Sign In New user? Start here.

chandrashekhar gokhale आटपाट नगर वाटावं असं तेंव्हा आमचं पार्लं होतं. टुमदार बंगले आणि चौसोपी वाडे, मंदीरं, बागा, शेतमळे.. आता आठवणीही दचकवतात.. वाटतं खरच होतं ना हे सगळं? की नुसतेच मनाचे खेळ? नाही नाही पण हे खरच होतं. आता बदललेल्या गावाविषयी मला बोलायचंच नाही...बदल काय काळानुरूप होतच असतात आणि होतच राहणार पण आठवणी?.. त्या ए

मालती आजीचं ‘शिवराम सदन’...

 

चंद्रशेखर गोखले

आटपाट नगर वाटावं असं तेंव्हा आमचं पार्लं होतं. टुमदार बंगले आणि चौसोपी वाडे, मंदीरं, बागा, शेतमळे.. आता आठवणीही दचकवतात.. वाटतं खरच होतं ना हे सगळं? की नुसतेच मनाचे खेळ? नाही नाही पण हे खरच होतं. आता बदललेल्या गावाविषयी मला बोलायचंच नाही...बदल काय काळानुरूप होतच असतात आणि होतच राहणार पण आठवणी?.. त्या एकदा का ठाण मांडून बसल्या की ना काळ बदलत ना स्वरूप बदलत. उलट कलत्या उन्हात जास्त ठळक होत जातात.

गोगटे परिवारांचां टुमदार बंगला असाच मनात ठाण मांडून बसलेला "शिवराम सदन" असं साधं सरळ सुटसुटीत नाव असलेलं मालती आजीचं घर..घरावर कुठलंही नाव ठळक अक्षरात लिहिलेलं असुदे, पण त्याकाळी मुलं आपल्या बालबुद्धी नुसार काहिना काही नावं ठेवायचीच...मालती आजीचं घर म्हणजे मालती आजी सा-या आळीची आजी होती. अवेळी आलेलं वैधव्यं आणि काळानुसार आलेलं म्हातारपण दोन्ही तिने सारख्याच ताकदीने स्विकारलं होतं. घरात मुलंबाळं होती. नोकरचाकर होते. पै पाहूणे असायचेच पण त्या घराला जाग होती ती मालती आजी मुळेच. पहाटे पाचला शिवराम सदनला तिच्या मुळे जाग यायची आणि त्याकाळी रात्री साडेआठला पार्लं गुडुप झालं तरी, शिवराम सदन निजायचं रात्री साडेदहाला..नेम धर्म कुळाचार गाई गुरांचं दाणापाणी बघता बघता आजीला पाठ टेकायला साडेदहा होऊन जायचे.

तीन मुलगे दोन मुली शिवाय दोन पुतणे, एका कानाने बहिरी असलेली भाची असा गोतावळा मालती आजी शिवराम सदन मधे सांभाळून होती. घर आजी सांभाळते म्हंटल्यावर मुलानी व्यवसायात लक्ष घातलं आणि दिन दुगनी रात चौगनी तरक्की करून दाखवली..आमचा त्या संपन्न घराशी घरोबा वाढला.

कारण माझी आई त्यांच्याकडे पोळ्या करायला जायची. आपण पोळ्या करतो म्हणून आईला कधी कमीपणा वाटला नाही आणि मालती आजीने कधी तो वाटू दिला नाही. तुम्हाला काही कळत नाही हे मी आजही दिवसातून किमान दोनदा ऐकत असतो. पण ते वय असं होतं की खरच मला काही कळत नव्हतं. आईच्या पदराला धरून मी सुद्धा त्या संपन्न घरात जायचो आणि मालती आजीच्या मांडीवर बसायचो. हे असं होतं. आठवायला लागलं की...सगळच आठवत राहतं.

व्याकरणात काळ बदलतो, बदलवता येतो पण आयुष्यात काळ बदलतो तेंव्हा फारमोठी किंमत वसूल करतो. बदलत्या काळानुसार शिवराम सदननेही खूप बदल अनुभवले, पचवले, स्विकारले. मालती आजीच्या मोठया मुलाने ठरलेलं लग्नं मोडून पंजाबी मुलीशी लग्नाचा घाट घातला. मालती आजीला तो धक्का पचवावा लागला. मग तिच्या मर्जीनुसार अनेक छोटे मोठे बदल तिला मान्य करावे लागले. तोपर्यंत आमचीही परिस्तिथी आईच्या अथक परिश्रमाने सुधारली होती. शिवराम सदन मधलं आईचं पोळ्यांचं काम सुटलं. पण येणं जाणं सुटलं नाही. सवड मिळाली की आई तिथे जायचीच आणि समोर दिसेल ते काम हातासरशी उरकायची. पण आता पहिल्या सारखा मोकळेपणा शिवराम सदनात राहिला नाही. हे आईलाही जाणवायचं. कर्तबगार मुलं, प्रतिष्ठीत जावई, श्रींमंतांच्या घरातल्या सुना यामुळे शिवराम सदनचा दिमाख वाढला. पण मालती आजी खंगत चालली. आली वेळ ओळखून तिने अंग चोरून घ्यायला सुरुवात केली. कधी नाही ते देवळात जाता येता तिला आमच्याकडे येऊन बसायला उसंत मिळायला लागली. छाया जरा वेलदोडा घालून काँफी करतेस? असं मालती आजीने विचारलं की आईला आनंदही व्हायचा आणि गलबलुनही यायचं वाढत्या गाड्या पार्क करण्यासाठी जेंव्हा आजीची सदा बहरलेली बाग उपटायची ठरलं तेंव्हा तर...पण मग आजीने कशातच जिव घालणं सोडून दिलं, तक्रार करायचा तिचा स्वभाव नव्हता..

पण जवळच्याला तिची वेदना कळायला हरकत नव्हती. पण आजी जवळ होतं कोण? अशात आजी एकदा भर पावसात जिना उतरताना पडली आणि तिने कायम अंथरूण पकडलं. आता उभा जन्मं ज्याचं नाव उराशी बाळगत तिने काढला त्या श्रीरामाचाच काय तो तिला आधार होता. एकदा ढासळलं की सगळं ढासळतच जातं. या नियमानुसार आजीची तब्येत खालावतच गेली. डाँक्टरानी जेंव्हा हात टेकले. तेंव्हा घरची मंडळी जागी झाली आणि आजी भोवती जमा झाली. तिन मुलगे त्यांच्या बायका, दोन मुली त्यांचा प्रतिष्ठीत परिवार, नातवंडं पतवंड केव्हढा गोतावळा नाही?

पण आजीला साथ होती ती फक्तं मनातल्या रामनामाचीच...जमलेला गोतावळा मनातल्या मनात आजी जायची वाट बघत होता. त्याना दू:ख होत नव्हतं असं नाही. पण बाकीचे व्याप इतके होते की दू:ख सुद्धा लिमिट मधे राहूनच करायचं होतं. त्यामुळे आजी गेल्यावर तिचे दिवस कार्य या सगळ्याचा हिशोब प्रत्येकाच्या मनात सुरू होता. तेंव्हा अत्ता सारखे कानाशी धरायला मोबाईल नव्हते. लँड लाईनचाच सहारा होता. शिवराम सदन मधे सहा फोन होते. पण ते ही त्या दिवशी कमी पडत होते. कारण प्रत्येकालाच आपलं प्लँनीगं आखायचं होतं आणि अचानक डाँक्टर म्हणाले धोका टळला...आजींची तब्येत तब्येत सुधारतेय आणि एक भकास वातावरणात पसरलं..घेतलेल्या सुट्ट्या, पुढे ढकललेली कामं यांचा ठोकटाळा मनात जिरवत जो तो आनंद व्यक्त करायला लागला. आजी तू आम्हाला घाबरऊनच टाकलं होतस वगैरे वगैरे ठरलेलं लोक बोलायला लागले. त्यात मी एकटाच असा होतो जो मोकळे पणानी बोलून गेलो आजी तू जायला हवं होतस...आजीनी थरथरता क्रुष झालेला हात माझ्या हातावर ठेवत मला मुक संमत्ती दिली. बाकिचे बोलत राहीले वेडाच आहे असं बोलतात का? याला काही कळतच नाही...

(या प्रसंगावरून सुचलेली कविता...)
सर्पणासाठी तोडलेल्या ओंडक्याला,
एकदा पालवी फुटली,
त्यालाच कळेना ही,
जगायची जिद्द कुठली....!

- चंद्रशेखर गोखले