Sign In New user? Start here.
Katyar Kaljat Ghusali - Sachinji Look Launch‘कट्यार काळजात घुसली’ मधील खॉंसाहेबाची भूमिका हा माझ्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट - सचिन पिळगावकर
 
 
zagmag

‘कट्यार काळजात घुसली’ मधील खॉंसाहेबाची भूमिका हा माझ्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट - सचिन पिळगावकर

Katyar Kaljat Ghusali - Sachinji Look Launch

आपल्या कारकिर्दीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केल्यानंतर सचिनजी आजही त्याच जोमात आणि जोशात पुढे वाटचाल करीत आहेत. या वाटचालीत अनेक मैलांचे दगड निर्माण केल्यानंतर आता ते सज्ज झाले आहेत एका नव्या दमदार भूमिकेसाठी. एक अशी भूमिका जी मराठी रंगभूमीवरचा मैलाचा दगड म्हणून ओळखली जाते. मराठी नाट्यसंगीतामध्ये अजरामर असलेलं नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली ज्यातील खॉंसाहेब हे पात्र आपल्या अभिनयाने आणि सदाबहार गायकीने रंगवलं होतं सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित वसंतराव देशपांडे यांनी. याच नाटकावर आधारित ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्यामध्ये खॉंसाहेबांची अजरामर अशी भूमिका रंगवणार आहेत अभिनेते सचिन पिळगावकर. त्यांचा या चित्रपटातील हा ‘लूक’ नुकताच एका विशेष कार्यक्रमांत सादर करण्यात आला यावेळी दिग्दर्शक सुबोध भावे, एस्सेल व्हिजनचे नितीन केणी आणि निखिल साने यांच्यासह सचिनजींचे कुटुंबियही उपस्थित होते.

या वेळी खॉंसाहेबांच्या भूमिकेविषयी बोलताना सचिनजी म्हणाले की, “या भूमिकेसाठी सुबोध भावे यांनी माझ्या नावाचा विचार केला हा माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता. परंतू सुबोधने हा विश्वास दाखवला आणि विक्रम गायकवाड यांच्या रंगभूषेच्या जादूई प्रतिभेने हा विश्वास अजूनच दृढ झाला. या भूमिकेद्वारे मी माझ्या ५२ वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच अशी नकारात्मक छटा असलेली भूमिका करत आहे. कारकिर्दीच्या या टप्यावर ही भूमिका मिळणं हे मी एक अतिशय महत्त्वाचं वळण समजतो. ही भूमिका दोन गोष्टींसाठी माझ्या अतिशय जवळची आहे एक म्हणजे संगीतावरचं प्रेम आणि दुसरी म्हणजे ऊर्दू भाषेची गोडी. खॉंसाहेब हे पात्र बरेली शहरातलं असल्यामुळे या चित्रपटात मी पूर्णपणे केवळ ऊर्दू भाषा बोललो आहे. प्रभावी संवाद आणि सोबतीला अर्थूपर्ण शायरी याने ही व्यक्तिरेखा सजलेली आहे. भव्यतेचा अनुभव देणारी निर्मितीमुल्ये आणि लेखक प्रकाश कपाडिया, छायालेखक सुधीर पलसाने, अभिनेत्री साक्षी तन्वर, गायक-संगीतकार आणि आता अभिनेतेही शंकर महादेवन यांसारख्या हिंदीतील दिग्गज सहका-यांमुळे हा चित्रपट केवळ मराठीच नाही तर तो ख-या अर्थाने भारतीय चित्रपट झाला आहे असं मी मानतो” अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सचिनजींच्या पत्नी सुप्रिया, मुलगी श्रिया आणि त्यांच्या आईनेही या भूमिकेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

दोन संगीत घराण्यातील संघर्षावर कट्यार काळजात घुसलीचं कथासूत्र बेतलेलं आहे. एखादी कला सादर करताना ती कला महत्त्वाची की सादर करणारा कलाकार हे या संघर्षाचं सूत्र. विश्रामपूरचे महाराज विष्णूराज यांच्या दरबारातील गायकाचं पद हे अतिशय मानाचं. शास्त्रीय गायक पंडित भानुशंकर यांनी आपल्या गायकीने राजाचं मन जिंकून राजगायक होण्याचा बहुमान मिळवलाय. परंतू हे राजगायक पद मिळवण्यासाठी एका बाजूने खॉंसाहेबांचाही आटोकाट प्रयत्न सुरू आहे. पुढे अशा काही घटना घडतात की हे पद खॉंसाहेब मिळवतात आणि त्यासोबतच त्यांच्यावर जबाबदारी येते ती स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची आणि हे पद टिकवून ठेवण्याची. पण असं म्हणतात की एखाद्याला यश मिळतं तेव्हा त्यासोबतीने येतो तो अहंकार आणि या अहंकारातून जन्माला येतो एक नवा संघर्ष. हा संघर्ष आपल्या अभिनयातून अतिशय प्रभावीपणे मांडला होता पंडित वसंतराव देशपांडे यांनी. रंगभूमीवर एक नवा इतिहास रचणारी ही भूमिका आता रूपेरी पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे सचिन पिळगावकर यांच्या चतुरस्र अभिनयाच्या माध्यमातून.

------------------