Sign In New user? Start here.

चित्रपट क्षेत्राचे चौफेर ज्ञान घेवूनच या क्षेत्रात पाऊल टाकावे- आशुतोष गोवारीकर

 
 
zagmag

चित्रपट क्षेत्राचे चौफेर ज्ञान घेवूनच या क्षेत्रात पाऊल टाकावे- आशुतोष गोवारीकर

आशयघन विषयांद्वारे हाताळत वेगळ्या धाटणीचे सिनेमेसुद्धा व्यावसायिकरित्या यशस्वी करून दाखवत आशुतोष गोवारीकर यांनी बॉलिवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी त्यांचा दिग्दर्शनाचा आजवरचा प्रवास उलगडताना चित्रपट क्षेत्राचे चौफेर ज्ञान घेवूनच या क्षेत्रात पाऊल टाकावे असा मोलाचा अनुभवी सल्ला चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना दिला. डॉ. व्ही शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टच्या सिने कल्चरल सेंटरच्या वतीने युवा व प्रस्थापित चित्रकर्मींसाठी आयोजित परिसंवादात आशुतोष गोवारीकर यांनी चित्रकर्मींशी मनमोकळा संवाद साधला.

चित्रपट क्षेत्रात करिअर करताना अवांतर वाचन, इंडस्ट्रीबद्दलचे सखोल ज्ञान महत्त्वाचे असल्याचे सांगत, जीवनात आलेल्या चढ-उतारांना सामोरं जाण्यासाठी ‘फोकस’ असणे ही अत्यावश्यक असल्याचा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला. फिल्म स्कूलचं शिक्षण ही आवर्जून घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

चित्रपट दिग्दर्शनाचा आरंभ ते इंडस्ट्रीतील सद्य:परिस्थितीचा आढावा गोवारीकर यांनी घेतला. कारकिर्दीतल्या वेगवेळ्या टप्प्यांबद्दल सांगत असतानाच कलाकाराचे वलय व कथानक या दोन्ही गोष्टीही चित्रपटासाठी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी चित्रकर्मींना सांगितले. 'लगान', 'स्वदेस' आणि 'जोधा अकबर' या चित्रपटांविषयीचा प्रवास सांगतानाच आपल्या आगामी प्रोजेक्ट 'मोहंजोंदडो' या चित्रपटाच्या गमतीजमती ही यानिमित्ताने त्यांनी शेअर केल्या. श्री. किरण शांताराम यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करताना, या उपक्रमामुळे चित्रपटसृष्टीतले बारकावे अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत होईल असे सांगितले.

चित्रकर्मींनी ही आशुतोष गोवारीकर यांचा प्रवास जाणून घेत आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरंही आशुतोष गोवारीकर यांच्याकडून जाणून घेतली. हा उपक्रम आणि त्यातून मिळणारा अनुभव नक्कीच समृद्ध करणारा असून या उपक्रमामुळे चित्रकर्मीना भविष्यात नक्कीच फायदा होईल असा विश्वास ही श्री. किरण शांताराम यांनी याप्रसंगी व्यक्त केला.