Sign In New user? Start here.
"अमृता सुभाषनं घेतले कन्नडचे धडे!!
 
 
zagmag

अमृता सुभाषनं घेतले कन्नडचे धडे!!

Amruta subash learn kannada for marathi movie

भूमिकेची गरज म्हणून कलाकार कितीही कष्ट घ्यायला तयार असतो. अभिनेत्री अमृता सुभाष ही त्यापैकीच एक. उत्तम अभिनयानं स्वत:चा ठसा उमटवलेल्या या अभिनेत्रीनं 'अस्तु' या चित्रपटातील भूमिकेसाठी कन्नड भाषेचे धडे गिरवले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री बी. जयश्री यांच्याकडून तिला कन्नड भाषेचं मार्गदर्शन मिळालं आहे. याच भूमिकेसाठी तिनं राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता.

गौरिका फिल्म्सच्या शीला राव व डॉ. मोहन आगाशे यांनी निर्मिती केलेला 'अस्तु' हा चित्रपट १५ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. डॉ. मोहन आगाशे यांच्यासह इरावती हर्षे, देविका दफ्तरदार, अमृता सुभाष, नचिकेत पूर्णपात्रे, मिलिंद सोमण आदींच्या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची कथा सुमित्रा भावे यांची असून दिग्दर्शन सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांचे आहे. अमृतानं या चित्रपटात माहुताच्या पत्नीची, चन्नमा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या भूमिकेनिमित्तानं लक्ष्मी या हत्तीणीबरोबर काम केलं. त्यासाठी माहुतानं तिची लक्ष्मी हत्तीणीसह एक कार्यशाळाही घेतली.

Amruta subash learn kannada for marathi movie
'मराठी-कन्नड भाषिक अशी ही भूमिका आहे. त्यामुळे बरेचसे संवाद कन्नडमध्ये होते. मला फक्त संवाद पाठ करून बोलण्यात रस नव्हता. संवादांसह मला भाषा समजून घेणंही महत्त्वाचं वाटलं. त्यासाठी ज्येष्ठ अनुवादक उमा आणि विरुपाक्ष कुलकर्णी यांच्याकडून संवाद समजून घेतले. मात्र, कन्नडचा लहेजा शिकवण्यासाठी आईची (ज्योती सुभाष) मैत्रीण ज्येष्ठ बी. जयश्री यांना विचारलं. त्यांनी माझी भूमिकेविषयी उत्सुकता वाटली. मला कन्नड शिकवण्यासाठी त्याच पुण्यात आल्या. मी त्यांचं बोलणं रेकॉर्ड करून घेतलं. त्यांचा लहेजा समजून घेतला. त्यांनी आणि उमा कुलकर्णी यांनी दोन अंगाई शिकवल्या. त्याही चित्रपटात वापरण्यात आल्या आहेत,' असं अमृतानं सांगितलं.

'चित्रपटातील माझी भूमिका छोटी आहे. मात्र, या भूमिकेनं आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. चित्रपटाची संहिताच उत्तम लिहिलेली असल्यानं चित्रपट करताना मजा आली. आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव या चित्रपटानं दिला.

------------------------------------------.