Sign In New user? Start here.

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे निधन

 
 
zagmag

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अमरापूरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अमरापूरकर यांच्या फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाल्याने गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या मागे पत्नी सुनंदा अमरापूरकर, तीन मुली केतकी जहागिरदार, सायली जातेगावकर आणि रिमा गद्रे आहेत.

सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या करिअरमध्ये 250 हून अधिक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. 'अर्धसत्य', 'सडक', 'हुकूमत', 'आँखे', 'इश्क' हे त्यांचे विशेष गाजलेले सिनेमे आहेत. 11 मे 1950 रोजी अहमदनगर येथे त्यांचा जन्म झाला होता. 'तात्या' या नावाने ते प्रसिद्ध होते. पुणे विद्यापीठातून इतिहास विषयात एमए केल्यावर अमरापूरकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेली अर्धसत्य हा त्यांचा पहिला वहिला हिंदी सिनेमा. विशेष म्हणजे या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून हा पुरस्कार देण्यात आला होता. यानंतर १९९१ मध्ये सडक या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक हा पुरस्कारही त्यांनी पटकावला. याशिवाय इश्क, आंखे, कुली नं १, गुप्त अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. रंगभूमीवरील हँड्स अप या नाटकातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही अमरापूरकर याची विशेष ओळख होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 'जनलोकपाल' मागणीच्या आंदोलनाला त्यांनी जाहिर पाठिंबा दर्शविला होता. तसेच डॉ. नरेद्र दाभोळकर यांची हत्या म्हणजे हे राज्य अराजकतेकडे चालले आहे, असेच समजावे लागेल. आता तरी सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करून त्यांना श्रद्धांजली वाहावी, अशी भूमिका अमरापूरकर यांनी मांडली होती.अमरापूरकर यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.