Sign In New user? Start here.

वारी मार्गावरील स्वच्छतेच्या समस्यांचा वेध लघुपटातून

 
 
zagmag

वारी मार्गावरील स्वच्छतेच्या समस्यांचा वेध लघुपटातून

आषाढी आणि कार्तिकी एकादशीनंतर पंढरपुरात स्वच्छतेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, वारी मार्गावरील अस्वच्छतेवर 'पालखी आणि नंतर' या लघुपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

वारी ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. सुमारे सातशे वर्षांपासून वारी अखंडितपणे सुरू आहे. 'सर्वांत दीर्घ पायी यात्रा' म्हणूनही वारीची विशेष ख्याती आहे. वारीच्या परंपरेचा वेध अनेक माहितीपट-लघुपटातून घेण्यात आला आहे. मात्र, पालखी आणि नंतर हा लघुपट अजून वेगळा दृष्टिकोन देतो. शाळा, फँड्री या गाजलेल्या चित्रपटांसह ५ ऑगस्टला प्रदर्शित होत असलेल्या 'चौर्य' या चित्रपटाचे निर्माते नीलेश नवलाखा यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केलं असून नवलाखा आर्ट्स आणि होली बेसिल कंबाईन यांनी सामाजिक भावनेतून या लघुपटाचे निर्मिती केली आहे. वारी मार्गावरील स्वच्छतेच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी माजी खासदार प्रदीप रावत यांच्या सेवा सहयोग फाऊंडेशनने एक उपक्रम राबवला होता. मागील वर्षी वारी मार्गावरील दोन गावे दत्तक घेऊन त्या ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहे बसवण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापासून प्रेरणा घेऊन सामाजिक स्वच्छतेचा संदेश वारकरी आणि समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा लघुपट करण्यात आला आहे. मयूर हरदास यांनी संकलन, अथर्व वाघ यांनी छायांकन आणि अन्वय बेंद्रे यांनी निवेदन केलं आहे.

'वारी'चा वेगळा पदर उलडगणाऱ्या या लघुपटाविषयी नीलेश नवलाखा यांनी सांगितले की, 'मागील वर्षी पंढरपुरात सरकारने एक हजार व काही संस्थांनी मिळून पाचशे स्वच्छतागृहांची व्यवस्था केली होती. तरीही काही वारकरी उघड्यावरच विधी करत होते. वारी वर्षानुवर्षे सुरू असल्याने हा प्रकार कायमचाच झाला आहे. मात्र, त्यावर मार्ग काढण्याची गरज आहे. सरकार निर्मल वारी सारखी योजना राबवत असले, तरी त्याला वारकऱ्यांनीही सहकार्य केले पाहिजे. स्वयंशिस्तीनं स्वच्छतागृहे वापरली पाहिजेत. तरच, स्वच्छतेचा प्रश्न सुटू शकेल. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते. वारीमागे असलेली श्रद्धा आणि तरीही होणारी अस्वच्छता हा विरोधाभास समाजापुढे आणण्यासाठी हा लघुपट केला आहे. वारकऱ्यांनी स्वच्छतागृह वापरावे, असे आवाहन करण्याचा हा प्रयत्न आहे,' असे त्यांनी सांगितले. हा लघुपट समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जाणार असून त्यात प्रामुख्याने सोशल मीडियाचा वापर केला जाईल. तसेच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही हा लघुपट पाठवला जाणार असल्याचे ही त्यांनी नमूद केले.

Link - http://youtu.be/3MIX98DSJx0