Sign In New user? Start here.

रिले सिंगिंग द्वारे 'अंगार' चित्रपटाचे प्रमोशन

 
 
zagmag

रिले सिंगिंग द्वारे 'अंगार' चित्रपटाचे प्रमोशन

'रिले सिंगिंग'च्या माध्यमातून 'गिनीज बुक'मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करू पाहणारा 'अंगार' हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रतज्ञ डॉ. तात्या लहाने यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत एखादे गाणे 'रिले सिंगिंग' ने म्हणण्याची ही पहिलीच वेळ आहे. 'रिले सिंगिंग' या प्रकारात एकापेक्षा अधिक गायक एकत्र येऊन गाणं गातात. एकाच सूरात, लयीत गाताना गाण्यातील एक शब्द फक्त एक गायक गातो. आणि त्यापुढे अनेक गायक आपापल्या आवाजात ते गाणे पूर्ण करतात. 'रिले सिंगिंग' मध्ये यापूर्वी २००६ मध्ये युनायटेड किंगडम मधील जॉन बॅल स्कुलमध्ये २८८ विद्यार्थ्यांनी एकत्र येत गाणं गाऊन जागतिक विक्रम केला होता. त्याचप्रमाणे २०१४ मध्ये राजस्थानमधील संतोष रुंगटा इन्स्टिट्यूट, मध्येही असा विक्रम करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र 'अंगार' द्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत 'रिले सिंगिंग' पहिल्यांदाच होत आहे. विशेष म्हणजे असा धाडसी प्रयोग मराठी चित्रपटात होणार असल्याने त्याबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

'अंगार'चे निर्माते -दिग्दर्शक विराग मधूमालती वानखडे यांनी हा प्रयोग यशस्वी करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. 'रिले सिंगिंग'च्या प्रयोगाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी विराग प्रयत्नात आहेत. त्यांनी नेहमीच स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. नेत्रदान मोहिमेसाठी त्यांनी १०० दिवस डोळ्यांवर पट्टी बांधण्याचा देखील विक्रमी उपक्रम केला होता. "गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अब तोडेगा इंडिया" या रियालिटी शोच्या माध्यमातून १५५ तबला वादकांसोबत सातत्याने दीड मिनिटं एकाच सूरात तबला वादनाचा विक्रम त्यांनी केला आहे. या तबला वादनाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याने आता रिले सिंगिंग देखील यशस्वी होईल असा त्यांना ठाम विश्वास आहे.

या उपक्रमासाठी सध्या मुंबईत ऑडिशन्स सुरु आहेत. आतापर्यंत ५०० उत्स्फूर्त स्पर्धकांनी या उपक्रमासाठी ऑडिशन्स दिल्या आहे. मुंबईत होत असलेल्या आणि पुणे नाशिक सोबत मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात होणाऱ्या ऑडिशन्स मधून निवडक ३०० गायक या कलाकृतीचे साक्षीदार होणार आहेत. 'चक दे' प्रॉडक्शन निर्मित 'डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन' या मराठी चित्रपटाचे विराग निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. "काळोखाला भेदून टाकू... जीवनाला उजळून टाकू" या गाण्यावर आधारित हे 'रिले सिंगिंग' होणार आहे. एकूण १०८ शब्दांचं असलेलं हे गाणं ३०० गायक एकाच लयीत-सूरात गाणार आहेत. डॉ. तात्या लहाने... या चित्रपटातील हे मूळ गीत विराग यांनी शब्दबद्ध केलं असून सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्या साथीने त्यांनी हे ड्युएट सॉंग गायलं आहे. 'एक हिंदुस्थानी' या संगीतकाराने हे गाणं कंपोझ केले आहे. 'रिले सिंगिंग'चा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापर करणं हा भारतीय चित्रपट सृष्टीत पहिलाच प्रयोग असल्याने सगळ्यांचं लक्ष 'डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन' या चित्रपटाकडे लागले आहे. या गाण्याच्या माध्यमातून डॉ लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना वाहिली आहे. त्यांचे समाजकार्य जगातील कानाकोपऱ्यात पोहोचावे या उद्धेशाने हा चित्रपट तयार करण्यात आल्याचे निर्माते-दिग्दर्शक विराग यांनी सांगितले. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.