Sign In New user? Start here.

 
 
zagmag

‘वसंतोत्सव’ रंगणार १६ ते १८ जानेवारी दरम्यान

अभिजात भारतीय संगीतरत्न असलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने १६ ते १८ जानेवारी दरम्यान 'वसंतोत्सव' हा संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागच्या मैदानावर सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे.

यंदा महोत्सवाचे आठवे वर्ष आहे. महोत्सवाला गोखले कन्स्ट्रक्शन्स, मराठे ज्वेलर्स आणि वास्तूशोध प्रोजेक्ट्स यांचे सहकार्य लाभले आहे. व्हाइट कॉपर एंटरटेन्मेंट महोत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. प्रख्यात गायक व पं. वसंतराव देशपांडे यांचे नातू राहुल देशपांडे यांनी महोत्सवाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. गोखले कन्स्ट्रक्शनच्या संचालिका पूनम गोखले, मराठे ज्वेलर्सचे भागीदार मिलिंद मराठे, वास्तूशोध प्रोजेक्ट्सचे संचालक नितीन कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. महोत्सवाची माहिती देताना राहुल देशपांडे म्हणाले, ‘महोत्सवात संगीतातील वेगवेगळ्या प्रकारांचा मिलाफ साधण्याची परंपरा जपली जात  असल्याचा आनंद वाटतो. यंदाही वसंतोत्सवामध्ये अभिजात संगीतासह सुफी, गझल आणि लोकप्रिय फ्युजन संगीत प्रकारांचाही समावेश आहे.’

वसंतोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी (१६ डिसेंबर) प्रख्यात वादक व ग्रॅमी पुरस्कार विजेते पं. विश्वमोहन भट यांच्या मोहन वीणा वादनाने महोत्सवाचा प्रारंभ होईल.त्यानंतर राहुल देशपांडे यांचे गायन होणार आहे.ज्येष्ठ वादक त्रिलोक गुर्टू, रवी च्यारी, नितीन शंकर, संगीत हळदीपूर व राहुल देशपांडे फ्युजन सादर करून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करतील. त्यानंतरच्या सत्रात, प्रसिद्ध पार्श्वगायक दलेर मेहंदी यांचे सुफी संगीत ऐकण्याची संधी प्राप्त होणार आहे. मेहंदी यांनी नव्वदच्या दशकापासून आपल्या दमदार आवाजाचे गारूड जगभरातील संगीतप्रेमींवर केले आहे.  तिसऱ्या दिवसाचा प्रारंभ पं. तेजेंद्र मुजुमदार (सरोद) व शशांक सुब्रमण्यम (बासरी) यांच्या जुगलबंदीने होईल. त्यानंतर ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या गझल गायनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

‘वसंतोत्सव २०१५’ च्या औचित्याने ‘वसंतोत्सव विमर्श’ हा नवीन उपक्रम यंदा सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ‘संगीतशास्त्र’ या विषयावर १५ जानेवारीला सकाळी ११ वाजल्यापासून ज्योत्स्ना भोळे सभागृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. संगीताच्या क्षेत्रातील अभ्यासक या परिषदेत सहभागी होऊन विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

  

डॉ. दीपक राजा ‘राग तत्व एक दृष्टीकोन’ या विषयावर, समीर दुबळे ‘संगीत शिक्षणातील नवे मार्ग’, डॉ. उर्मिला भिर्डीकर ‘मन्सूर आणि महाराष्ट्रातील संगीत’, तर डॉ. अनीश प्रधान ‘संगीत पुरस्कार’ या विषयावर आपली भूमिका मांडणार आहेत. या चर्चासत्रातून संगीतशास्त्राचे अभ्यासक, कलावंत आणि संगीताच्या विद्यार्थ्यांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. चर्चासत्राला प्रवेश विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे.

‘तरुणाईची पसंती मिळालेल्या वसंतोत्सवासारख्या महत्त्वाच्या संगीत महोत्सवाशी आमचे पहिल्यांदाच नाते जोडले जात असल्याचा आनंद वाटतो. या महोत्सवाला शक्य त्या सर्व प्रकारे सहकार्य करण्याचा आमचा मनोदय आहे. तसेच भविष्यातही आमचे हे नाते असेच टिकून राहील अशी अपेक्षा आहे,’ असे गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या पूनम गोखले यांनी सांगितले. पूनम गोखले स्वतः उत्तम भरतनाट्यम नृत्य कलाकार आहेत.

 

वसंतोत्सवाची सिझन तिकिटे ६०००/-, खूर्ची ७५०/- व भारतीय बैठक ३००/- बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक मंदिर व कमला नेहरू पार्कजवळील शिरिष ट्रेडर्स येथे उपलब्ध होणार आहेत. www.bookmyshow.com  या वेबसाइटवरून ऑनलाइनही तिकीटे घेता येतील. तसेच कार्यक्रमस्थळीही १४ जानेवारीपासून दररोजची तिकीटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.