Sign In New user? Start here.

"आमच्या वेळी असं होतं" म्हणायचा अधिकार...

chandrashekhar gokhale मला वाटायचं "आमच्या वेळी असं होतं" म्हणायचा अधिकार ठरावीक वय झालं की अपोआप मिळतो. पण तसं नाही जो मनापासून आठवणीत रमतो तो कधीही मनातली बोच लपवत हे वाक्य तळमळीने बोलू शकतो. आम्ही पवई हिरानंदानीला राहयला आलो तेंव्हाची आठवण आहे. मुळात आमची इमारत जरा ऊंच अशा टेकाडावर उभी होती. त्यात आमचा तेराव्वा मजला. वर पाहिलं तर आभाळ ऊंच आणि खाली पाहीलं तर जमीन खोल काहीच जवळ नाही अशी परिस्तिथी..फोडणीला टाकलेल्या जि-यासारख्या चिमण्या तडतडताना दिसायच्या आणि माणसं?

"आमच्या वेळी असं होतं" म्हणायचा अधिकार...

 

चंद्रशेखर गोखले

मला वाटायचं "आमच्या वेळी असं होतं" म्हणायचा अधिकार ठरावीक वय झालं की अपोआप मिळतो. पण तसं नाही जो मनापासून आठवणीत रमतो तो कधीही मनातली बोच लपवत हे वाक्य तळमळीने बोलू शकतो. आम्ही पवई हिरानंदानीला राहयला आलो तेंव्हाची आठवण आहे. मुळात आमची इमारत जरा ऊंच अशा टेकाडावर उभी होती. त्यात आमचा तेराव्वा मजला. वर पाहिलं तर आभाळ ऊंच आणि खाली पाहीलं तर जमीन खोल काहीच जवळ नाही अशी परिस्तिथी..फोडणीला टाकलेल्या जि-यासारख्या चिमण्या तडतडताना दिसायच्या आणि माणसं?

माणसं माणसां सारखीच दिसायची ठिपक्यांएव्हढी...अस्तित्व हरवलेली माणसं..भिरभिरणारी, स्थीर नं होऊ शकणारी पण त्यात तिन्हिसांजेला सायकलवरून घणा घणा घंटा वाजवत येणारा फुलपुडीवाला उठून दिसायचा...त्याला बघितलं की मला हरीकाकांची आठवण यायची, हरीकाका म्हणजे माझ्या अगदी लहानपणी आमच्या टुमदार असलेल्या जुन्याघरी तो फुलं द्यायला यायचा..आईनं मायेनं वाढवलेल्या बेलाची जरूरीपुरती पानं खुडायचा. त्या बदल्यात त्याच्या बुंध्याशी खडीसाखरेचा इवलासा खडा ठेवायचा(निसर्गाबद्दल वाटणारी क्रुतद्न्यता व्यक्त करायचा) मग दुर्वा उपटायचा तिथे तांब्याभर पाणी ओतायचा, शंकराला बेल श्रीकृष्णाला तुळस गणपतिला दुर्वा आणि लाल फुल याची उजळणी तेंव्हा शाळेतही घ्यायचे. आता त्याला एव्ह्ढं महत्वं राहिलेलं नाही. पण माझ्या लहानपणी फुलपूडीवाल्याला हरिकाका म्हणण्या इतपत तो आमच्या जिवनात रुळलेला होता...आकाशी रंगाचा सदरा, त्याखाली खाकी हाफ पँट, डोक्यावर गांधी टोपी असा हरिकाकांचा साधा वेष होता, माणूसही साधाच पाणी प्यायला दिलं तर गुळाचा खडा मागणारा...

आमच्या लहानपणींच्या गोष्टीमधे सोन्याच्या कमळाला सुवर्ण कमळ वगैरे म्हणायची पद्धत होती. आणि अशा सुवर्णकमळांचे ताटवे या नाहीतर त्या कथेत असायचेच..मला त्या सुवर्णकमळांचं भारी आकर्षण वाटायचं, मी हरिकाकांना सांगायचो माझ्यासाठी आणाना एक सोन्याचं कमळ.. हरिकाका कधी नाही म्हणायचे नाहीत हसून म्हणायचे ते खूप लांब असतय.. हिमालयाच्या वेशीवर..सुट्टीला गेलो म्हणजे आणीन हरिकाका कधी सुट्टीवर गेले नाहीत आणि ते सुवर्णकमळ कधी माझ्या हातात आलं नाही. पण आता नियमानं येणा-या त्या फुलपुडीवाल्याला बघुन हरिकाकांची आठवण रोज यायला लागली. इतक्या ऊंचावर पहिल्यांदी राहत होतो.

ते ही हक्काच्या घरात...ही मालकीहक्काची जाणीवच आपल्याला सातवें आसमाँन पर नेऊन ठेवते. त्यात आमचा तेराव्वा मजला फुलपुडीवाल्याला हाका मारल्या, टाळ्या वाजवल्या तरी त्या सायकलवरच्या फुलपुडीवाल्या पर्यंत पोहोचायच्या नाहीत. मग तो यायच्या वेळी मुद्दाम खाली रेंगाळायला लागलो. एक दोन दिवसातच मी त्याला गाठलं वेष बदलला असला तरी फुलपुडीवाल्याचा साधारण अवतार तसाच होता. सायकलला दोन्ही बाजुला लटकवलेल्या दोन दोन पिशव्या, कायम घाईत असल्याचा अविर्भाव पण तरी शेवटी मी त्याला गाठलच, त्याला थांबवलं केरळी मुलगा होता. मराठी समजणं शक्यच नव्हतं. हिंदीत सांगितलं म्हंटलं, हमारे यहाँ भी आया करो कितना लेते हो वो बोल दो. जरासा बुजलेला तो केरळी हो हो अशी मान हलवत घाईनं पून्हा सायकलवर स्वार होत गायब झाला. मग पुढचे दोन दिवस त्याची वाट बघण्यात गेले. पण तो फिरकलाच नाही. आम्हाला वाटलं वाँचमन त्याला वर सोडत नसेल पण चौकषी केल्यावर तशी आडकाठी नव्हती...मग राग येणं साहजीक होतं. थोडक्यात माझा इगो हर्ट झाला होता. द्यायचं नव्हतं तर तोंडावर नाही म्हणायचं होतं...ही लोकं मराठी माणसाना समजतात काय?

वगैरे वगैरे विचार सुरू झाले आणि एक दिवस म्हणजे एका तिन्हीसांजेला अचानक तो आमच्या समोर आला आणि तावडीत सापडल्यासारखा मी त्याला पकडलाच म्हंटलं, आया क्यों नही? नही आनाथा तो उसीवकत बोलनेका चुळ्बुळत तो म्हणला आप गलत समजा...मैं फुलवाला लगाना आपको? मग तू फुलवाला नाहीस? असं मी जरा जोरात पण मनातल्यामनात विचारलं.

तो मान खाली घालत म्हणाला "साब अपुन बियर के दुकान में काम करता..रोज आँर्डर का माल पहुँचाने जाता...म्हणजे बियरच्या बाटल्या राजरोसपणे घरी मागवतात? बियरचा दुधासारखा रतिब लावतात? माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तो थांबला नाही...पण आमच्या वेळी असं नव्हतं असं मी पुट्पुटलो आणि स्वता:ला आडवलं. आमच्या वेळी म्हणायला आपली वेळ आलीच कधी होती? अत्ता हक्कानं जगायचं म्हंटलं तर झपाट्यानं बदलेलं जग भोवती आवासून पसरलेलं. चांगलं काय वाईट काय चूक काय बरोबर काय सगळ्याच्याच व्याख्या बदललेल्या अगदी नियमानं फुलपुडीवाला दाराशी येत नसला तरी चालेल एकवेळी पण..पण तिन्हिसांजेला बियर घरी मागवायची म्हणजे...मी उगाचंच व्याकूळ झालो. मला आई आठवायला लागली. हरीकाका आठवायला लागले आणि मग जाणवलं आमच्यावेळी असं होतं म्हणत आपण ज्या काळात रमतो ते वेळ आपली असते. आपल्या नकळत आपण ती जपलेली असते कथेतल्या सुवर्ण कमळासारखी...डोळ्याना दिसली तरी हाताशी नं लागणारी....

- चंद्रशेखर गोखले