Sign In New user? Start here.

'बॉक्स क्रिकेट लीग' चे आगामी तिसरं पर्व कोल्हापूर मध्ये रंगणार

 
 
zagmag

'बॉक्स क्रिकेट लीग' चे आगामी तिसरं पर्व कोल्हापूर मध्ये रंगणार

‘आयपीएल’ प्रमाणे ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग'ची घौडदौड कायम रहायला हवी, अशा शुभेच्छा देत अभिनेता सचिन पिळगावकर यांनी आगामी तिसऱ्या पर्वात आपलाही सहभाग असेल असं आश्वासन या वेळी दिलं.‘रत्नागिरी टायगर्स‘च्या विजयात ‘आपली काही सेटिंग नव्हती’ अशी कोपरखळी मारत नितेश राणे यांनी जिंकलेल्या संघाचे कौतुक केले. निमित्त होते महाराष्ट्र कलानिधीचे प्रणेते नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’च्या पारितोषिक वितरणाचे.

गेले तीन दिवस पाचगणीत सुरू असलेल्या या मराठी सेलिब्रिटींच्या बॉक्स क्रिकेट लीगचा अंतिम सामना रविवारी पार पडला. यानंतर झालेल्या पारितोषिक समारंभाला श्री. नितेश राणे व अभिनेता सचिन पिळगावकर यांची उपस्थिती लाभली. त्याआधी झालेल्या अंतिम सामन्यात ‘रत्नागिरी टायगर्स‘ या संघाने बाजी मारत ‘शिलेदार ठाणे’ संघाचा पराभव केला.

‘रत्नागिरी टायगर्स‘ संघाने प्रथम फलंदाजी करत ४५ धावा काढल्या. त्याचा पाठलाग करताना ‘शिलेदार ठाणे’ संघाचा डाव ३५ धावांत आटोपला. ‘रत्नागिरी टायगर्सच्या सिध्दार्थ जाधवच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर अंतिम सामन्यात ‘रत्नागिरी टायगर्स‘ने ही विक्रमी धावसंख्या उभारली. सिध्दार्थ जाधव यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार नुपूर दुधवडकर यांना देण्यात आला. या लीगमध्ये सहभागी झालेल्या महिला खेळाडूंचा सत्कार ही यावेळी करण्यात आला. पुष्कर श्रोत्री यांच्या खुमासदार शैलीतल्या सुत्रसंचलनाने सामन्यांची रंगत आणखीनच वाढवली. त्याचप्रमाणे अनेक कलाकारांनी ही सामन्यांसाठी उत्स्फूर्तपणे समालोचनाची जबाबदारी स्वीकारली. प्रत्येक संघाने खिलाडूवृत्तीने हे सामने एन्जॅाय केले. लवकरच या रंगतदार सामन्यांचे प्रक्षेपण झी टॉकीजवर पहायला मिळणार आहे. चिअर लिडर्स व विजेत्या संघाला सामन्यानंतर देण्यात आलेली नृत्याची सलामी, वेळोवेळी प्रत्येक संघांचे वाजवण्यात येणारे थीम साँग याने ही स्पर्धा अधिकाधिक रंगतदार झाली. ‘मराठी 'बॉक्स क्रिकेट लीग' चे आगामी तिसरं पर्व कोल्हापूर मध्ये रंगणार असल्याची घोषणा ही याप्रसंगी करण्यात आली.