Sign In New user? Start here.

गीतरामायणाचा खास हीरकमहोत्सवी सोहळ्यास हजारो रसिकांच्या उपस्थितीत प्रारंभ

 
 
zagmag

गीतरामायणाचा खास हीरकमहोत्सवी सोहळ्यास हजारो रसिकांच्या उपस्थितीत प्रारंभ

पुणे: महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव म्हणून घराघरात लोकप्रिय झालेल्या 'गीतरामायणा'स यंदाच्या रामनवमीस साठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भारतीय शिक्षण मंडळ ( प. महाराष्ट्र ), संतोष पोतदार इव्हेंट्स ( पुणे ), आणि पर्पल इव्हेंट्स (मुंबई ) यांच्यातर्फे गरवारे महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या गीतरामायणाचा खास हीरकमहोत्सवी सोहळ्यास आजपासून हजारो रसिकांच्या उपस्थितीत शानदार प्रारंभ झाला.

'गदिमा' आणि बाबूजी उर्फ सुधीर फडके यांच्या गीतरामायणाच्या 'टीम' मध्ये अगदी प्रथमपासून सहभागी असलेले ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे, बाबूजींचे चिरंजीव आणि गायक व संगीतकार श्रीधर फडके, गदिमांचे चिरंजीव श्रीधर माडगुळकर, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्याचा शुभारंभ झाला. याप्रसंगी पृथ्वी एडिफीसचे अभय केले, निरामय वेलनेसचे योगेश आणि अमृता चांदोरकर संतोष पोतदार, धनंजय कुलकर्णी व भारतीय शिक्षण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. हीरकमहोत्सवी रामायणाचा भाग-२ शुक्रवार दि २७ मार्च रोजी संपन्न होईल यामध्ये हिंदी गीत रामायणाची पाच गीते सादर होतील व श्रीधर फडकर मराठी गीत रामायणातील दहा गीते सादर करतील.

याप्रसंगी श्रीधर माडगुळकर यांनी 'गीत रामायणाच्या आठवणी जागवताना,गीतरामायणाचा पहिला कार्यक्रम आपल्या व्रतबंधनानिमित्त 'पंचवटी' या गदिमांच्या घरी स्वत: गदिमा आणि बाबूजींच्या उपस्थितीत झाला व तो ऐकायला रस्त्यावर शेकडो लोक जमले होते असे सांगितले तसेच गीतरामायणाच्या सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त श्रीधर फडके यांचा गीतरामायणाचा पहिला कार्यक्रम गदिमांच्या 'माडगुळे' या गावी झाल्याचा योगायोगही त्यांनी सांगितला. महापौर दत्ता धनकवडे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात गीतरामायणामुळे सर्वसामान्य जनतेवर चांगले संस्कार झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विनया देसाई यांनी केले.

तत्पूर्वी गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर आणि प्राजक्ता माडगुळकर यांनी संपादित केलेल्या गदिमांच्या संग्रहित साहित्य असलेल्या 'गदिमा -मेगा -एम-३' या डीव्हीडीचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी गदिमांच्या ज्येष्ठ कन्या वर्षाताई पारखे उपस्थित होत्या . प्रारंभी संस्कृत पंडित सी. भा. दातार यांनी संस्कृतमध्ये अनुवादित केलेली गीतरामायणातील चार गाणी नुपूर देसाई, तन्वी केळकर, मिताली जोशी आणि रोहित गुळवणी या सांगलीच्या बालकलावंतांनी सादर केली. या कार्यक्रमाचे निवेदन दीपक पाटणकर यांनी केले. यावेळी टाळ्यांच्या प्रचंड गजरात श्रोत्यांनी या बालकलावंतांचे कौतुक केले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमात गायक व संगीतकार श्रीधर फडके यांनी, 'स्वये श्री… ' , शरयू तीरावर… ', दशरथा घे हे पायसदान ….'., 'राम जन्मला ग सखे, 'सावळा ग राम …', ज्येष्ठ तुझा पुत्र… ' 'चला राघव … ', 'रामा चरण तुझे… ' , आकाशाशी जडले नाते …'. 'निरोप कसला माझा घेता … ', 'थांब सुमंता … ', 'नकोस नौके परत फिरु… ' गीतरामायणातील गाणी म्हणून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ;यावेळी त्यांना तुषार आंग्रे (तबला ), उद्धव कुंभार ( तालवाद्य), किमया काणे व विनय चेउलकर ( सिंथेसायझर ) यांनी साथसंगत केली. गीतरामायणाचे रसाळ निवेदन धनश्री लेले त्यांनी केले.