Sign In New user? Start here.

मी समाजाला काही देत नाही तर समाजाचीच ठेव परत करतोय”, नाना पाटेकर

 
 
zagmag

मी समाजाला काही देत नाही तर समाजाचीच ठेव परत करतोय”, नाना पाटेकर

‘नाम फाउंडेशनच्या वतीने शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक आणि मानसिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने ‘जय जवान, जय किसान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी आपण समाजाला काहीच देत नाही, समाजाचीच ठेव परत देतो. ‘नाम’ चे कार्य ‘पोस्टमन’ सारखे आहे. दात्यांच्या मोठ्या मनामुळेच एवढे कार्य घडू शकले, अशी भावना व्यक्त केली. तसेच या प्रसंगी शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणविषयक अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच येत्या काळात अधिकाधिक तरुणांनी अशा समाजउपयोगी कार्यात सहभागी व्हावे यासाठी नाना पाटेकर स्वतः मकरंद अनासपुरे यांच्यासह कॉलेजांमध्ये जाऊन तरुणाईशी संवाद साधणार असल्याचेदेखील त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात परमवीरचक्र विजेते सुभेदार योगेंद्रसिंह यादव, कर्नल सुहास जतकर, अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित होते.‘जय जवान, जय किसान’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने परमवीरचक्र विजेते सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांनी कारगील युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या अनुभव कथनाने संपूर्ण प्रेक्षागृह भारावून गेले होते.

या प्रसंगी सैनिक कल्याण विभागाचे संचालक निवृत्त कर्नल सुहास जतकर यांनी समाजात असणारे जवानांविषयी असणारे गैरसमज दूर होण्याची गरज असून त्यांना निवृत्तीनंतर समाजात सन्माननीय वागणूक मिळायला हवी अशी आशा व्यक्त केली. नामच्या या उपक्रमामध्ये २० शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतनिधी प्रदान करण्यात आला. हा उपक्रम फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून देशभरातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना या उपक्रमांतर्गत मदतनिधी देण्यात येणार आहे. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी देखील या उपक्रमाद्वारे मदत करण्यात येणार आहे. जवान किती खडतर परिस्थितींमध्ये देशाच्या रक्षणार्थ कार्यरत असतो या पासून आपण पूर्णपणे अनभिज्ञ असतो. आपल्यामागे आपले कुटुंब निराधार नाही, ज्या देशासाठी आपण आपले प्राण पणाला लावतो त्या देशातील नागरिकांचे आपल्या कुटुंबियांकडे लक्ष आहे हा विश्वास जवानांच्या मनात निर्माण व्हावा म्हणून नामने शेतकऱ्यांसह जवानांसाठी काम करण्याचे ठरवले आहे.