Sign In New user? Start here.

आमच्या समोरच्या गल्लीतली ‘सिंड्रेला’

chandrashekhar gokhale तुम्हाला सिंड्रेलाची गोष्ट सांगू ?... सिंड्रेलाची गोष्ट सांगायला आटपाट नगराची गरज नाही. आमच्या समोरच्या गल्लीतच गौरी फडणीस नावाची सिंड्रेला रहायची....आमच्या फडणीसबाईंची सावत्र मुलगी..दिसायला सिंड्रेला पेक्षाही सूंदर आणि वागायला सीतेसारखी साध्वी..वयानं म्हणाल तर असेल विशी ओलांडलेली. बाईनी तिचा तसा छळवाद केला नाही. पण कधी प्रेमही केलं नाही. ना माया केली. एकटेपणासुद्धा माणसाला ग्रासतो, गौरीचं तसं झालं. आई म्हणायची त्यात बाईंचीही चूक नाही. बाईंचं फसवून लग्न या बिजवराशी लावलं.

आमच्या समोरच्या गल्लीतली ‘सिंड्रेला’

 

चंद्रशेखर गोखले

तुम्हाला सिंड्रेलाची गोष्ट सांगू ?... सिंड्रेलाची गोष्ट सांगायला आटपाट नगराची गरज नाही. आमच्या समोरच्या गल्लीतच गौरी फडणीस नावाची सिंड्रेला रहायची....आमच्या फडणीसबाईंची सावत्र मुलगी..दिसायला सिंड्रेला पेक्षाही सूंदर आणि वागायला सीतेसारखी साध्वी..वयानं म्हणाल तर असेल विशी ओलांडलेली. बाईनी तिचा तसा छळवाद केला नाही. पण कधी प्रेमही केलं नाही. ना माया केली. एकटेपणासुद्धा माणसाला ग्रासतो, गौरीचं तसं झालं. आई म्हणायची त्यात बाईंचीही चूक नाही. बाईंचं फसवून लग्न या बिजवराशी लावलं. त्यात पदरात एक मुलगी...सावत्रं मुलगी दिसायला अशी नक्षत्रा सारखी तर पोटच्या मुली ?..सगळं सोडून मामाच्या वळणावर गेलेल्या..तरी शिल्पा जरा तरी बरी पण धाकटी प्रफूल ? कणकेच्या गोळ्यासारखी स्थूल..जसजशा मुली मोठ्या व्हायला लागल्या तसतशी ही तफावत अधीकच जाणावयला लागली. मुलींचं मन राखायला बाईना गौरीला डावलणं भाग होतं, मग त्यात आणखीनच आसूरी आनंद बाईना मिळायला लागला..त्यात गौरीचे बाबा अपराधी भावनेनं सतत घरापासून लांब.. कोचीनला राहायचे आम्ही म्हणायचो त्याना "निदान गौरीला तुमच्या सोबत तरी ठेवा. ते हसून म्हणायचे अहो अत्ता पोरीचं लग्न होऊन ती सासरी जाईल...आणि बाईना नेमकं तेच नको होतं. आपल्या मुली घरात बसून आणि ही सवतीची लेक मुंडावळ्या बांधून मिरवणार?

बाईनी मग आमच्या सिंड्रेलाची पाठच धरली. घरातली मुलगी असूनही तिची पत खाली खाली येत गेली, गौरी अभ्यासात हुशार नव्हती असं नाही.

पण घरच्या एकूण वातावरणाचा तिच्या हळव्या स्वभावावर परिणाम होतच होता.. आमची आई आणि समोरच्या भिडे मावशी सतत डोळ्यात तेल घालून असायच्या...म्हणून बाईंचं काही चालायचं नाही, तरी तिला रस नाही म्हणत बाईनी गौरीचं शिक्षण बंद केलं, एका जागीच बसून राहते. म्हणून तिचं भरतकाम विणकाम बंद केलं. स्टेप बाय स्टेप हे सगळं घडत होतं. पण थोपवता येत नव्हतं. तिघी टेबलाशी बसून जेवायच्या गौरीला स्वैपाकघरात एकटीला बसवलं जायचं, बरेचदा या तिघी बाहेर जायच्या आणि हिला घरात कोंडलं जायचं, घरात पाहुणे आले तर गौरीला बाहेर यायची परमिशन नव्हती. पण जेंव्हा गौरीचे लांबसडक केस प्रफूलच्या हट्टापायी बाई कापायला निघाल्या, तेंव्हा मात्रं गौरी घाबरली आणि आईने हट्ट करून आमच्या वडिलांकरवी फडणीस काकाना तातडीने बोलाऊन घेतलं. सगळ्यानी मिळून काकाना खडसावलं बाईंचा गैरसमज दूर करायच्या ऐवजी तुम्ही पळ काढता? यात गौरीचा काय दोष? ती कुठल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतेय? त्यावर काकानी विचार नं करता सगळं गौरीच्या नावावर केलं आणि आपण हात वर केले त्यामुळे परिस्तिथी अधीकच चिघळली, शेवटी हार पत्करून भिडे मावशी आमच्या इथल्या स्वामीभक्ताकडे गौरीला घेऊन गेल्या, म्हणाल्या काय हिच्या नशिबाचे धिंदवडे आहेत ते तरी कळूद्या...ते स्वामीभक्त शांतपणे म्हणाले, काळजी करू नका.. अकरा शनिवार खंड न पडू देता भर दुपारी मारुतिला जायाला सांगा अपोआप कोडी सुटतील...

त्यानिम्मीताने जरा बाहेर पडता येईल या विचाराने गौरीला बरं वाटलं बाईनी आईला बजावलं

"अडवणारी मी कोण? पण सांगून ठेवते. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर तिला न्यायचं आणि आणून सोडायचं".. हो हो म्हणत मग दर शनिवारच्या मारुतीच्या वा-या सूरू झाल्या. त्या निम्मीत्ताने गौरी या दोघींजवळ मोकळेपणानी बोलू शकली..घर धमकाऊन बाईनी अपल्या नावावर करून घेतलच होतं, शिवाय कसं तुझं लग्न होतय, ते ही बघते असं धमकावलंही होतं.. पण देवदयेने अकरा शनिवार निर्विघ्नपणे पार पडले. पण शेवटच्या शनिवारी मारुतीरायाने आपला प्रताप दाखवला..या तिघी देवळात गेल्या तर ही गर्दी.. काय होतं कोण जाणे? धक्काबुक्की करत त्या अडनिड्या गाभा-यात गौरी मनोभावे उभी होती. सांभाळ...सूखी कर एव्हढीच तिची रास्तं मागणी होती. लग्न बिग्न तिच्या डोक्यातही नव्हतं.. ती मनोभावे पाया पडायला गुढघे टेकून वाकली आणि उठायला गेली तर ? उघड्या खिडकीच दार काचकन तिच्या पाठीवर मणक्यात बसलं पोर कळवळली आणि चक्कर येऊन पडली.

आईच्या तोंडचं पाणीच पळालं. कसं बसं तिला घरी आणलं...आसूरी आनंदाची चमक चेह-यावर कशी पसरते, डॊळे कसे लकाकतात हे मी प्रथमच बघत होतो. बाईना आणि त्या दोघीना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आई आणि भिडे मावशी शरमेनं आणि काळजीने अर्धमेल्या झाल्या होत्या, आम्हीच डाँक्टराना बोलावलं. त्यानी तपासलं मार गंभीर होता. बरं व्हायला वेळ लागणार होता.

शिवाय ट्रिटमेंटही बरीच चालणारी होती. बाईनी आधीच हात वर केले पण आम्ही होतो ना.. दर दोन दिवसानी डॉ. नचिकेत पाटणकर कडे लाईट घ्यायला गौरीला न्यावं लागत होतं. आणि ते आम्ही आनंदाने करत होतो. डॉ. नचिकेत पाटणकर आमच्या एरियातलं बडं प्रस्थ.. फेमस डॉक्टर, दिसायला हँडसम गडगंज श्रीमंत असूनही दिलदार, दिलखुलास माणूस..आमच्या सिंड्रेलापेक्षा सहा सात वर्षानी मोठा..त्याचा गौरीवर जीव जडलाय हे या दोन्ही अनुभवी म्हाता-यांच्या कधीच लक्षात आलं. पण गौरीला हे प्रेम बीम समजवायचं म्हणजे... पण या दोन्ही म्हातार्यांचा पाठींबा आहे म्हंटल्यावर नचिकेतनेच पुढाकार घेतला आणि आजार गंभीर आहे, आजार बळावलाय करत ट्रिटमेंट चालू ठेवली.

बाई मनोमन खूष.. मुद्दाम फोन करून त्यानी चौकशी केली नचिकेत म्हणाला आजार गंभीर आहे. आयुष्यावर परिणाम होऊ शकतो..आणि खरच प्रेमका रोग आयुष्यावर परिणाम करणाराच असतो... बेसावध बाई काही करू शकल्या नाहीत. नचिकेतची ट्रिट्मेंट रंग लाई आणि एक दिवस नचिकेत सारखा राजबिंडा राजकुमार आमच्या गौरी नावाच्या सिंड्रेलाला घेऊन पसार झाला.. स्वामीभक्तानी सांगितलेला उपाय असा फळून आला. आता नचिकेत आणि सिंड्रेला कॅनडाला स्थाईक झालेत आणि आमच्या फडणीस बाई दोन्ही लेकीना घेऊन स्वामीभक्तांचे उंबरठे झिजवत असतात...

- चंद्रशेखर गोखले