Sign In New user? Start here.

पुण्यात रंगणार ‘दिल दोस्ती दुनियादारीचा’ ‘थ्री डी रॉक कॉन्सर्ट’

zagmag

 
 
zagmag

पुण्यात रंगणार ‘दिल दोस्ती दुनियादारीचा’ ‘थ्री डी रॉक कॉन्सर्ट’

‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ असं म्हणत मैत्रीचा नवा फंडा सांगणारी मंडळी म्हणजे झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील दोस्तांची गॅंग. वेगवेगळ्या कारणाने मुंबई शहरात आलेले आणि इथल्या जगण्याला आपल्या पद्धतीने समजून घेत स्ट्रगलचाही आनंद घेत एकाच फ्लॅटमध्ये राहणा-या सुजय, कैवल्य, आशुतोष, अॅना, मीनल आणि रेश्मा या सहा दोस्तांची कथा सध्या सर्वच स्तरांत तुफान लोकप्रिय झाली आहे. आजच्या पिढीचे प्रश्न, त्यांच्या गरजा, त्यांची मानसिक स्थिती, त्यांची स्पेस, त्यांची आव्हाने हे सगळं या मालिकेतून अतिशय रंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात येतं. या वेगळेपणामुळेच अल्पावधीतच ही सारी पात्रं केवळ लोकप्रियच झाली नाही तर ती जणू प्रेक्षकांच्या परिवाराचा आणि दोस्तांच्या कटट्याचाही भाग बनली आहेत.

अशा या धम्माल मित्र मंडळींना भेटण्याची संधी आता कॉलेजमधल्या त्यांच्या फॅन्सना मिळणार आहे एका धम्माल रॉक कॉन्सर्टच्या माध्यमातून. येत्या 30 जुलै रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंचमध्ये संध्याकाळी ५.३० वा. हा ‘थ्री डी रॉक कॉन्सर्ट’ रंगणार आहे. यासाठी केवळ महाविद्यालयातील विद्यार्थांना नि:शुल्क प्रवेश मिळणार असून प्रवेशासाठी कार्यक्रमाचा पास आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र आवश्यक असणार आहे.विषयाचं नाविन्य, नव्या दमाचे फ्रेश कलाकार, आजच्या तरूणाईचे प्रश्न आणि आजच्या संदर्भाची गोष्ट यामुळे ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या झी मराठीवरील मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. लोकांमध्ये या सर्वच पात्रांबद्दल जिव्हाळ्याची भावनाही निर्माण झाली आहे. यातील प्रत्येक पात्रामध्ये प्रेक्षक स्वतःचा आणि आपल्या मित्रांचा शोध घेतात अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही विविध माध्यमांतून वाहिनीला आणि कलाकारांना मिळतच असतात.

प्रेक्षकांच्या मनात या पात्रांविषयी असलेली उत्सुकता, त्यांना भेटण्याची असलेली ओढ लक्षात घेऊनच त्यांच्यापर्यंत थेट पोहचण्यासाठी या खास रॉक कॉन्सर्टचं आयोजन झी मराठीच्या वतीने करण्यात आलं आहे. या रॉक कॉन्सर्टमध्ये झी मराठीवरील सारेगमपच्या मागच्या पर्वाची विजेती ठरलेली जुईली जोगळेकर आणि सहका-यांचा ‘अगम्य बॅंड’ आपल्या सुरांच्या आणि वाद्यांच्या तालावर प्रेक्षकांना थिरकायला लावणार आहे. याशिवाय त्यांना साथ मिळणार आहे ते दिल दोस्ती मधील सहाही दोस्तांची. सुजय, कैवल्य, आशुतोष, अॅना, मीनल आणि रेश्मा हे सहाही दोस्त या कॉन्सर्टमध्ये सहभागी होणार असून यामध्ये ते काय परफॉर्म करतील हा प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. तत्पूर्वी शहरातील विविध महाविद्यालयांना ही टीम भेट देणार असून तिकडच्या कॉलेज कटट्यांवर ते विद्यार्थ्यांशी गप्पाही मारणार आहेत. आजच्या तरूणाईची गोष्ट त्यांच्याच भाषेत मांडणारी ही मालिका युथफुल असली तरी ती सर्वच गटातल्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय, हे विशेष. नात्यांच्या पलिकडची मैत्रीची ही गोष्ट ‘दिल दोस्ती दुनियादारी’ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त झी मराठीवर प्रसारित होते.