Sign In New user? Start here.

ग्लोबल कोकण महोत्सव ३० एप्रिल ते ४ मे दरम्यान गोरेगाव मध्ये

 
 
zagmag

ग्लोबल कोकण महोत्सव ३० एप्रिल ते ४ मे दरम्यान गोरेगाव मध्ये

कोकणातल्या निसर्गाने अवघ्या जगावर मोहिनी घातली आहे. कोकणातला निसर्ग म्हटला कि डोळ्यासमोर येतो तो अथांग निळाशार समुद्र, हिरवाईने नटलेल्या नारळी पोफळीच्या बागा, दाटीवाटीने उभी असलेली आमराई...कोळ्यांच्या जाळयातली फडफडती मासोळी...एवढंच कोकणाच वर्णन नाही करता येणार, तर कोकण त्याच्या पल्याडच अधिक असतो. म्हणूनच कोकणभूमी साऱ्यांना कायमच भारलेली वाटते. कधी तिथल्या सणावाराच्या उत्साहानी भारलेली, तर कधी नमन-खेळे, दशावतारातल्या रंगतदार कथांनी. कोकणातला गौरी गणपती आणि शिमगा तर जगाच्या नकाशावर पोहचला आहे. म्हणूनच कोकणाला आणि कोकणच्या लोककला, संस्कृती, शेती, उद्योग या वैभवाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, त्याला खऱ्या अर्थाने 'ग्लोबल' बनविण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून 'ग्लोबल कोकण ' हा भव्य आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.

यंदाचे 'ग्लोबल कोकण महोत्सवाचे’ पाचवे वर्ष आहे. ३० एप्रिल ते ४ मे या दरम्यान मुंबईत गोरेगाव येथे नेस्को कॉम्प्लेस ग्राउंडवर 'ग्लोबल कोकण महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ३० एप्रिलला सायं. ६.०० वा. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी वित्तमंत्री मा.सुधीरजी मुनगंटीवार, उद्योगमंत्री मा.सुभाषजी देसाई, विरोधी पक्ष नेते मा.राधाकृष्ण विखेपाटील, प्रदेशाध्यक्ष मा.सुनीलजी तटकरे, आ.हितेंद्रजी ठाकूर, आ.जयंतजी पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 'ग्लोबल कोकण महोत्सवाच्या’ उद्घाटन समारोह प्रसंगी कोकणातील शेती, सामाजिक, उद्योग शेत्रात काम करणाऱ्या कोकणवासियांचा 'कोकण आयडॉल' पुरस्काराने सत्कार करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, मंत्री, विरोधीपक्षाचे नेते, कला, नाटय, सिनेमा, उद्योग शेत्रातील अनेक मान्यवर या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

'ग्लोबल कोकण ' महोत्सवाचे अध्यक्ष आ.भाई जगताप, स्वागताध्यक्ष आ.अॅड. आशिष शेलार या महोत्सवात सहभागी असणार आहेत. आ.सुनील प्रभू, आ.किरण पावसकर, माजी खासदार संजीव नाईक, वसई-विरारचे प्रथम महापौर राजीव पाटील, माजी आ.प्रमोद जठार, बाळासाहेब माने, अशी सर्व पक्षीय संयोजन समिती आहे. राज्याचे माजी सचिव द.म.सुकथनकर व अरुण बोंगीरवार हे प्रमुख मार्गदर्शक आहेत.

दि. १ मे रोजी सायं. ६.०० वा. महाराष्ट्र दिनानिमित्त सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार यांनी साकारलेला मराठी गीतांचा कार्यक्रम 'मराठी अभिमान गीत-एक आनंदयात्रा' आयोजित करण्यात येणार आहे. कोकणासाठी काम करणाऱ्या हजारो संस्थांनी एकत्र येऊन कोकण विकासाची संघटीत चळवळ राबवली याकरिता कोकणातील संस्थेचे संमेलन २ मे रोजी सायं. ५.३० वा. आयोजित करण्यात आले आहे. कोकणी लोककला स्पर्धेचे आयोजन दि. ३ व ४ मे रोजी करण्यात आले आहे. तारपा, दशावतार, जाखडी, कोकणी लोककला व लोकनृत्य सादर करणारे नामवंत कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. ४ मे ला पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पर्यटन परिषदेत 'कोकण पर्यटन व्हिजन २०२५’ चं प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करणार आहेत. लाखो कोकणप्रेमी मुंबईकरांनी या महोत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन कार्याध्यक्ष संजय यादवराव यांनी केले आहे.