Sign In New user? Start here.

मिक्ता २०१४मध्ये ‘रेगे’ आणि ‘अस्तु’ला सर्वाधिक नामांकने

 
 
zagmag

मिक्ता २०१४मध्ये ‘रेगे’ आणि ‘अस्तु’ला सर्वाधिक नामांकने

यंदाच्या ‘मराठी इंटरनॅशनल सिनेमा अँड थिएटर अॅवॅार्ड्स’ अर्थात ‘मिक्टा २०१४’ मध्ये ‘रेगे’ आणि ‘अस्तु’ या चित्रपटांमध्ये जबरदस्त स्पर्धा असून दोन्ही चित्रपटांनी सर्वाधिक १० नामांकने मिळवली आहे. या दोन चित्रपटांना ‘फँड्री’ आणि ‘लय भारी’ यांची तगडी टक्कर असून या दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी आठ नामांकने मिळवली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या पाचही महत्त्वाच्या विभागांमध्ये ‘रेगे’ आणि ‘अस्तु’ यांच्यात तुल्यबळ स्पर्धा आहे. ‘फँड्री’लाही सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागात नामांकन जाहीर झाले आहे. नाटक विभागात ‘आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस’ या नाटकांमध्ये चुरस असून त्यांनी सर्वोत्कृष्ट नाटकासहीत प्रत्येकी ७ विभागांत नामांकने मिळवली आहेत.

‘मिक्ता २०१४ चित्रपट व नाट्य महोत्सवा’चा समारोप सोमवारी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मोठ्या थाटात झाला. याप्रसंगी नामांकनांची घोषणा करण्यात आली. ‘मिक्टा’चे महेश मांजरेकर, ‘महाराष्ट्र कलानिधी’चे नितेश राणे, या सिनेनाट्य महोत्सवाचे आयोजक सुधाकर चव्हाण, चंद्रकांत कुलकर्णी, राहुल रानडे हे याप्रसंगी उपस्थित होते. सुनील बर्वे यांनी नाटक विभागाची नामांकने, तर सचिन खेडेकर यांनी चित्रपट विभागाची नामांकने जाहीर केली. मिक्टा २०१४चा पुरस्कार सोहळा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लंडन आणि वेल्स येथे होणार आहे.

चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागात गिरीश कुलकर्णी (पोस्टकार्ड), डॅ. मोहन आगाशे (अस्तु) आणि आलोक राजवाडे

(रमा माधव) यांच्यात चुरस आहे, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागात केतकी माटेगावकर (टाइमपास), इरावती हर्षे (अस्तु) आणि पर्ण पेठे (रमा माधव) यांच्यात स्पर्धा आहे. ‘लय भारी’ या चित्रपटाला परीक्षकांच्या वतीने ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला.

नाटक विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अभिजीत केळकर (लुका छुपी), चिन्मय मांडलेकर (मिस्टर अँड मिसेस) आणि मंगेश कदम (गोष्ट तशी गमतीची) यांच्यात, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागात मधुरा वेलणकर (मिस्टर अँड मिसेस), लीना भागवत (गोष्ट तशी गमतीची) आणि प्रतीक्षा लोणकर (आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे) यांच्यात चुरस आहे. ‘झोपाळा’ या नाटकाला स्पेशल ज्यूरी अॅवॅार्ड घोषित करण्यात आले असून सर्वोत्कृष्ट पुनरुज्जीवित नाटक म्हणून ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकाची निवड झाली आहे.

अन्य घोषित पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये (आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे), प्रकाशयोजना भूषण देसाई (मिस्टर अँड मिसेस), संगीतकार मिथिलेश पाटणकर (आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे) आणि लेखक विरेन (आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे) यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

‘मिक्टा चित्रपट व नाट्य महोत्सवा’चा आगळ्या ढंगात समारोप करताना चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांनी आपल्या आवडीची गाणी गाऊन उपस्थित रसिकांना सुखद भेट दिली. वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, केतकी माटेगावकर, डॉ. महेश पटवर्धन, पंढरीनाथ कांबळे आणि महेश मांजरेकर यांच्या गाण्यांबरोबरच भाऊ कदम, सुप्रिया पाठारे, अंशुमन विचारे, अतुल तोडणकर यांच्या प्रहसनाने समारोपाची संध्याकाळ चांगलीच खुलवली. चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर सुशांत शेलार यांनी आभार प्रदर्शन केले.