातात घेऊन ती त्याला म्हणाली, 'dear, थांबव ना रे खोकणं..बघ हं, नाहीतर मी निघून जाईन कशी'.. तो बेशुद्धच पडायचा काय तो राहिला होता. तुम्ही म्हणाल काय ही थापा मारतेय. पण खरच हो, अगदी खरं. या जाहिरातींच्या युगात काहीही म्हणजे अक्षरशः काहीही होऊ शकतं.

तर, हे सगळं प्रेम-प्रकरण कळल्यावर आम्ही सगळे क्लास मध्ये गेलो तर सर आमची जणू वाटच बघत होते. आज campaign साठी theme select करून घ्यायचा शेवटचा दिवस होता ना! आणि मी अजून मगासच्याच प्रकरणात अडकून बसले होते. खूप डोकं चालवलं तरी काही सुचेना. ५०१ ने धुतलेल्या कपड्यांचा पण no effect. तेवढ्यात माझी tube पेटली आणि कॅन्टीन मधून एक 5star घेऊन आले. ते खाल्लं आणि माझी creativity अशी काही दौडायला लागली की theme select होऊनच थांबली.

College सुटल्यावर खुशीखुशीतच बसमध्ये चढले. ५ मिनिटातच traffic jam . त्यात शिवाय भर म्हणून भर ऑक्टोबर मधला मुंबई चा कोण उकाडा. चला, आता दारात पाय ठेवल्याबरोबर आई तोफ डागाळणार. तशी मी अगदीच बुद्धू नाहीये. पानपसंदचा प्रयोग मी यापूर्वी आईवर केलाय म्हणजे तोफ्याचे रुपांतर at least फटाक्यात होईल पण असल्या गोष्टी आमच्या नशिबात कुठल्या? ओके, तर बस ही अशी अडकलेली. अचानक कुठूनतरी एका छोट्या मुलाने त्याच्या bagpack मधून ग्लुकॉन D काढून ड्रायव्हरला प्यायला दिलं आणि अहो आश्चर्य! बस अशी काही सटकली की माझा stop येईपर्यंत कळलंच नाही.

घरी येते तर आमच्याकडे वेगळाच scene चालू होता. माझा लहान भाऊ बाबांना विचारात होता, 'बाबा, तुमचं आईवर खरं प्रेम आहे का हो?' बाsssपरे! आमच्या काळी नव्हती हो टाप, असले प्रश्न बाबांना विचारायची. तशी मी फार पुराण काळातली वगैरे नाहीये पण असलं काही विचारायची हिम्मत मात्र नक्कीच नव्हती. तर, बाबांनी गोंधळून जाऊन आईकडे आणि आईने डोळे वटारून माझ्या चोम्ब्ड्या भावाकडे पाहिलं. आईला total ignore मारून तो पुढे म्हणतो कसं, ' बाबा, तुमचं आईवर मुळीच प्रेम नाहीये. जर असतं तर आपल्याकडे Hawkins का Prestige का नाही? जो बिवी से करे प्यार, वो Prestige से कैसे करे इन्कार? एका तांदूळ शिजवणाऱ्या बापड्या cooker ने एका मुलाच्या मनात एवढी डाळ शिजवली असेल अशी त्या बापड्या cooker ने तरी कल्पना केली असेल का?

पण बाकी काहीही म्हणा, आपल्या सुखसोयींसाठी (?) हे जाहिरातदार किती झटतात नाही? खरं तर आता सुखकर्ता दुखहर्ता म्हणून गणपतीला आळवायची काहीच गरज नाहीये. कारण आपल्या सगळ्या गरजा हे manufacturer आणि advertisers पुरवतात. आपण फक्त ही विविध products वापरायची duty आमरण करत राहायची. आमरण अशासाठी की अगदी बाळ जन्माला आल्यावर त्याची मालिश डाबर लाल तेल किंवा Johnson & Johnson baby oil ने करण्यापासून ते तो अगदी पार्ले G खाऊन तंदुरुस्त म्हातारा होईपर्यंत सगळ्या stages या manufacturer आणि advertisers च्या मदतीने पार पाडतो.

लिफ्ट बिघडली तर जिने चढायला आजोबांना त्रास होऊ नये म्हणून आमच्याकडे डाबर च्यवनप्राश आहे आणि तरीही तळवे दुखले तर आजोबांच्या दिमतीला आजीबरोबर कैलाश जीवनही आहे.

केलेला अभ्यास लक्षात राहावा म्हणून माझ्या भावाला आई वैद्यनाथ चं शंखपुष्पी syrupही देते आणि योग्य वाढीसाठी दुधात घालून complan ही देते. शिवाय शेजारच्या मुलाच्या खोकल्याचा त्याच्यावर काही परिणाम होऊ नये म्हणून डाबर च्यवनप्राश तैनातीला असतंच. मोलकरीण आली नाही तर भांडी घासायला Vim बार ही आहे आणि स्वस्तात liquid soap हवा असेल तर Vim Micro देखील आहे. पार्टीला जायचं आणि शेजारच्या tommy ने तुमचं ड्रेस खराब केला तर आमच्याकडे विडिओकॉन वाशिंग मशीन ही आहे आणि सामोसा खाताना डाग पडले तर त्यासाठी surf excel ही आहे.

Healthy and tasty breakfast fast हवा असेल तर आमच्याकडे kellogg's cornflakes ही आहेत आणि ५ मिनिटात भूक भागवायला maggie noodles ही आहेत. कमी तेलातले डोसे खायचे असतील तर आमच्याकडे निर्लेपचा तवाही आहे आणि केलेले पदार्थ ताजे ठेवण्यासाठी real value vacuumizer सुद्धा आहे. Interview ला जाताना माझी ताई दूध जैसी सफेदी साठी निरमा ने धुतलेले कपडे ही घालते आणि to be on safer side, impression मारायला ponds पावडर ही लावते. शिवाय अधून मधून गोरं दिसायची लहर आली तर fair & lovely , १५ मिनिटांमध्ये उजळण्यासाठी फेम bleach यांसारखी क्रीम्स तैनातीला असतातच.

माझ्यामते वेगवेगळ्या जाहिरातींचा आपल्या रोजच्या घडामोडींवर किती परिणाम होतो हे सांगायला सध्या एवढे पुरे. खरं तर यात बिचा-या जाहिरातदारांचा तरी काय दोष हो? कारण या जगात ओरडणा-यांची करवंदे खपतात पण गप्प बसणा-यांची द्राक्षे सुद्धा खपत नाहीत. मग आपली करवंदे ही द्राक्षा इतकीच चांगली आहेत हे जगाला नको का पटवून द्यायला! मी हे का म्हणतेय हे तुमच्या लक्षात आलं असेलच. नाही? अहो, मगासपासून मी आमच्याकडे असलेल्या products ची आणि पर्यायाने माझी जाहिरातच तर करतेय.
क्रमश:

अदिती मोहिले ( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. )
क्रिएटीव्ह डिरेक्टर
सातेरी सॉफ्टवेअर प्रा.लि.