Sign In New user? Start here.

chandrashekhar gokhale राम राम....! सुरुवात कुठून करायची हा सुरुवातीला पडणारा नुसता पडणारा नव्हे तर छळणारा प्रश्न आज निमुट आहे. कारण अमितचा झगमग डॉट नेट या वेबसाईटवर लिहिण्यासाठी फोन आल्यापासून मनातल्या मनात जुळवाजुळव सुरू झाली होती...

आधी स्वप्नात रमायचो....आता आठवणीत रमतो...

 

चंद्रशेखर गोखले

राम राम....! सुरुवात कुठून करायची हा सुरुवातीला पडणारा नुसता पडणारा नव्हे तर छळणारा प्रश्न आज निमुट आहे. कारण अमितचा झगमग डॉट नेट या वेबसाईटवर लिहिण्यासाठी फोन आल्यापासून मनातल्या मनात जुळवाजुळव सुरू झाली होती...

आता जुळवा जुळव कसली? मी दहावी पास असं काय गहन लिहिणार आहे?...खरं आहे, आवर्जून लिहायला बसावं असं माझ्याकडे काही नाही पण बोलायला लागलं तर, एकामागे एक खूप काही आठवत राहतं. आधी स्वप्नात रमायचो....आता आठवणीत रमतो इतकाच काय तो फरक...इतकाच काय म्हणालो तरी स्वप्न आणि आठवणी यात खूप फरक आहे. पण रमायला दोन्ही माझ्यासाठी सारखेच प्रश्न आहे की तुम्ही माझ्या गप्पांमधे रमाल की नाही? रमाल नक्कीच रमाल... मुळात आहो आपण गोष्टीव्हेल्लाळ्च असतो, गप्पा मारायला वेळ नाही म्हणता म्हणता गप्पात रमणारे....

मला श्रीकॄष्णाच्या कथा आणि चरित्र लहानपणापासूनच अतीप्रियं आहे, आम्ही त्या बाबतीत खरच भाग्यवान, आम्ही श्रीकॄष्ण, श्रीराम, प्रल्हादाच्या गोष्टी मायबोलीत ऐकतच लहानाचे मोठे झालो...त्यातील श्रीकॄष्णाची एक कथा मला अजूनही तितकीच भावते...मी असं म्हंटल्यावर कुठली कथा? हा प्रश्न तुमच्या मनात उमटलाच असेलना? याचाच अर्थ आपल्या गप्पा रंगणार..आता कथा कुठली ते ते सांगतो...श्रीकॄष्ण आपली बहीण सुभद्रा हीला रथातून नेत असतो, ती गरोदर असते दिवस भरत आलेले असतात, रथ हाकता हाकता श्रीकॄष्ण सुभद्रेला सहज वेळ जावा म्हणून युद्धनितीच्या गोष्टी सांगत असतो...गरोदर बाईला युद्धशास्त्राच्या गप्पांमधे काय रस असणार?तिचा बिचारीचा डोळा लागतो आणि हे सर्वांतर्यामी श्रीकॄष्णाला कळत नाही(?)

तो आपला सांगत राहतो आणि उत्तरादाखल हुंकार त्याला मिळत राहतो...बोलता बोलता श्रीकॄष्ण चक्रव्युव्ह रचने बद्दल सांगायला लागतो, सुभद्रा निजलेली असते पण गर्भात विसावलेला अभिमन्यु अगदी जिवाचे कान करून ऐकत असतो...

चक्रव्युव्ह रचायचं कसं त्यात शिरायचं कसं हे सगळं सांगून होतं. आता फक्त यशस्वी रित्या ते व्युव्ह भेदायचं कसं? हेच सांगायचं राहिलेलं असतं, गर्भातला अभिमन्यु तेच ऐकायला उतावीळ झाला असणार, पण नेमकं दैवं आडवं येतं तेंव्हाच त्या जगद्नियंत्याला वळून बघायची बुद्धी होते. तो वळून बघतो तर सुभद्रा निजलेली असते मग इतक्या वेळ हुंकार कोण देत होतं? हा प्रश्न त्या परमेश्वराला पडत नाही आणि सुभद्रा झॊपली असं समजून तो जगद्गुरू गप्प होतो. म्हणून अभिमन्युला चक्रात शिरायचं द्न्यान जन्माबरोबर मिळतं पण बाहेर पडण्याचं कौशल्य शिकण्या आधीच त्याला चक्रव्युव्हात शिरावं लागतं. मला आपण आणि अभिमन्यु मधे खूप साम्यं वाटतं...आपण सुद्धा आईच्या पोटात असताना काय काय ऐकलं असेल आईच्या बरोबरीने सोसलं असेल पण एकदा का आईच्या मांडीवर आलो की सगळं पुसलं जातं, मांडीवरून उतरलो की आपली वाट आपण निवडायला फार अवधी मिळतच नाही... बरे वाईट अनुभव घेत आपल्याला चक्रव्युव्हात शिरावं लागतं आणि मग आयुष्यभर त्यातून बाहेर पडायची धडपड आपल्यालाच करावी लागते...ही धडपड म्हणजेच आपलं आयुष्य बनून जातं,

एक पाऊल उचलंलकी
दुसरं जमिनीवर टेकावं लागतं
चालणं सुद्धा सुरुवातीला
माणसाला शिकावं लागतं

ही धड्पडच मी इथे मांडणार आहे, प्रत्येकाची धडपड वेगळी पण हेतू एकच, इथून सुटण्याचा..पण हे चक्रव्युव्हच असं आहे जितकं सुटण्याची धडपड करावी तितकं गुंतवून टाकतं आणि मग आपल्यालाही तो गुंता आवडायला लागतो म्हणून तर गप्पा रंगतात, गप्पा म्हंटलं की सवंगडी जमतात आणि सवंगडी जमले की गप्पा जमून येतात...तुम्ही नियमीत जमायचा वायदा करा मी गप्पा मारायचा वायदा करतो बघुया गप्पांचा फड कस आणि किती रंगतोय ते ?

चंद्रशेखर गोखले