Sign In New user? Start here.

 
 
zagmag

`मराठी तारका` टीमने कारगिलमध्ये केले जवानांचे मनोरंजन

गेली सात वर्षे `मराठी तारका` हा कार्यक्रम देश-विदेशात लोकप्रिय आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनातही हा कार्यक्रम सादर झाला होता. त्याचबरोबर शरद पवार, आशा भोसले, अभिनेत्री रेखा, अशा विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी हा कार्यक्रम पाहून त्याचे कौतुक केले आहे. मनोरंजनाबरोबरच सामाजिक भान जपत भारत-पाकिस्तान सीमेवर (बारामुल्ला), सुनामीग्रस्त गावांमध्येही `मराठी तारका`चे शो याआधी सादर झाले आहेत.

भारत-पाकिस्तान सीमेवर 9 हजार फूट उंचीवरील कारगिल येथे अत्यंत खडतर परिस्थितीत देशाचे रक्षण करणा-या जवानांसाठी नुकताच `मराठी तारका`चा शो आयोजित करण्यात आला होता. कारगिलच्या या दुर्गम भागात कार्यक्रमाच्या संपूर्ण पथकाला घेऊन जाणे, हे मोठे आव्हानच. श्रीनगर ते कारगिल या मार्गावर, ढगफुटीमुळे खचलेले रस्ते, ठिकठिकाणी कोसळलेल्या दरडी, आक्सिजनचा अभाव, अशा अनेक आव्हानांना तोंड देत, चौदा तासांचा खडतर प्रवास करीत `मराठी तारका`च्या टीमने कारगिल गाठले. अभिनेत्री भार्गवी चिरमुले, श्वेता शिंदे, तेजा देवकर, प्राची पिसाट, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, राजेश बिडवे, सॅड्रिक डिसूझा, हितेश पाटील, बालनर्तक अदिती घोलप, विशाल जाधव या कलाकारांनी कारगिलमध्ये जवानांसाठी सादर केलेल्या नृत्यांना जवानांनी टाळ्या-शिट्ट्यांनी दाद दिली. कलाकारांबरोबर नाचण्याचा मोह जवानांनाही आवरता आला नाही.

गायक विश्वजीत बोरवणकर यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांमुळे वातावरण भारावून गेले होते. महेश टिळेकर यांनी स्वतःच केलेल्या निवेदनामुळे कार्यक्रमाची खुमारी वाढली. टिळेकर यांनी जवानांशी प्रश्नांच्या रूपातून संवादही साधला. जवानांनी हजरजबाबीपणाने उत्तरे देऊन आणखी धमाल आणली. हितेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन केले.

सीमारेषेवर आपल्या कुटुंबीयांपासून दूर, सीमेवर लढणा-या आणि देशाचं रक्षण करणा-या या जवानांना मराठी तारकांनी राख्या बांधल्या, तेव्हा ते भावूक झाले होते. घरची आठवण झाल्याचे जवानांनी सांगितले. जवानांसाठी खास बनवलेली मिठाई मराठी तारका टीमने त्यांना देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रतिकूल परिस्थिती आणि जवानांची खडतर जीवनशैली प्रत्यक्ष पाहताना टीमच्या सदस्यांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला. प्रत्यक्ष ताबारेषेवर (LOC) तैनात असलेल्या मराठा बटालियनच्या जवानांसोबत `मराठी तारका`च्या टीमने `वंदे मातरम`, `भारतमाता की जय`, `जय भवानी जय शिवाजी`, अशा घोषणा देऊन वातावरण दुमदुमून सोडले.