Sign In New user? Start here.

सुमित्र माडगूळकर : भाग १

sumitra madgulkarमहाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा' अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर....

 
sumitra madgulkar
sumitra madgulkar

सुमित्र माडगूळकर : भाग १

गदिमांचे नातू व संगणक व्यावसायिक,१९९८ साली गदिमांच्या साहित्य-चित्रपटांवर आधारित मराठी साहित्यातील पहिली वेबसाईट गदिमा.कॉम चे निर्माते.गदिमा.कॉम या पहिल्या मराठी मेगा संगणक सीडीची निर्मिती.

दै.लोकमत,दै.देशोन्नती सारख्या अनेक लोकप्रिय वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्ति व मराठीसृष्टी.कॉम, मराठीबुक्स.कॉम,सायबरशॉपी.कॉम सारख्या अनेक मराठी वेबसाईट ना तंत्रज्ञान सहाय्य.सोनी म्युझिक-इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समुहाच्या सहकार्याने 'जोगिया' या मराठी म्युझिक अल्बमची निर्मिती.दूरदर्शन,ई टिव्ही मराठी,झी मराठी सारख्या अनेक वाहिन्यांवर मराठी बातम्या,मानाचा मुजरा,नक्षत्राचे देणे अशा कार्यक्रमात सहभाग.

फेसबुकवर गदिमा व गीतरामायण पेज ची निर्मिती,तसेच आठवणीतील गाणी सारख्या वेबसाईटवरुन लिखाण,अ‍ॅन्डरॉईड मोबाईलवर गीतरामायण अ‍ॅप चे निर्माते.

----------------

मी तो भारलेले झाड !...... ........सुमित्र माडगूळकर

"पळून गेलेल्या काळाच्या कानात माझ्या गीतांची भिकबाळी डोलते आहे" .......गदिमा

महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा' अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर....

लहानपणापासूनच माडगूळकर या नावाच्या मंत्राक्षता मला लाभल्या व आपण कोणीतरी वेगळे आहोत,आपले आजोबा कोणीतरी मोठे होते हे लोकांच्या प्रतिक्रियेतून व मोठेपणी त्यांच्या साहित्याच्या अभ्यासातून कळत गेले.लहानपणापासून माझ्या आयुष्यात एक प्रसंग वारंवार घडतो आहे,समोरच्याला माझे नाव सांगितल्यावर आधी पहिला प्रश्न येतो "ग.दि.माडगूळकर तुमचे कोण?" व मी "ते माझे आजोबा!" असे सांगितल्यावर समोरच्या माणसाच्या चेहर्यावरचे बदलणारे भाव,त्याला वाटणारा आनंद,त्याने काढलेले "अरे वा","अरे बापरे","आमचे भाग्य की तुमची भेट झाली" असे उदगार व त्यानंतर आम्हाला मिळणारी विशेष: वागणूक याचा अनुभव आजही पदोपदी घेतो आहे.मग ती कोणी मोठा व्यक्ती असो वा मराठी साहित्यावर प्रेम करणारा सामान्य माणूस.

पपा आजोबा (गदिमा) गेले तेव्हा मी २.५ वर्षाचा होतो,त्यामुळे त्यांच्या काही धूसर आठवणी आहेत.ते मला प्रेमाने 'सोन्या' अशी हाक मारायचे.ते पंचवटीच्या व्हरांडयात त्यांच्या निळ्या रंगाच्या कोचावर लिहायला बसायचे,येथेच त्यांनी गीतरामायणासकट अनेक सुप्रसिध्द चित्रपटांच्या कथा,गीते लिहिली आहेत.त्यांचा स्वभाव शिघ्रकोपी व त्यांच्या कर्तुत्वामुळे सर्वांनाच त्यांची आदरयुक्त भीती वाटायची.मी लहान असताना त्यांच्याजवळ जायचो व त्यांच्या बोटाला धरुन त्यांना त्यांच्या नीळ्या कोचावरुन ऊठवायचो व म्हणायचो "पपा आजोबा तू समोर बैस",आणि न चिडता ते मुकाटपणे अजाण नातवंडाचा तो हट्टही पुरवायचे,ते म्हणायचे "माझ्या सिंहासनावरुन मला उठवणारा हा एकमेव !,माझा आजा बाबा बामणच जन्माला आला आहे!.हाच माझे नाव पुढे चालवेल!".

मी अनेकदा पपा आजोबा व ताई आजी (गदिमांच्या पत्नी विदयाताई) यांच्या सोबत त्यांच्या पांघरुणात शिरुन लपाछपीचा खेळ खेळत असे,पपा आजोबा मला संध्याकाळी फिरायला घेऊन जायचे,माझ्या आवडत्या जेम्स च्या गोळ्या घेऊन दयायचे.त्यांनी माझ्यावर अनेक कविता सुध्दा केल्या होत्या

आलगट्टी गालगट्टी सोन्याशी गट्टी फू
तुला मी खेळायला घेणार नाही, जेमच्या गोल्या देनार नाही
जवळ आलास तरी घेईन गालगुच्चा,अंगावर सोडीन भू
सोन्याशी गट्टी फू.....

एकदाच ते माझ्यावर खूप रागवले.पंचवटी च्या मागच्या अंगणात तुळशीकट्या जवळ मी माझ्या लाल रंगाच्या मोटारीत बसून खेळत होतो,छोटी पायडलची मोटार होती पण पायानेच ढकलत मी खेळत होतो.जवळच माझी पणजी आजी म्हणजे गदिंमांच्या मातोश्री बनुताई उभ्या होत्या.खेळता खेळता मी गाडी जोरात ढकलायचो व पणजी आजी च्या जवळ जाऊन एकदम थांबायचो,असा माझा खेळ सुरु झाला.पणजी आजी, मी जोरात जवळ गेलो की घाबरुन "नको रे बाबा!" असे म्हणायची ते ऐकून मला आणखीनच गम्मत वाटून चेव चढायचा व हे मी वारंवार करु लागलो,पपा आजोबांनी ते बघितले व एकदोनदा समजावून सांगितले की "सोन्या अस करु नकोस",पण माझी गंमत चालूच होती,शेवटी व्हायचे तेच झाले,पपा आजोबांची एक सणसणीत माझ्या कानाखाली बसली आणि २-२.५ वर्षाचा मी कळवळलो,रडून रडून लाल लाल झालो.पुढे थोडयावेळाने त्यांचा राग शांत झाला व आपण लाडक्या सोन्याला मारले याचे त्यांना खूप वाईट वाटले.त्या दिवशी ते दुपारी जेवले पण नाहीत तसेच आपल्या खोलीत जाऊन पडले.संध्याकाळी मला ऊचलून घेतल,पटापटा पाप्या घेतल्या व म्हणाले "चल रे सोन्या आपण जेमच्या गोळ्या खायला जाऊ" म्हणून फिरायला घेऊन गेले.आपल्या आईविषयी गदिमांना किती प्रेम होतो हे त्यांच्या साहित्यातून प्रकट झालेच आहे,आपल्या मुलांना नाही पण नातवंडांना सगळे गुन्हे माफ करणारे पपा आजोबा त्या एका प्रसंगात मात्र माझ्यावर खूप रागावले होते.

गदिमांबद्ल लिहायचे म्हंटले तर अनेक अंक सुध्दा पुरणार नाहीत असे अष्टपैलू व्यक्तीमत्व, "ज्योतीने तेजाची आरती" या उक्ती नुसार वरवर त्यांच्या कार्याचा फक्त आढावा घ्यायचा झाला तर...

गदिमांचा जन्म शेटफळे या त्यांच्या आजोळी झाला तर बालपण अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थिती मध्ये माडगूळे या गावात गेले.वयाच्या १६-१७ वर्षीं त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता,निर्माता तर मराठी साहित्यात कवी,कथालेखक,कादंबरीकार,नाटककार,संपादक अशा सर्व क्षेत्रात वावर केला,गीतरामायणाने तर त्यांना आधुनिक वाल्मीकी व महाकवी पद बहाल केले.

मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये रामजोशी,वंदे मातरम,पुढचे पाऊल,गुळाचा गणपती,लाखाची गोष्ट,पेडगावचे शहाणे,ऊनपाऊस,सुवासिनी,जगाच्या पाठीवर,प्रपंच, मुंबईचा जावई,देवबाप्पा सारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश होता,गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला.

पुलंनी म्हंटले आहे "महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्या-या माणसापेक्षा समाजाला गाणे देणा-या माणसाचे उपकार फार मोठे असतात. 'Song has longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यान् पिढ्या बांधून ठेवते एवढेच कशाला .माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवून टाकण्याचे गाण्याइतके दुसर्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंत:करण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली,तमाशाच्या फडात , देवळात ,शाळेत,तरुणांच्या मेळाव्यात,माजघरात,देवघरात,शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत... त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे ?."

क्रमश :