Sign In New user? Start here.

शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

 
 
zagmag

शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

ताल, घुंगरू, नाद व प्रकाश असा गायन वादन नृत्याचा मिलाफ असणाऱ्या शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सवाचे 14 वे वर्ष शनिवारवाड्याच्या प्रांगणात दिमाखात साजरे झाले. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा आणि ओडिसी नृत्य निपुण झेलम परांजपे यांची 'शिवशंकर' ही नृत्यनाटिका यंदाच्या नृत्य आणि संगीत महोत्सवाचे खास आकर्षण ठरली. महाराष्ट्रातील थोर संतांच्या कथांवर आधारित भरतनाट्यम नृत्य शैलीत समार्चना नृत्यसंस्थेच्या कलावंतांनी सादर केलेला 'संकिर्तन' या विशेष कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.प्रारंभी शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सवाचे पॅट्रन जॅकी श्रॉफ आणि पदाधिकारी सबीना संघवी, प्रभा पटवर्धन, मनीषा साठे, रेखा कृष्णन, पारूल मेहता आणि प्रायोजक झेन्सार कंपनीचे श्री. बाला यांच्या हस्ते या महोत्सवाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. या कलांवतांचा सत्कार जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे तरुण आणि सनी यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नृत्यांगना श्रीमती उमा घोडगे व सहकारी यांनी नृत्याविष्कारातून 'गणेश वंदना' सादर केली. त्यानंतर पुण्यातील समरचना नृत्यसंस्थेच्या सुमारे 11 कलावंतांनी भरतनाट्यम नृत्यशैलीतून संतांच्या कथांवर आधारित 'संकिर्तन' हा अविस्मरणीय नृत्य कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये 13व्या शतकापासून 17 व्या शतकापर्यंतच्या महाराष्ट्रातील संतांच्या शिकवणीवर आधारित बेतलेला भरतनाट्यम दाक्षिणात्य शैलीतील नृत्याविष्कार होता. त्याला महाराष्ट्रीयन संगीताची जोड लाभली होती. यामध्ये संत गोरा कुंभार, जनाबाई, सावता माळी, कान्होपात्रा आदींच्या रचनांवर बेतलेले अभंग आणि किर्तन 'विठ्ठल-विठ्ठल'च्या गजरात सादर झाले. समरचना नृत्यसंस्था ही 15 वर्षांपूर्वी म्हणजे सन् 2000 मध्ये स्थापन झाली असून भरतनाट्यम नृत्यशैलीचा प्रसार हे या संस्थेचे ध्येय आहे. भरतनाट्यमच्या नृत्यगुरू स्व. मीनाक्षी व्यंकटरमन यांच्या प्रेरणेतून गिरीजा व्ही., उमा घोडगे, नमिता मुजुमदार आणि अंजली राजू या ज्येष्ठ नृत्यांगनांनी सफलतेने या संस्थेची वाटचाल चालू ठेवली आहे. त्यांनी सादर केलेल्या 'संकिर्तन' कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला.

मध्यांतरानंतर आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा आणि ओडिसी नृत्य निपुण श्रीमती झेलम परांजपे यांची 'शिवशंकर' ही नृत्यनाटिका यानंतर सादर झाली. यामध्ये प्रथम या दोन्ही प्रख्यात नृत्यांगनांनी शंकराचार्यांचा अर्धनटेश्वर श्लोक सादर केला. त्यानंतर डॉ. संध्या पुरेचा यांनी भरतनाट्यम शैलीतून पार्वती आणि श्रीमती झेलम परांजपे यांनी ओडिसी नृत्यातून शिवाचे एकत्रित सादरीकरण केले. या पाठोपाठ नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा व सहकाऱ्यांनी शिवदर्शनाची अनोखी रुपे सादर केली. त्यामध्ये नीलकंठ शिवा, सतीविवाह, सती देहदहन, गणेश उत्पत्ती आणि गंगा अवतरण हे भरतनाट्यम नृत्यशैलीतून मंचावर सादर केले. यानंतर नृत्यांगना झेलम परांजपे आणि त्यांच्या स्मितालय नृत्यसंस्थेच्या कलाकारांनी क्रोधित शिवा आणि मदन या कथेचा आविष्कार ओडिसी नृत्यातून सादर केला. यामध्ये पार्वती ही हिमालय कन्या उमा हिच्या रुपाने येऊन क्रोधित शिवाच्या हृदयात प्रेमाचा अंकुर फुलवते. शिवाचे तांडव नृत्य, मदन दहन आणि वसंत ऋतूचे आगमन याचे केलेले मनोहारी सादरीकरण अंधाकासुर, महाकाल, कलांतक, मार्कंडेय आणि तिलन्ना यांचे सादरीकरण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेले. यानंतर भरतनाट्यम आणि ओडिसी या दोन्ही नृत्यशैलींतून शिवश्लोक व आरती सादर होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाला संगीत आणि नृत्याबरोबरच अप्रतिम ध्वनीयोजना व प्रकाश योजनाही अनोख्या पद्धतीने करण्यात आली होती. या कार्यक्रमात 30 नृत्य कलावंत व वादक सहभागी झाले होते.