Sign In New user? Start here.

 
 
zagmag

अवकाळी पडलेल्या पावसाने शेतक-यांसह चित्रपटसृष्टीपर्यंत अनेकांचे नुकसान

हिवाळ्यात पावसाळा की, उन्हाळ्यालाच मिळाली सुट्टी? अशी संभ्रमवस्था निर्माण करून मुसळधार कोसळणा-या अवकाळी पावसाने सगळ्यांची तारांबळ उडवली. अनेक मराठी चित्रपटांचे फेब्रुवारी अखेर व मार्च या दरम्यान चित्रीकरण सुरू असल्याने या अवकाळी पावसाने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून चित्रीकरणाच्या तारखादेखील पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. त्यामुळे दिग्दर्शक व निर्मात्यांचा एकच गोंधळ उडाला आहे.

हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहुल लागली म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी आणि दिवाळीची सुट्टी नजरेसमोर ठेऊन अनेक चित्रपटांचे काम सुरू असते. अशातच पुणे व पुणे जिल्हा परिसरात अनेक चित्रीकरण सुरू आहे. अशा अवकाळी पडलेल्या पावसाने शेतक-यांसह चित्रपटसृष्टीपर्य़ंत अनेकांचे नुकसान झाले आहे. मुळातच बजेट कमी असणा-या मराठी चित्रपटसृष्टीवर असे संकट कोसळल्याने निर्माते सगळीकडूनच अडचणीत सापडले आहेत.रेडीमिक्स या आगामी चित्रपटाचे इनडॊअर शुटींग असल्याने त्यांच्या सेटचे फारसे नुकसान झाले नसले तरी आऊट डोअर शुटींग सेट चे फार नुकसान झाले आहे. चित्रपटासाठी अपेक्षित वातावरण, ठिकाण म्हणून निवडलेली जागा आणि सेट याचे अवकाळी पावसाने फार नुकसान झाले. चित्रीकरण ठप्प पडले आणि त्यामुळे कलाकारांच्या व्यग्रतेतून पुन्हा नव्या तारखा मिळविण्याची चिंता निर्माता दिग्दर्शकांना लागली. त्यामुळॆ त्यांच्यावर आर्थिक व मानसिक ताण एकाचवेळी कोसळल्याची व्यथा निर्मात्यांनी यावेळी व्यक्त केली.

आगामी चित्रपट जाउंद्या ना बाळासाहेबचे कार्यकारी निर्माते वैद्य म्हणाले, आमच्या चित्रपटाचे प्रामुख्याने चित्रीकरण शेतातले घर अशा ठिकाणावर आहे. पंरतु या अवकाळी पावसाने तेथे गुडघाभर चिखल साचला आहे. तो वाळायला साधारण अजूण ३-४ दिवस तरी लागतील असे स्थानिक लोक सांगत आहेत. आम्हाला ऒसाड रान अपेक्षित असल्याने आता चित्रीकरण १० दिवसांसाठी बंद करावे लागत आहे. त्यामुळे आता कलाकारांच्या पुढच्या ठरलेल्या कार्यक्रमांमधून पुन्हा तारखा मिळवाव्या लागणार. आमच्या कॅमेरामनचे लगेच दक्षिणेत चित्रीकरण होते. पंरतु आमचे सर्व चित्रीकरण पुढे सरकल्याने त्यांचेही नुकसाने झाले आहे. आता सगळी पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार. याचा मानसिक ताण तर आहेच त्याचबरोबर सुमारे १० ते १५ लाख रूपयांचा आर्थिक फटकाही बसला आहे. त्यामुळे वैयक्तीक नुकसानही बरेच होते.

प्रविण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद या आगामी चित्रपटाचे कार्यकारी निर्माते विवेक वाघ म्हणाले हल्ली वातावरणाचा काही अंदाजच येत नाही. अशा अवकाळी पावसाने ठरलेल्या दिवशीचे चित्रीकरण करता आले नाही. यामुळे तारखा पुढे टकलाव्या लागल्या. कलाकारांच्या व्यस्त कार्यक्रमातून तारखा मिळविणे जिकरीचे होत आहे. चित्रीकरण लांबले, कामाचा ताण वाढला त्यात प्रोजेक्ट वेळेत पुर्ण करणॆ आवश्यक आहे. त्यामुळे फार धावपळ होत आहे.