Sign In New user? Start here.

 
 
zagmag

राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांना जाहीर

व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ सिनेछायाचित्रकार सूर्यकांत लवंदे यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांना जाहीर करण्यात आले. हे महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येतात.व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना, तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री विद्या बालन यांना घोषित झाला आहे.

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीच्या उत्कर्षासाठी आयुष्य वेचलेल्या आणि आपल्या कारकिर्दीचा ठसा उमटविलेल्या कलाकार, तंत्रज्ञ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी पाच लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी तीन लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा ३० एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पुणे येथील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्यासह या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कोर्ट, किल्ला, मित्रा, ख्वाडा या मराठी चित्रपटांतील कलावंत आणि तंत्रज्ञांचाही सन्मान करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारही वितरीत केले जाणार आहेत.