Sign In New user? Start here.

 
 
zagmag

लघुपटविषयक चळवळ सुरू करण्याचा मानस: उमेश कुलकर्णी

गेल्या काही वर्षांत युवा चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हे, सातत्‍याने भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील, लघुपट या प्रकाराला पाठिंबा आणि प्रवर्तन देत आले आहेत. त्यांनी आतापर्यंत 8 लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे आणि अनेकांची निर्मिती केली आहे. त्यांच्या या प्रयत्नाला मोठे उत्तेजन म्‍हणजे त्‍यांच्या लघुपट फिल्म क्लबला मिळत असलेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. या व्यासपीठावरून विविध लघुपट निर्माते त्‍यांचे लघुपट सादर करतात. नवीन आणि होतकरू लघुपट निर्मात्‍यांना या प्रकारामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी ते शक्ती आणि प्रोत्साहन पुरविण्यासाठी, गेली 3 वर्षे दरवर्षी ते कार्यशाळेचे आयोजन करतात. वळू, विहीर आणि देऊळ असे आशयसंपन्न चित्रपट करणारे कुलकर्णी लघुपटाच्या तितकेच प्रेमात आहेत आणि लघुपट हा स्वतंत्र प्रकार म्‍हणून रुजविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. चित्रपट निर्मिती सुरू झाल्यापासूनच लघुपट अस्तित्वात आहे आणि जगभरात विविध भागात एक कलाप्रकार म्‍हणून याकडे पाहिले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून एक लघुपटविषयक चळवळ सुरू करण्याचा आणि या प्रकाराविषयीच्या विविध शक्‍यता सहभागींच्या मनामध्ये रुजविण्याचा त्यांचा मानस आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून दिनांक 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर याकाळात पुण्यामध्ये ‘शूट ए शॉर्ट’ ही लघुपट निर्मितीची कार्यशाळा ते आयोजित करणार आहेत. कार्यशाळेमध्ये उमेश कुलकर्णी आणि प्राध्यापक समर नखाते स्वतः मार्गदर्शन करतील. या संदर्भात बोलताना उमेश कुलकर्णी म्हणाले, "डिजीटल तंत्रज्ञान आल्यामुळे चित्रपट बनवणे ही गोष्ट तांत्रिक दृष्ट्या जरी सोपी झाली असली तरी एक कलामाध्यम म्हणून लघुपट तयार करणे ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे. लघुपट निर्मितीसाठी केवळ तांत्रिक कौशल्य पुरेसे नसून लघुपटाची मुलभूत संकल्पना, लघुपटाकडे कला व माध्यम म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन याही बाबी उत्तम कलानिर्मिती साठी आवश्यक असतात."

लघुपट करण्याची इच्छा असणार्यांना या कार्यशाळेत लघुपट निर्मिती प्रक्रियेबाबत सर्वसमावेशक असे मार्गदर्शन केले जाणार आहे. लघुपटाचा संकल्पना ते निर्मिती पर्यंतचा प्रवास, लघुपट निर्मिती साठीची आवश्यक पूर्व तयारी, शुटींगची प्रक्रिया तसेच कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासोबतची कार्यपद्धती, लघुपटाचे संकलन, महत्त्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, चित्रपटनिर्मितीशी निगडीत असलेली इतर कलाक्षेत्र यावर सखोल चर्चा कार्यशाळेत केली जाईल. लघुपट निर्मितीत रस असणाऱ्या १८ वर्षांवरील सर्वांसाठी कार्यशाळा खुली असणार आहे.

फिल्म आणि टेलिव्हीजन इन्स्‍टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये विद्यार्थी म्‍हणून पदविका अभ्‍यासक्रमासाठी ‘गिरणी’ या चित्रपटासाठी उमेश कुलकर्णी यांनी पहिला राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळविला. वळू, विहीर आणि देऊळ अशा यशस्‍वी चित्रपटांनंतरही उमेश यांनी लघुपट बनविणे चालू ठेवले आहे. आजपर्यंत त्‍यांनी दहा लघुपटांचे दिग्‍दर्शन केले आहे, त्‍यातील बहुतांश लघुपटांची निर्मिती एफटीआयआयने केली आहे. ‘थ्री ऑफ अस’ हा उमेश यांच्या लघुपटाचा शुभारंभाचा प्रयोग अतिशय प्रतिष्‍ठित अशा बर्लीनेल इंटरनॅशनल फिल्‍म फेस्‍टिव्हलमध्ये झाला. या चित्रपटाने उमेश यांना सर्वोत्तम दिग्‍दर्शकाचे आणखी एक राष्‍ट्रीय पारितोषिक बहाल केले. ‘थ्री ऑफ अस’ 40 पेक्षा जास्‍त आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवात दाखविला गेला. त्‍यांनी 2008 साली बनविलेल्‍या ‘गारूड’ या लघुपटासाठी मुंबई आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवात सुवर्ण शंख पुरस्‍कार बहाल करण्यात आला. उमेश यांनी क्‍लेरमॉन्ट फेररँड, थाय आंतरराष्‍ट्रीय लघुपट महोत्‍सव आणि केरळ येथील आंतराष्‍ट्रीय माहितीपट आणि लघुपट महोत्‍सव अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्‍सवात ज्‍युरी सदस्‍य म्‍हणूनही स्‍थान भूषविलेले आहे. तसेच ''क्लेरमो फेरौ'' तर्फे त्यांच्या लघुपटांचे विशेष सादरीकरण करण्यात आले होते.

कार्यशाळेबाबत अधिक माहितीकरीता This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेलवर संपर्क साधावा.