Sign In New user? Start here.

 
 
zagmag

सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्यासाठी सुमनताई बंग यांना ‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन वयाच्या २० व्या वर्षापासून स्वतःला सर्वोदयी चळवळीत झोकून देणा-या, आचार्य विनोबा भावेंच्या कार्याने समृद्ध झालेल्या वर्धानगरीला स्वतःची कर्मभूमी बनवत समाजसुधारणेचे व्रत जपणा-या ज्येष्ठ समाजसुधारक, लेखिका आणि संपादक सुमनताई बंग यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी यंदाचा झी मराठीचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार’ घोषित झाला आहे. राज्यापासून जगापर्यंत विविध कार्यक्षेत्रात आपल्या कामाचा अभूतपूर्व ठसा उमटविणा-या कर्तृत्ववान महिलांना झी मराठीच्या वतीने ‘उंच माझा झोका पुरस्काराने’ गौरवण्यात येतं. यंदाचे पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. सुमनताईंसह विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणा-या अन्य कर्तृत्वशालिनींचाही सन्मान यावेळी होणार आहे.

स्त्री सक्षमीकरणात मोलाचं योगदान देणा-या गेल्या शतकातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई महादेवराव रानडे यांच्या जीवितकार्यावर आधारित उंच माझा झोका ही मालिका झी मराठीने आणली. या मालिकेने रसिकांना दूरचित्रवाणी - मालिकांबाबतची नवी दृष्टी तर दिलीच, त्याचबरोबर गेल्या शतकातील महाराष्ट्रातल्या स्फूर्तिदायी स्त्रियांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्यासही उद्युक्त केलं. मात्र समाजातील या कर्तृत्वशालिनींच्या कार्याचा हा झोका केवळ मालिकेपुरताच मर्यादित न राखता, आजच्या प्रेक्षकांना कर्तबगार स्त्रियांची, त्यांच्या कार्याची ओळख व्हावी आणि त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी, यासाठी गेल्या वर्षापासून ‘उंच माझा झोका पुरस्कार’ झी मराठीने सुरू केले. या पुरस्कारांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत भरीव कार्य करणा-या कर्तृत्वशालिनींच्या कार्याचा गौरव करण्यात आला.. कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायी कार्याच्या गौरवाची ही परंपरा कायम राखत, झी मराठी वाहिनी या वर्षीही ‘उंच माझा झोका पुरस्कार २०१४’ चे आयोजन करत आहे.

महात्मा गांधीजींच्या ‘नई तालीम’ या शैक्षणिक प्रयोगात्मक शिक्षणावर भर देणा-या ‘महिलाश्रम’ या संस्थेत अध्यापनाचे कार्य करणा-या तसेच सेवाग्राम येथे बुनियादी शिक्षणाचे कार्य पुनर्जिवीत करणा-या सुमनताईंनी ग्रामीण महिलांच्या विकासासाठी भरीव कार्य केलं आहे. आचार्य विनोबाजींच्या भूदान, ग्रामदान, ग्रामस्वराज्य चळवळीत सक्रीय होत त्यांनी हा वारसा पुढे चालू ठेवला. १९७४-७५ मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती चळवळीत महिला संघटनेची जबाबदारी उचलत धडाडीचं नेतृत्व करत प्रसंगी कारावासही भोगला. १९७७ साली ‘चेतना विकास संस्थेच्या’ माध्यमातून सुमनताईंनी महिला आणि बालविकास कार्यक्रमाची जबाबदारी समर्थपणे पेलली. या संस्थेच्या माध्यमातून विविध शिबिरे राबवून गावागावांतून महिलांना सक्षम करण्याचं कार्य सुमनताईंनी केलं. ‘साम्ययोग’ मासिक आणि ‘सखी’ या त्रैमासिकाच्या संपादक म्हणून जबाबदारी उचलत महिलांच्या विविध समस्यांना आणि प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली.

सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणा-या सुमनताईंची दोन्ही मुलेही आज त्याच क्षेत्रात त्यांचा वसा पुढे चालवत आहेत. अशोक बंग आणि डॉ. अभय बंग या मुलांनी आणि स्नुषा राणी बंग यांनी सुमनताईंचा आदर्श पुढे ठेवत आज सामाजिक कार्यात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुमनताईंच्या या भरीव कार्याला आणि सामाजिक योगदानाला सलाम करत झी मराठीने यंदाचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार’ त्यांना जाहीर केला आहे. येत्या २० ऑगस्टला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सुमनताईंना प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर , ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष आणि ज्येष्ठ वैद्यकीय आणि शिक्षणतज्ञ डॉ. स्नेहलता देशमुख या तीन तज्ज्ञांच्या सल्लागार समितीचं मार्गदर्शन या पुरस्कारनिवड प्रक्रियेत झी मराठीला लाभले. समाजकारण, शिक्षण, कला , क्रीडा, पर्यावरण, आरोग्य, विज्ञान, कृषी अशा विविध क्षेत्रांत भरीव आणि प्रेरणादायी कार्य करणा-या कर्तृत्ववान स्त्रियांना ‘झी मराठी - उंच माझा झोका पुरस्कारांनी’ गौरवण्यात येत आहे.