Sign In New user? Start here.

 
 
zagmag

बुवाबाजी आणि शोषणाविरूध्द कलेच्या माध्यमातून विवेकाचा जागर

पुणे:  डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने ‘आम्ही सारे दाभोलकर’ असे फलक हाती घेऊन घॊषणा देत या सर्व कृत्याचा विरोध करत आणि मनात कुठे तरी आशा की आता हे सर्व बदलेल असे अंसख्य विचार घेउन ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दिन शाह, रत्ना पाठक शाह, चित्रा पालेकर, लघुपटकार आनंद पटवर्धन, लेखक मकरंद साठे, नागराज मंजुळे यांच्यासारख्या ज्येष्ठांबरोबर नव्या पिढीचे प्रतिनिधी ओंकार गोवर्धन, आलोक राजवाडे, पर्ण पेठे असे अंसख्य कलाकार रस्त्यावर उतरले. विविध परिवर्तनवादी संस्थांच्या वतीने बुधवारी 'निषेध- जागर दिन' पाळण्यात आला.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करतानाच त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी सलग सहा तास नाट्यसाखळीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. दाभोलकर आयुष्यभर ज्या अंधश्रद्धेच्या विरोधात लढले, त्याच्याच विविध रूपांवर ही नाट्ये आधारलेली होती. या नाट्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून ही नाटके तयार करण्यात आली होती. राज्याच्या सर्व भागांतून आलेल्या कलाकारांनी ती सादर केली. प्रत्येक नाटक करणा-याला आणि पाहण्या-यालाही या कलेसोबत आणखी काही ठोस करण्याची आवश्यकता आहे असे प्रत्येकाला वाटत होते.

पुणे शहर आणि जिल्ह्याबरोबरच राज्याच्या विविध भागांतून या ठिकाणी कार्यकर्ते आले होते. प्रवेशद्वारात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या फोटोचा कोलाज आणि आत आल्यावर त्यांचाच फोटो आणि त्याखाली लिहिलेले शब्द- 'तो विचारांची लढाई विचारानेच लढला..' रंगमंच पूर्ण मोकळा होता. मध्यभागी फक्त 'शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर' असे लिहिलेला डॉक्टरांचा हसरा फोटो. डाव्या, उजव्या बाजूला त्यांचे अनेक भाव दर्शवणारी छायाचित्रे, रिंगणच्या कार्यशाळांची छायाचित्रे होती. संपूर्ण हॉल तर भरला होताच; पण बाहेर उभे राहून नाटक ऐकणार्‍यांची संख्याही मोठी होती. सुरुवातीला या 'रिंगण'चे दिग्दर्शक अतुल पेठे यांनी ही नाट्यसाखळी सादर करण्यामागची प्रेरणा व्यक्त केली. लेखक, कार्यकर्ते, निषेध करणारे आणि या कार्याला विरोध करणारे अशा चार घंटा देण्यात आल्या.