Sign In New user? Start here.

शब्द सुरांनी रंगली आशा भोसले संगीत रजनी

 
 
zagmag

शब्द सुरांनी रंगली आशा भोसले संगीत रजनी

प्रदिर्घ काळापासून रसिकांच्या मनावर आपल्या स्वरांनी अधिराज्या गाजविण्या-या आशा भोसले यांनी ८ सप्टेंबरला ८१ व्या वर्षात पदार्पण केले. यंदाच्या ८१ व्या वाढदिवसाला अविस्मरणीय रूप प्राप्त व्हावे यासाठी ‘पीपल्स आर्टस सेंटर’ च्या वतीने गोपुकुमार पिल्लई यांच्या अध्यक्षतेखाली षण्मुखानंद सभागृहात ‘आशा भोसले लाइव्ह शो’ हा अजरामर गाण्यांचा रंगारंग सोहळा जल्लोषात पार पाडला.

अशाताईंनी आपल्या वैविध्यपूर्ण गायनशैलीव्दारे रसिक प्रेक्षकांवर आपल्या गायनाची मोहिनी घातली आहे. त्यांच्या असंख्य गीतांमधली ‘रात बाकी’ , निगाहे मिलाने को, चुरालियाअ हे, पिया तू अब तो आजा, आज जाने की जिद्द ना करो, ढल गया दिन ह्या बहारदार गाण्यांच्या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांकडून मनमुराद दाद मिळाली. कार्यक्रमाच्या सादरीकरणात आशाताईंना गायक सुदेश भोसले यांची सुरेल साथ लाभली. गेल्या वर्षी दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात अशाताईंनी मराठी गीतांचे सादरीकरण केले होते. अशा संगीत रंजनीमध्ये रसिक श्रोत्यांना हिंदीतील एव्हरग्रीन गाण्यांचा आस्वाद घेण्याचे भाग्य लाभले. या वयात देखील अशाताईंचा उत्साह तरूणांना लाजवेल असा आहे.

या कार्यक्रमात केरळच्या कारागीरांनी खास त्यांच्या शैलीत बनविलेल्या स्मृतीचिन्हाचे आशाताईंना सन्मानित करण्यात आले. नक्षीदार कलाकुसर केलेली पारंपारिक समई असे स्मृतीचिन्हाचे स्वरूप आहे. साडेतीन फुटाच्या या समईत ९ थर असून प्रत्येक थराला ९ ज्योती अशा एकूण ८१ ज्योतीची वैशिष्ट्यपूर्ण समई आहे. यावेळी आशा भोसले यांच्या कारकिर्दीचा आढाव घेणा-या स्मरणीकेचे प्रकाशन करण्यात आले. गाण्यांचे सादरीकरण करताना आशाताईंनी आपल्या गाठीशी असलेल्या अनुभवाला व जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक जुन्या कालाकारांचे किस्से आपल्या खुमासदार शैलीत सांगितले. आशा भोसले यांची ही संगीत रजनी प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरली.