Sign In New user? Start here.

 
 
zagmag

स्पृहा जोशीचा ‘लोपामुद्रा’ वाचकांच्या भेटीला

टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर कुहू, रमाबाई रानडे आणि इशा यांसारख्या लोभस व्यक्तिरेखांमधून रसिकांची मने जिंकणारी स्पृहा जोशी हिच्या व्यक्तिमत्वात आणखी एक पैलू दडला आहे, तो म्हणजे एका संवेदनशील कवयित्रीचा. सर्जनशील लेखनासाठी २००३ साली राष्ट्रपतींचा बालश्री पुरस्कार आणि अक्षरग्रंथ प्रकाशनातर्फे कवी कुसुमाग्रज पुरस्कार पटकावणा-या स्पृहाचा ‘चांदणचुरा’ हा पहिला कवितासंग्रह यापूर्वीच प्रकाशित झाला आहे. त्यानंतर आता ‘लोपामुद्रा’ हा दुसरा कवितासंग्रह येत्या ८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध गीतकार व कवी स्वानंद किरकिरे यांच्या हस्ते होत आहे. ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर आणि कवी अरुण म्हात्रे हे या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत.

लोपामुद्रा ही पुराणातली विदुषी. पण स्पृहाला तिचा आणखी एक अर्थ गवसला - अशी स्त्री, जी समोरच्या व्यक्तीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावते किंवा समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्त्वात आपलं 'असणं'च विरघळवून टाकते. आपली लोप पावलेली, हरवलेली वेगळी मुद्रा विसरून हसत हसत जगत राहाते. आपल्या आसपास कुठेही, कोणातही सापडू शकेल, अशी ही स्त्री... 'लोपामुद्रा'. अशाच, स्त्रीच्या वेगवेगळ्या भावनांचं चित्रण असलेला हा काव्यसंग्रह आहे.

८ ऑगस्ट रोजी माटुंगा येथील कर्नाटक संघ येथे होणा-या प्रकाशन सोहळ्यात प्रकाशनानंतर या कविता संग्रहातील काही कविता तसंच काही ज्येष्ठ कवींच्या निवडक, सुंदर कवितांचे अभिनव सादरीकरण जीतेंद्र जोशी, सुबोध भावे, अमृता सुभाष, वीणा जामकर, मृण्मयी देशपांडे, स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि चिन्मय मांडलेकर अशी नामवंत मंडळी करणार आहेत. तारांगण प्रकाशनातर्फे मंदार जोशी हे हा कवितासंग्रह प्रकाशित करत आहेत. कवितासंग्रहाला ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांची प्रस्तावना लाभली आहे.