Sign In New user? Start here.

शेतकरी आणि पाण्याच्या प्रश्नाचा वेध म्युझिक व्हिडिओतून!!

 
 
zagmag

शेतकरी आणि पाण्याच्या प्रश्नाचा वेध म्युझिक व्हिडिओतून!!

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि पाण्याचा प्रश्न अनेक चित्रपटांतून मांडण्यात आला असला, तरी या विषयाचं वास्तव म्युझिक व्हिडिओतून मांडण्याचा वेगळा प्रयत्न करण्यात आला आहे. नृत्य दिग्दर्शक अमित बाईंग यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी 'तुटलेत सारे आधार जन्म सारा झाला बेजार' हा म्युझिक व्हिडिओ तयार केला आहे. टाइम्स म्युझिकतर्फे काल मातृदिनाचे औचित्य साधून रविवार ८ मे रोजी रवींद्र नाट्यमंदिर, मिनी थिएटर, प्रभादेवी येथे प्रदर्शित करण्यात आला याप्रसंगी दिग्दर्शक अजय फणसेकर, अभिनेत्री वीणा जामकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती.

साहेब बिवी और गँगस्टर, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा, आगामी लालबागची राणी, चीटर अशा चित्रपटांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम केलेल्या अमित बाईंग यांनी या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केलं आहे.डॉ. सुरेखा सुहानी यांनी गीतलेखन आणि गाण्याची निर्मिती केली आहे. विवेक नाईक आणि सुहास सावंत यांनी गाणं गायलं आहे. श्रेयस आंगणे यांनी संगीत दिग्दर्शन केलं असून, दोन चारोळ्याही लिहिल्या आहे. प्रख्यात कवी सौमित्र यांनी या म्युझिक व्हिडिओसाठी चारोळ्यांना आवाज दिला आहे.शेतकऱ्यांच्या समस्या, पाण्याचा प्रश्न अनेक चित्रपट, माहितीपटातून मांडण्यात आला आहे. मात्र, हा संवेदनशील विषय म्युझिक व्हिडिओतून मांडण्याचा हा बहुधा पहिलाच प्रयत्न आहे. विषयाचं गांभीर्य पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ करताना कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवलेला नाही. विदर्भ, मराठवाड्यातलं भीषण वास्तव समोर यावं, या विचारानं तिथेच जाऊन याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

अमित बाईंग यांनी या अनोख्या कलाकृतीविषयी माहिती दिली. 'डॉ. सुरेखा सुहानी यांनी त्यांनी लिहिलेलं गाणं दाखवलं. त्यातली संवेदनशीलता जाणवल्यानं त्याचा म्युझिक व्हिडिओ करण्याची कल्पना सुचली. त्याचं चित्रीकरण नैसर्गिक पद्धतीनं केलं आहे. विदर्भ, मराठवाड्यात खूप भयानक परिस्थिती आहे. आपण ती समजून घेतली पाहिजे. कवी सौमित्र यांनी सादर केलेल्या चारोळ्यांमुळे या कलाकृतीचा आशय गडद झाला आहे.''पाण्याचा प्रश्न सुटल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील. त्यामुळे निसर्ग संवर्धन करणं, पाण्याचा जपून वापर करणं ही आपली जबाबदारी आहे हे सांगण्याचा प्रयत्न या म्युझिक व्हिडिओतून केला आहे. हा संदेश केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर पूर्ण देशासाठी आणि जगासाठी आहे,' असंही त्यांनी सांगितलं.