Sign In New user? Start here.

डॉ. व्ही. शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

 
 
zagmag

डॉ. व्ही. शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

मराठी सिनेमांकडे व्यावसायिकदृष्टिने पाहिले तर सिनेसृष्टीची अधिक भरभराट होऊ शकते. हीच गोष्ट लक्षात घेऊन मराठी सिनेसृष्टीला सोनेरी दिवस दाखवणार्‍या डॉ. व्ही. शांताराम यांची ‘व्ही. शांताराम मोशन पिक्चर ट्रस्ट’ चित्रकर्मींच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे.या संबंधित उपकमांची घोषणा नुकतीच एका पत्रकार परिषदेत करण्यात आली. ‘व्ही. शांताराम सिने कल्चरल सेंटर’ ची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे. या संस्थेच्या वतीने चित्रपट क्षेत्रातील निर्मिती-लेखन-दिग्दर्शन-तंत्रज्ञान या आणि अशा अनेक विभागांवर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. वैचारिक आदान-प्रदानाद्वारे सिनेमेकिंगबद्दल माहिती देणारा हा अभिनव उपकम आता सिनेमाकडे व्यावसायिकदृष्टीने पाहत, मराठी सिनेसृष्टीत आपले पाय घट्ट रोवू इच्छिणार्‍या सर्व चित्रकर्मींना एक हक्काचा आधार देणारा ठरेल यात शंका नाही. तंत्रशुध्द पध्दतीने सिनेमेकिंगचे तंत्र आत्मसात करुन निर्मितीच्या मैदानात उतरण्याची नामी संधी या उपकमाच्या रुपात चालून आली आहे. “होतकरू तरूणांना चांगलं व्यासपीठ मिळावं, या उद्देशाने हा उपकम हाती घेतल्याचं” किरण शांताराम यांनी यावेळी सांगितलं. या उपकमाची संकल्पना राबवणारे हर्षल बांदिवडेकर म्हणाले की, “यामुळे या क्षेत्रात काही भरीव करू इच्छिणार्‍यांसाठी ज्ञानाचं भांडार खुलं होईल.”

शनिवार २१ मार्चपासून प्लाझा थिएटरमध्ये सभासद नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होत असून तुम्ही ऑनलाईन फॉर्मस्ही भरु शकता. www.vshantaramfoundation.com या संकेतस्थळावर फॉर्मस् उपलब्ध आहेत. ‘व्ही. शांताराम मोशन पिक्चर ट्रस्ट’ ची लायब्ररी म्हणजे दुर्मिळ तसेच अनमोल पुस्तकांचा अमूल्य खजिनाच आहे. यात सिनेक्षेत्रातील दिग्गजांच्या अनुभवांवर आधारित पुस्तकांसोबतच फिल्ममेकिंगची तंत्रशुध्द माहिती देणार्‍या तसेच विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. दर्जेदार कथानकांच्या शोधात असणार्‍या लेखक-दिग्दर्शकांना या वाचनालयातील कथा-कादंबर्‍यांचा निश्चितच फायदा होईल. जेणेकरुन साहित्यावर आधारित दर्जेदार सिनेमांची निर्मिती भविष्यात होईल हि लायब्ररी सभासदांच्या अभ्यासासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये सभासदांसाठी महिन्यातून दोन वेळा (शक्यतो रविवारी) सिनेमांचे शो दाखवण्यात येतील. यात क्लासिक, नवीन तसेच तत्कालीन सिनेमांचा प्रामुख्याने समावेश असेल. यामध्ये जागतिक सिनेमा आणि प्रादेशिक सिनेमांनाही प्राधान्य देण्यात येईल. सिनेमाच्या शोच्या अनुषंगाने संमेलनाचे सत्र आयोजित करण्यात येणार आहे. यात सिनेसृष्टीतील दिग्गज पाहुणे आपले अनुभव कथन करतील. नवोदितांना तसेच सदस्यांना दिग्गजांशी चर्चा करण्याची संधी मिळेल. आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधताना तसेच मान्यवरांसोबत संवाद साधताना सभासदांच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल. वेळोवेळी ट्रस्टच्या वतीने कार्यशाळांचेही आयोजन करण्यात येईल. या कार्यशाळांच्या माध्यमातून सिनेमाचे वास्तव प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल.

वार्षिक सभासद नोंदणी शुल्क १५००/- रु. असून सभासदांची नोंदणी थेट ट्रस्टकडे करण्यात येईल. प्रत्येक सभासदाला नोंदणी शुल्क भरल्याची पावती तसेच सभासदत्वाचे ओळखपत्र देण्यात येईल. हे ओळखपत्र ट्रस्टच्या कोणत्याही सेवांचा लाभ घेताना जवळ बाळगणे अनिवार्य राहिल. ज्यामुळे ट्रस्टच्या विविध सेवांचा लाभ घेणे सभासदाला सुलभ होईल. ट्रस्टचे सभासदत्व स्विकारण्यासाठी चित्रपट व्यवसायातील कुठल्याही एका संस्थेचे सभासद असणे बंधनकारक राहिल. प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये १९ एप्रिलला ‘व्ही. शांताराम सिने कल्चरल सेंटर’च्या पहिल्या सत्राची सुरुवात होणार आहे.