Sign In New user? Start here.

"इफ्फी" मध्ये मराठीतील १० उत्तम चित्रकृतींचा समावेश

 
 
zagmag

"इफ्फी" मध्ये मराठीतील १० उत्तम चित्रकृतींचा समावेश

यंदाच्या ४५व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ महोत्सव गोवा येथे २० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.या महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांची निवड नुकतीच करण्यात आली. महोत्सवाचे उद्घाटन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. परेश मोकाशी यांच्या 'ऐलिझाबेथ एकादशी' या सिनेमाने यंदाच्या या महोत्सवाची सुरुवात होणार आहे.

'इंडियन पॅनोरमा' विभागात भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये तयार होणाऱ्या उत्कृष्ट चित्रपटांचा यात समावेश करण्यात येतो. या विभागात यावर्षी १८१ नामांकनांपैकी परीक्षकांनी फिचर फिल्म विभागात एकूण २६ चित्रपटांची निवड केली असून नॉन फिचर फिल्म विभागात १५ चित्रपटांची निवड केली आहे.परीक्षकांनी निवड केलेल्या या फिचर फिल्म विभागात ७ मराठी, ७ मल्याळम, ५ बंगाली, २ हिंदी तर आसामी, कन्नड, खासी, ओडिया आणि तमिळ या भाषेतील प्रत्येकी एका सिनेमाची यात निवड करण्यात आली आहे तर नॉन नॉन फिचर फिल्म विभागात मराठीतील ३ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. एकंदरीतच मराठीतील १० उत्तम चित्रकृतींचा समावेश यंदाच्या या महोत्सवात करण्यात आला असून मराठी सिनेसृष्टीसाठी ही खरोखरच कौतुकाची बाब आहे.

मराठी सिनेमांनी चांगलीच उभारी घेतली असून फिचर फिल्म्स विभागात श्रीहरी साठे दिग्दर्शित 'एक हजाराची नोट', समृद्धी पोरे दिग्दर्शित 'डॉ. प्रकाश बाबा आमटे: द रिअल हिरो, महेश लिमये दिग्दर्शित राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झालेला 'यलो', ओम राऊत दिग्दर्शित 'लोकमान्य एक युगपुरुष ', परेश मोकाशी दिग्दर्शित 'ऐलिझाबेथ एकादशी', अविनाश अरुण दिग्दर्शित 'किल्ला' आणि राजेंद्र तलक दिग्दर्शित 'अ रेनी डे' या सात सिनेमाची निवड करण्यात आली आहे तर नॉन फिचर फिल्म्स विभागात रवि जाधव दिग्दर्शित 'मित्रा', विजू माने दिग्दर्शित 'एक होता काऊ' आणि प्रसन्ना पोंडे दिग्दर्शित 'विठ्या' या तीन मराठी सिनेमाचा समावेश या विभागात करण्यात आला आहे.