Sign In New user? Start here.
 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 
 

सिनेमाला देखणं करणारा तंत्रज्ञ ‘एडिटर’ -संजय गवळी

   सिनेमा तयार करण्यात कुणा एकाचा हात नसतो तर सिनेमा तयार करणं हे एक टिमवर्क असतं. ज्यात दिग्दर्शक, कलाकार, कॅमेरामन, तंत्रज्ञ अशा कितीतरी लोकांचा मोठा सहभाग असतो. मात्र, सिनेमा शूट करून झाल्यावर तांत्रिकबाबींमध्ये सर्वात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे सिनेमाचं संकलन(एडिटींग)...पुढे-मागे शूट केलेल्या सर्व सीन्समधून दिग्दर्शकाला सांगायची असलेली कथा एकत्र करण्याचं काम एडिटर हा एडिटींगमध्ये करतो. एडिटींगचं तंत्र नेमकं काय असतं आणि ‘माझा मी’ सिनेमाचं एडीटींग करण्याचा अनुभव सिनेमाचे एडिटर संजय गवळी आणि ‘काईट्स सिने क्राफ्ट’चे संचालक जॉन्सन जॉन यांच्याकडून आम्ही जाणून घेतला.

   सिनेमाच्या पोस्टरवर किंवा स्क्रिनवर नेहमी एडिटर आणि त्याचं नाव प्रेक्षक वाचत असतात. मात्र, सर्वच प्रेक्षकांना एडिटर नेमका काय करतो हे माहिती असतंच असं नाही. हेच थोडक्यात प्रेक्षकांना कळावं म्हणून संजय गवळी यांनी एडिटींग म्हणजे नेमकं काय हे सांगितले, ‘सिनेमाचं शूटींग हे कलाकारांच्या डेट्स आणि शूटींग लोकेशनच्या उपलब्धतेनुसार पार पडत असतं. त्यामुळे सिनेमातील प्रसंग पुढे-मागे चित्रीत केले जातात. शूटींगनंतर ते सर्व रॉ फूटेज कथानकानुसार सिक्वेन्समध्ये जोडणं आणि त्याला देखणं करणं हे एका एडिटरचं काम असतं’. एडिटींग म्हणजे काय हे सांगितल्यावर अण्णानी (संजय गवळी) माहिती दिली ती सिनेमावर एडिटींगच्या प्रभावाची, ‘कोणत्याही सिनेमाचा कॅप्टन हा दिग्दर्शक असतो. त्याने त्याच्यानुसार सीन्सचं शूटींग केलेलं असतं. एडिटींगसाठी सर्व शूटींग झाल्यावर एडिटर्स कट, डायरेक्टर्स कट आणि फायनल कट असे तीन भाग असतात. एडिटर्स कट यात आम्ही दिग्दर्शकाला सोबत न घेता आमच्यापरीने एडिटींग करत असतो. पण यात फायनल डिसिजन हे दिग्दर्शकाला द्यायचं असतं. दिग्दर्शकाला काही सूचना आम्ही करतो. मात्र, त्या मान्य करायच्या की नाही हे दिग्दर्शकालाच ठरवायचं असतं. सिनेमाचं एडिटींग चांगलं आणि देखणं होणं हे एडिटरच्या अनुभवांवर अवलंबून असतं. अनुभवातून ते हे शिकत असतात की प्रेक्षकांना काय बघायला आवडतं किंवा कुठे काय चांगलं दिसेल. यात एक महत्वाचा मुद्दा हा असतो की जर डायरेक्टर्स कट आणि एडिटर्स कट यांचं मिश्रण चांगलं झालं तर नक्कीच सिनेमा चांगला होतो’.

   सिनेमा दिग्दर्शकाच्या सांगण्यानुसार शूट केलेला असतो आणि शूटींगमध्ये एडिटरचा काहीच समावेश नसतो मग एडिटींगची लिंक कशी लागते ? यावर ते सांगतात, ‘यासाठी त्या सिनेमाच्या स्क्रिप्टचा आणि कथानकाचा अभ्यास करणं एडिटरला भाग असतं. कथानकाचा ग्राफ कसा चाललाय, कॅरेक्टर्सचा ग्राफ कसा आहे, कथेतील उत्कंठा कशी ठेवायची आहे याची निट माहिती असणं फार गरजेचं असतं. सोबतच दिग्दर्शकाला ती कथा दाखवायची कशी आहे हेही समजून घेणे खूप जास्त महत्वाचे असते. नाहीतर प्रेक्षकांना कथा समजणारच नाही’.

   अनेक हिंदी-मराठी सिनेमांचं एडिटींग त्यांच्या स्टुडिओत होत असतं. पण प्रत्येकवेळी वेगळ्या सिनेमासाठी काम करताना काम करण्यात काही वेगळेपण असतं का ? यावर त्यांनी ‘माझा मी’च्या अनुभवाबद्दल सांगितले, ‘माझी मी’च्या शूटींगचे शेड्यूल वेगवेगळे लागल्याने आम्हाला एडिटींगचे पार्ट वेगवेगळे येत होते. त्यामुळे आमची टीम मी, आमच्या कंपनीचे सीईओ जॉन्सन सर, माझी सहकारी स्मिता कदम आणि दिग्दर्शक निनाद वनगे...आम्ही सर्वजन एकत्र बसून चर्चा करीत होतो की, पुढच्या शेड्युलला आपल्याला काय लागणार आहे, कशाप्रकारे लागणार आहे. आपल्याकडे कशाची कमी आहे. अशा वेगवेगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करून पुढचं काम करीत होतो. ज्यामुळे एडिटींग करायला सोपं गेलं. ‘माझा मी’ सिनेमात एडिटींगमध्ये अनेक बदल आम्ही सुचवले ते दिग्दर्शकांनी मान्य केले. असाच एक प्रसाद ओक आणि समीधा गुरू यांचा सीन होता जो आधीच शूट झाला होता. पण त्यातून काहीतरी वेगळाच अर्थ निघत होता. सिनेमाच्या मुख्य नायकाचा ग्राफ एका वाक्यामुळे पूर्णपणे बदलत होता आणि आपला हिरो तसा नाहीये. तर ते आम्ही एडिटींगमध्ये बरोबर केलं. ‘माझा मी’चं शूटींग हे वेगवेगळ्या शेड्युलमध्ये झाल्याने काय हवंय, कसं हवंय यावर विचार करायला बराच वेळ मिळाला’.

   ‘सोबतच एडिटींगच्या बाबतीत आम्ही एक प्रयोग ‘माझा मी’ मध्ये केला. एडिटींग दोन प्रकारचं असतं एक म्हणजे कन्टिन्य़ूअस ज्यात दिग्दर्शकाने दिलेले सीन्स जसेच्या तसे लावले जातात आणि दुसरं म्हणजे नॉन ट्रेडिशनल एडिटींग... शूटींग वेगवेगळ्या शेड्युलमध्ये झाले असल्याने बरचसं रॉ मटेरिअल आमच्याकडे आलं होतं. ते सर्व फुटेज खूप जास्त होतं आणि कमीतकमी वेळेत लोकांना कथा समजेल असा सिनेमा आम्हाला करायचा होता. त्यामुळे आम्ही पूर्णपणे एक्सपरिमेंटल एडिटींग ‘माझा मी’साठी ट्राय केलं. ज्यावेळ पूर्ण फिल्म एडीट करून झाली तेव्हा सर्व कलाकारांना आम्ही बोलवले आणि त्यांनी एखाद्या नवीन प्रेक्षकाने सिनेमा बघावा तसा हा सिनेमा बघितला. त्यानंतर ते म्हणाले की, आम्ही सिनेमात काम केलंय तरी सुद्धा आम्ही प्रेडिक्ट नाही करू शकलो की हे हे इथे होऊ शकतं. त्यामुळे आम्हीही हे काम खूप एन्जॉय केलं’.

   एखाद्या सिनेमाचा लूक अ‍ॅन्ड फिल कसा असायला हवा हे कॅमेरावर्कवर अवलंबून असतं की एडिटींगवर याबाबत विचारले असता ते सांगतात, ‘कॅमेरामन आणि एडिटर या दोघांपेक्षाही हे अधिक अवलंबून असतं ते दिग्दर्शकावर. दिग्दर्शकाला त्याच्या टीमबरोबर चर्चा करुन ठरवायचं असतं की सिनेमा कसा दिसला पाहिजे, त्यासाठी काय करायचे आहे. मेकअप मन, कलादिग्दर्शक, ड्रेस डिझायनर आणि तंत्रज्ञ या सर्वांचा त्यात समावेश असतो. लूक अ‍ॅन्ड फिल ची संकल्पना ही आधीच ठरवावी लागते. नंतर एडिटींग करताना डिआय मध्ये सिनेमाचा त्या त्या काळातील कलर कसा दिसायला हवा यावर काम केलं जातं’.

   ‘माझा मी’ चं एडिटींग ‘काईट्स सिने क्राफ्ट’ च्या अंधेरी(मुंबई) येथील स्टुडिओत केले गेले. या स्टुडिओच्या खासियतबद्दल स्टुडिओचे सीईओ जॉन्सन हे सांगतात, ‘ब-याच वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन ही ‘काईट्स सिने क्राफ्ट’ कंपनी सुरू केली आहे. आमच्या टीममध्ये एडिटींग करणा-यां सोबतच क्रिएटीव्ह डायरेक्टर्सपासून अगदी प्रॉडक्शन सांभाळणारी मंडळी सुद्धा आमच्यात आहे. म्हणजे एकप्रकारे ऑलराऊंडर माणसं आमच्यात आहेत. सर्व्हिसेसबद्दल सांगायचं तर प्रॉडक्शन, प्री प्रॉडक्शन, पोस्ट प्रॉडक्शन आणि सिनेमासाठी लागणा-या सर्वच तांत्रीक गोष्टी म्हणजे कॅमेरा, लाईट, क्रेन, ट्रॉली अशा सर्वच तांत्रीक प्रकारच्या सुविधा आम्ही पुरवतो. त्यानंतर आमचं स्वत:चं डिआय थिएटर आहे जिथे सिनेमा कलरच्या दृष्टीने, क्वॉलिटीच्या दृष्टीने कसा दिसेल हे ठरवलं जातं. हा पण आमचा स्वत:चा पार्ट आहे’.

- अमित इंगोले