Sign In New user? Start here.

एका कलाकाराची दुर्दम्य ईच्छा....!

chandrashekhar gokhale वल्लरी कोंडाळकर मी माँडेल कोआर्डीनेशन करत असताना माझ्या संपर्कात आली. त्या काळात केवळ अभिनय क्षेत्रात करियर करायचं या इराद्याने कोकण सोडून मुंबईत डेरेदाखल होणं खरच फार मोठी गोष्ट होती. कारण त्या काळी फार मर्यादीत संधी उपलब्ध होत्या. DD1 सारखी एकमेव वाहीनी हिंदी मालिकांसाठी होती आणि सह्याद्रीवर काही फुटकळ मराठी मालिका शिवाय मराठी रंगभुमी..पण तुम्हाला म्हणून सांगायला हरकत नाही.

एका कलाकाराची दुर्दम्य ईच्छा....!

 

चंद्रशेखर गोखले

वल्लरी कोंडाळकर मी माँडेल कोआर्डीनेशन करत असताना माझ्या संपर्कात आली. त्या काळात केवळ अभिनय क्षेत्रात करियर करायचं या इराद्याने कोकण सोडून मुंबईत डेरेदाखल होणं खरच फार मोठी गोष्ट होती. कारण त्या काळी फार मर्यादीत संधी उपलब्ध होत्या. DD1 सारखी एकमेव वाहीनी हिंदी मालिकांसाठी होती आणि सह्याद्रीवर काही फुटकळ मराठी मालिका शिवाय मराठी रंगभुमी..पण तुम्हाला म्हणून सांगायला हरकत नाही. त्याकाळी मराठी रंगभुमीवरचं पडद्यामागचं वातावरण काही खास नव्हतं. म्हणजे वल्लरी सारख्या निष्पाप उत्साही मुलीसाठी योग्य नव्हतं.

वल्लरी दिसायला लाखोमें एक होती, नुतनच्या धाटणीतली,,, लांबसडक केस आणि स्माईल? पुछो मत....! मला वाटलेलं वल्लरी लगेच बिझी होईल. निर्माते, दिग्दर्शक लगेच तिची दखल घेतील..पण तसं काही झालं नाही. हो म्हणजे दुर्गा खोटे प्रॉडक्शनच्या माहीतीपटात ती झळकायची पण तेव्हढच..तसे मालिका, चित्रपट मिळवण्याचे छुपे मार्ग त्या काळातही होते. पण वल्लरी त्या टाईपची नव्हती..तिचा स्वत:वर विश्वास होता. अभिनयात चमक होती, स्ट्रगल करायची तयारी होती. तीन वर्षांची मुदत तिला घरून मिळाली होती. पण...पण या पण पुढे कुणाचं काही चालत नाही...एक मात्र झालं होतं. उपेंद्र भावसार सारखा उमदा देखणा समंजस मित्र तिला मिळाला होता. आपल्या दोघांचं जमलय हे त्या दोघांच्या लक्षात येत नव्हत. किंवा ते मान्य करत नव्हते. कारण दोघाना करियर करायचं होतं आणि त्यात कोणतीही अडचण नको होती. दोघं जोडीने स्ट्रगल करायचे. जोडीने निराश व्हायचे आणि जोडीने एकमेकाला धीर द्यायचे. वेळप्रसंगी त्या दोघांच्यात मी सुद्धा असायचो चोमडेपणा करायला..

उपेंद्रच्या लवकर लक्षात आलं. तो टेक्स्टाईल डिझायनर होता. त्याने हाताशी आलेली संधी सोडली नाही आणि बाँबेडाईंग मधे तो चिकटला.

वल्लरीचे धक्के खाणं चालूच होतं. घरून मिळालेली मुदत संपत आली होती. येणारे अनुभव सहन नं होणारे होते. ओळखीची माणसं, अवती भवती वावरणारी माणसं संधी मिळताच कशी वागत होती, याचही प्रत्यंतर्तिला मिळत होतं. शेवटी तिने घरी जायचा निर्णय घेतला आणि उपेंद्रने घाई केली. तिला लग्नाचं विचारलं. तिने पण लगेच हो म्हणून टाकलं. उपेंद्रच्या आत्याचं घर राहयला मिळालं. संसाराला सुरळीत सुरुवात झाली. तरी उपेंद्र मला म्हणाला, शेखर वल्लरीसाठी योग्य संधी आली, तर सांग तिच्या सारख्या अभिनेत्रीने चमकायलाच हवं...

आता वल्लरीला आई व्हायचे वेध लागले. पण तिथेही प्रतीक्षा चुकली नाही. लग्नाला चार वर्ष झाली पण...उपेंद्र म्हणाला शेखर तिला कुठेतरी बिझी कर नाहीतर ती विचार करत बसेल. योग जुळून आला की सगळं जुळून येतं तसं झालं.. नेमकी तेंव्हाच मंजूसिंग राजपुतानी ही बिगबजेट मालिका करायला घेणार होती. तिला काँस्च्युम सांभाळायला कोणीतरी असिस्टंट हवी होती. मी वल्लरीला घेऊन गेलो. मी वल्लरीला आँफीस मधे नेलं तेंव्हा खूपच गंभीर वातावरण होतं. राजपुतानी साठी तयारी जोरात सुरू होती. पण काहीकेल्या मंजुसिंगला नायिकाच पसंत पडत नव्हती. अत्ता सुद्धा एका नामवंत हिराँईनला तिने रिजेक्ट केलं होतं. त्यामुळे अख्खास्टाफ अपसेट झाला होता. मी वल्लरीला मंजूसमोर उभी केली आणि वल्लरी तिच्या स्वभावानुसार बोलायला लागली. मंजू तिला निरखत राहीली आणि एकदम म्हणाली, या जॉबचं राहु दे.. राजपुतानीची नायिका बनशील? जोधवा साकारशील? वल्लरीला हा धक्काच होता.

ती रडायलाच लागली. मी तिची सगळी दास्तान मंजूला ऐकवली आणि एका रात्रीत वल्लरी प्रकाशाच्या झॊतात आली.

कोणी नाकं मुरडली, कोणाच्या भुवया उंचावल्या पण उपेंद्र मात्र मनोमन खुष झाला. तेंव्हाच्या प्रथेनुसार त्याने मला दादरच्या प्रकाश मधे ट्रीटही दिली. वल्लरीने बिनादिक्कत करारपत्र साईन केलं. दहा बारा सह्या एका दमात करून टाकल्या. बेंजामीन गिलानी वल्लरीचा नायक होता. दोघांच विथ गेटअप फोटॊसेशन पार पडलं. अख्खा दिवस खूप हेक्टीक होता आणि त्याचा ताण वल्लरीवर येणं साहजीक होतं. ती थोडी आजारी झाल्यासारखी झाली. ते आजारपण नव्हतं. ती चाहूल होती. वल्लरी आई होणार होती. दोन्हीपैकी एक काहीतरी स्विकारायची वेळ वल्लरीवर आली. फारमोठा पेच तिच्यासमोर आहे, असं आम्हाला वाटत होतं. पण वल्लरीने क्षणात निर्णय घेऊन टाकला. जोधवा साकारण्यापेक्षा मला आईचा लाईफलॉंग रोल करायला आवडेल. करार रद्द करणं सोपं नव्हतं. पण मंजूसुद्धा बाई होती.

तिने परिस्थीती ओळखून वल्लरीला करारातून मुक्त केला. वल्लरीला पहिली मुलगी झाली. ती दोन वर्षांची होईपर्यंत दुसरा मुलगा झाला..त्याना सांभाळण्यात ती रमून गेली. कालांतरानी आपापली गोष्ट पुढे नेत आम्ही एकमेकापासून दुरावलो, आता कधी जुनं कोनी भेटलं तरच वल्लरीचा विषय निघतो. एक चांगली आर्टिस्ट म्हणत आम्ही हळहळतो.

पण परवा अचानक भर दुपारी वल्लरी माझ्या समोर उभी... मी पन्नाशी उलटलेला आणि ती?.. ती तशीच पूर्वीसारखी..लाखोमें एक वल्लरी..? मी पुट्पुटत असतानाच ती हसायला लागली. म्हणाली मम्मा म्हणालीच मामा लगेच ओळखेल म्हणून. मला तिने मामा केल्याचा आनंद डोळ्यात दाटत असतानाच ती पाया पडत म्हणाली, मी योगिनी माझा धाकटा भाऊ योगिराज त्याला डाँक्टर व्हायचय.

पण मला मात्र आई सारखं...मी म्हणालो जरा तुझ्या मम्माला फोन लाव. वल्लरीसारखच बेधडक ती म्हणाली, त्याची गरज नाही. मम्मा आणि बाबा तुला भेटायला येणारच आहेत...मी पुढे आले. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. पण वल्लरी तिच्या घरात सुखात असताना तिने तिची प्रतिकॄती माझ्यासमोर उभी केली होती. एका कलाकाराची दुर्दम्य ईच्छा होती. तो ध्यास होता, तो वाया कसा जाईल?....आणि वाया नकोच जायला. जशी वल्लरी साठी मी देवाजवळ प्रार्थना करत असे, नकळत मी या मुलीसाठीही देवाजवळ हात जोडले. तशी वल्लरी सारखीच खिदळत, ती म्हणाली मम्मा म्हणतच होती, तू लगेच देवाला हात जोडशील म्हणून....

- चंद्रशेखर गोखले