Sign In New user? Start here.

‘मी आणि शाहीर साबळे’

 
 
zagmag

‘मी आणि शाहीर साबळे’

‘शाहीर साबळे’ प्रत्येक मराठी मनात घर करून राहिलेलं नाव.. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशी साद घालत त्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं.. मराठी लोकगीतं आणि महाराष्ट्राची समृद्ध लोककला त्यांनी सातासमुद्रापार पोहोचवली.. मुक्तनाट्य या नाट्याविष्काराच्या निर्मितीचं श्रेय त्यांनाच जातं.. ‘यमराज्यात एक रात्र’, ‘नशीब फुटक सांधून घ्या’, ‘बापाचा बाप’ अशी त्यांची अनेक प्रहसनं व नाटकं लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली.. ‘आंधळं दळतंय’ सारख्या त्यांच्या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्र हलवून सोडला, मराठी माणसाला त्याच्या न्याय्य हक्कांची जाणीव करून दिली.. ‘शाहीरांचं हे नाटक म्हणजे शिवसेनेच्या प्रसूतीवेदना आहेत’ असे उद्गार प्रमोद नवलकर यांनी त्या काळात काढले होते.. शाहीर साबळे यांनी एकीकडे आपल्या नाटकांमधून समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलं तर दुसरीकडे आपल्या मुलींच्या मदतीने ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या नावाचं व्यासपीठ तरुण कलाकारांना मिळवून दिलं.. मराठी शाहिरी परंपरा आणि लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची कामगिरी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाने केली.. प्रशांत दामले, विजय कदम, भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे, किशोरी शाहणे, संतोष पवार, दिपाली विचारे, अरुण कदम या व अशा अनेक सेलिब्रिटीजनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात हि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमापासूनच केली.. हे व असे अनेक कलाकार शाहिर साबळे यांच्याकडे पाहूनच शिकले.. देशाचे संरक्षण मंत्री असलेले ‘यशवंतराव चव्हाण’ यांनी ‘मोबाईल युनिव्हर्सिटी’ असं बिरूद दिलेल्या शाहिरांनी कधीच कुणाला शिष्य बनवलं नाही पण आज त्यांना गुरु मानणारे अनेक कलाकर महाराष्ट्रभर पसरलेले आहेत.. आणि त्यांच्यापैकीच तिघांनी त्यांच्या या गुरूला गुरुपौर्णिमे प्रीत्यर्थ्य मानवंदना द्यायची ठरवली आहे..

३१ जुलै २०१५, गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर ‘केदार शिंदे’, ‘संतोष पवार’ आणि ‘भरत जाधव’ घेवून येत आहेत, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, ‘महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे’ उर्फ ‘शाहीर साबळे’ यांच्या आठवणी पुन्हा जागवणारा कार्यक्रम ‘मी आणि शाहीर साबळे’.. शाहीर साबळे यांच्या जीवनातील काही महत्वाचे प्रसंग, काही आठवणी, काही किस्से आणि त्यासोबत त्यांच्या प्रसिद्ध लोकगीतांची आणि प्रहसनं व नाटकांतील प्रवेशांची मनोरंजनात्मक मेजवानी सादर करणार आहेत आजचे मराठी सिनेमाचे आघाडीचे दिग्दर्शक व शाहीर साबळे यांचे नातू ‘केदार शिंदे’.. सोबत असतील मराठी रंगमंचावरील नामवंत दिग्दर्शक व कलाकार ‘संतोष पवार’ आणि मराठी नाटक व सिनेमातील सुपरस्टार ‘भरत जाधव’. ज्यांना शाहीर साबळे यांच्या अजरामर गीतांसोबत साथ करतील मराठीतले आघाडीचे गायक : प्रसेनजीत कोसंबी, रोहित राऊत आणि सायली पंकज.

झी मराठी वर प्रसारित झालेल्या ‘झी नाट्य गौरव’ या दिमाखदार सोहळ्यात हीच आदरांजली संक्षिप्त रुपात सादर झाली होती आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.. आता शाहीर साबळे यांच्या कन्या ‘वसुंधरा साबळे’ यांच्या लेखणीतून साकारलेली, ‘बेला शिंदे’ (केदार शिंदे प्रोडक्शन) आणि ‘नरेंद्र फिरोदिया’ (अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट) निर्मित ‘मी आणि शाहीर साबळे’ या कार्यक्रमाच्या रुपात तिच आदरांजली १ तास ४५ मिनिटाच्या दीर्घ स्वरूपात सादर केली जाणार आहे. शाहीर साबळे यांच्यावर नितांत प्रेम करणारी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास हजेरी लावेलच पण त्याच बरोबरीने शाहीर साबळे यांच्या सहवासातील अनेक कलाकार व नाट्य – चित्रपट सृष्टीतील मंडळी आपली विशेष उपस्थिती लावतील यात वादच नाही.. या कार्यक्रमाचे तीन विशेष प्रयोग दिमाखदार स्वरूपात होतील खालील ठिकाणी..

३१ जुलै २०१५ , दुपार ४:३०, गडकरी रंगायतन (ठाणे)

१ ऑगस्ट २०१५ , दुपार ४:३०, विष्णुदास भावे नाट्यगृह (वाशी)

२ ऑगस्ट २०१५ , रात्रो ८:००, शिवाजी मंदिर (दादर)