Sign In New user? Start here.

 
 
zagmag

तीन दिग्गज कलाकार एकाच रंगमंचावर

ज्येष्ठ कलावंत नसरुद्दीन शहा, ज्योती सुभाष आणि कर्नाटकच्या प्रख्यात गायिका-अभिनेत्री बी. जयश्री हे एकाच रंगमंचावर. पण ते वेगळ्याच कारणांसाठी नाटकासाठी नाही बर का! ज्योती सुभाष आणि नसरूद्दीन शहा हे बी.जयश्री यांच्या बरोबर संवाद साधणार आहेत. आणि बी.जयश्री यांच्या संगीत मैफलीने कार्यक्रमाची सुरवात होणार आहे.पुणेकरांसाठी ही खा-या अर्थाने दर्जेदार कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे.गुरुवारी (ता. 26) रात्री टिळक स्मारक मंदिरात होत असलेला हा मैफल व संवादाचा कार्यक्रम पुणेकर रसिकांना विनामूल्य खुला आहे.

दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष व "नाटक कंपनी‘ ही पुण्यातील अग्रेसर युवा नाट्यसंस्था संयुक्तपणे "दर्शन‘ या नव्या उपक्रमाची सुरवात करणार आहेत. . नाटक, चित्रपट, नृत्य, संगीतादी विविध कलाक्षेत्रांतील दिग्गज प्रतिभावंतांना पुण्यात आमंत्रित करून त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देणे व मार्गदर्शनासाठी त्यांच्याशी प्रकट संवाद साधणे, हे या उपक्रमाचे स्वरूप आहे. आपल्या देशातील समृद्ध कलासंस्कृतीचे पुणेकरांना "दर्शन‘ घडावे, असा यामागे हेतू असल्याचे युवा रंगकर्मी निपुण धर्माधिकारी यांनी आयोजकांच्या वतीने सांगितले.

आपले आजोबा, कन्नड नाट्यचळवळीचे अध्वर्यू गुब्बी विराण्णा यांच्याकडून संगीत व नाट्याचा वारसा लाभलेल्या बी. जयश्रींनी दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्यशाळेतून इब्राहिम अल्काझींकडे आरंभीचे धडे गिरवले. पुढे "स्पंदन‘ या नाट्यसंस्थेची स्थापना करून आपल्या कारकिर्दीबरोबरच नवी कानडी रंगभूमी घडविण्यात मोठा वाटा उचलला. त्यांच्या प्रतिभेचा ठसा रंगभूमीसह कानडी रुपेरी पडद्यावरही उमटला. मोठ्या प्रतिष्ठेच्या "संगीत नाटक अकादमी पुरस्कारा‘शिवाय त्यांना पद्म पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.