Sign In New user? Start here.

 
 
zagmag

ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारादेवी यांचे निधन

ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांचे आज (25 नोव्हेंबर) मंगळवारी पहाटे जसलोक रुग्णालयात निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून सितारा देवी आजारी होत्या. सोमवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. आज जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सितारा देवी यांचे मूळ नाव धनलक्ष्मी होतं. त्यांचा जन्म कोलाकात्यातील नर्तक सुखदेव महारा यांच्या घराण्यात झाला. सितारा देवी 11 वर्षांच्या असताना त्यांचं कुटुंब मुंबईत वास्तव्यास आलं. शंभू महाराज, पं. बिरजू महाराज यांचे वडिल अच्छन महाराज यांच्याकडून त्यांनी नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. सितारादेवी यांना त्यांच्या नृत्य कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सम्मान यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या निधनाने कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे. सितारा देवी यांनी बालपणी काही सिनेमांमध्ये नृत्य केलं होतं. शिवाय काही सिनेमांमध्ये त्यांनी अभिनयसुद्धा केला होता.

शहर का जादू (1934), जजमेंट ऑफ अल्लाह (1935), वतन (1938), मेरी आंखें (1939) होली, पागल, स्वामी (1941), रोटी (1942), चांद (1944), लेख (1949), हलचल (1950) या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. 'मदर इंडिया' या सिनेमात त्यांनी नृत्य केलं होतं.तसेच, 'नगिना', 'रोटी' आणि 'वतन' या सिनेमांसाठी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती.