Sign In New user? Start here.

बाबा आमटे यांच्या साहित्याचा शोध घेणारा कार्यक्रम ‘करुनोपनिशेद’

 
 
zagmag

बाबा आमटे यांच्या साहित्याचा शोध घेणारा कार्यक्रम ‘करुनोपनिशेद’

ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला मुरलीधर देवीदास आमटे ते बाबा आमटे असं न भूतो न भविष्यती जीवनगाथा लाभलेले बाबा आमटे! त्यांचं काम, त्यांची वृत्ती, त्यांचा आवाका, निश्चय... कशाचीच बरोबरी तुम्हाला- आम्हाला स्वप्नातही न करता येण्यासारखी. अतिशय कष्टांचं, संघर्षाचं, माणूसपण जपणारं समृद्ध आयुष्य जगताना बाबांच्या हळूवार मनानं शब्दांची साथ सोडली नाही. कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन आणि हेमलकसातल्या आदिवासींसाठी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना करण्याचा आणि ते सातत्यानं कार्यरत ठेवणाऱ्या बाबांच्या मनातला साहित्यिक कोपरा सतत जागा होता. रोजच्या आयुष्यातल्या घटनांपासून मानवी वृत्तीच्या वेगवेगळ्या पैलूंपर्यंत मनानं अचूक टिपलेल्या सगळ्या गोष्टी बाबांनी शब्दबद्ध केल्या. बाबांच्या शब्दसंपदेचा, त्यांनी निर्मिलेल्या साहित्याचा अनोखा अनुभव त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या अनोख्या कार्यक्रमात घेतला जाणार आहे. 'करुनोपनिशेद' असे नाव असलेल्या या विशेष कार्यक्रमाची निर्मिती प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या सोकुल प्रॉडक्शनने केली असून श्री. चंद्रकांत काळे यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. २६ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १०.३० या वेळेत हेमलकसा, लोक बिरादरी प्रकल्प इथे हा कार्यक्रम होणार आहे.

यंदाचं वर्ष हे बाबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आणि त्याच्या येणाऱ्या अगणित पिढ्यांना मानवतेचा वसा देणाऱ्या या आधुनिक संतांचं हे जन्मशताब्दी वर्ष त्यांच्या कार्याची, त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची सखोल ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमाद्वारे साजरं केलं जाणार आहे. त्यांची जयंती म्हणजे २५ डिसेंबरपासून तीन दिवसीय सोहळा सुरू होणार असून त्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायकांचे गायन, विविध मान्यवरांच्या मुलाखती या कार्यक्रमात ऐकायला मिळतील. या सोहळ्यातील एक लक्षवेधी कार्यक्म म्हणजे बाबा उवाच. बाबांनी केलेल्या सामाजिक कार्याची ओळख आपल्याला आहे मात्र, त्यांनी अतिशय अनुभवसंपन्न आणि आशयघन साहित्याची निर्मितीही केलेली आहे याची बहुतेकांना माहिती नाही. बाबांच्या साहित्याचा वेध या कार्यक्रमातून घेतला जाईल. बाबांवर प्रेम करणाऱ्या मराठी रसिकांपर्यंत त्यांचं हे साहित्यिक रूप पोहोचवण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या खास कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.

काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या आणि प्रचंड यशस्वी झालेल्या डॉ. प्रकाश बाबा आमटे या सिनेमात सोनाली कुलकर्णी यांनी मंदाकिनी आमटे यांची भूमिका समर्थपणे साकारली होती. या सिनेमाच्या निमित्ताने सोनाली आणि आमटे कुटुंबियांमध्ये अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आणि म्हणूनच बाबांच्या साहित्याचा शोध घेण्याची जबाबदारी घेण्याचा सन्मान त्यांनी सोनाली कुलकर्णी यांच्याकडे दिला. बाबांनी लिहिलेलं काव्य, त्यांचे ग्रंथ यांवर या कार्यक्रमात प्रकाश टाकला जाणार आहे.

सोनाली यांच्या सोकुल प्रॉडक्शनतर्फे 'करुनोपनिशेद' कार्यक्रमाची निर्मिती केली जात असून श्री. चंद्रकांत काळे यांनी त्यांचे दिग्दर्शन केले आहे. कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर बाबांच्या साहित्याचे अभिवाचन करणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन नरेंद्र भिडे यांनी केले आहे, तर गायन प्रसिद्ध गायिका अंजली मराठे आणि चंद्रकात काळे यांचे असेल. हा कार्यक्रम येत्या २६ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १०.३० या हेमलकसा, लोक बिरादरी प्रकल्प इथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.