Sign In New user? Start here.
pravin tarde news "प्रवीणचं प्राविण्य
 
 
zagmag

प्रवीणचं प्राविण्य !

pravin tarde news

सध्या मराठी चित्रपट सृष्टीतलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रवीण विठ्ठल तरडे. पुणे जिल्ह्यातील, जातेडे गावाच्या, शेतकरी कुटुंबातील प्रवीणने एमबीए आणि पुढे आयएलएस महाविद्यालयातून विधी शाखेची पदवी घेतली आणि पुढे एक नोकरी देखील सुरु केली. पण मुळचा कलोपासक प्रवीण तिथे रमलाच नाही. घरी, थिएटर किंवा चित्रपटसृष्टी संदर्भातली कोणतीही पार्श्वभूमी नसतांना देखील प्रवीणची आवड त्याला आपोआप ह्या क्षेत्रात घेऊन आली .

'जिथं कमी तिथं आम्ही' - हे प्रवीणचं तत्त्वचं, त्याचं व्यक्तिमत्त्व स्पष्ट करायला पुरेसं आहे. खरं तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अजूनही खूप पैलू आहेत . प्रवीणचं लहानपणापासूनच, बोलणं खूप प्रभावी होतं. कॉलेज मध्ये असतांना १९९७ मध्ये प्रवीणने पहिल्यांदाच एका राष्ट्रीय पातळीवरच्या वक्तृत्त्व स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या प्रभावी वक्तृत्त्वाने नुसती ती स्पर्धा गाजवलीच नाही तर जिंकली सुद्धा, तेही राष्ट्रपतींच्या हातून प्रथम क्रमांक घेऊन ! पुढे कॉलेजमध्ये पुरुषोत्तमचं स्टेजही त्यानं दणाणून सोडलं होतं. पुरुषोत्तममध्ये - लेखन , दिग्दर्शन आणि अभिनय अशी सर्व बक्षिसे घेऊन तो प्रसिद्धीच्या झोतात आला. पुढे त्याने अनेक एकांकिका केल्या. शिवाय अनेक events आणि अनेक मालिकांचं बहारदार लेखन केलं. पहिल्यांदा त्यानं 'कुंकू ' ह्या मालिकेसाठी लिहिलं . ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली ! पुढे 'पिंजरा' , 'अनुपमा' , 'दिल्या घरी तू सुखी रहा' , 'मेंदीच्या पानावर' , 'तुझं माझं जमेना', 'असं हे कन्यादान' अश्या अनेक यशस्वी मालिका प्रवीणने लिहिल्या. अनेक चित्रपटातून त्यानं छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. 'चिनू' , 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'तुकाराम ', 'मसाला ', 'रेगे ', 'कोकणस्थ' ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.

मग चित्रपटाच्या लेखनाचं आणि दिग्दर्शनाचं - शिवधनुष्य त्यानं उचललं आणि पेललं देखिल ! 'देऊळ्बंद ' ह्या मराठी चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शन आणि आपल्या अभिनयानं त्यानं मराठी चित्रपट सृष्टीला ‘देऊळबंद’ सारखा सुपरहिट चित्रपट दिला. देऊळबंद च्या व्यतिरिक्त इतरही अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखन प्रवीणनं केलंय - 'स्टॅंडबाय', 'कुटुंब' , 'अजिंक्य' , 'पितृऋण' , 'रेगे' , 'सुरक्या' , 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी' आणि आगामी 'देऊळबंद २' व 'मुळशी डॉट कॉम ' हे 'हटके' चित्रपटही तो लवकरच घेऊन येतोय.

त्याचं व्यक्तिमत्त्व आणि त्याचं काम एखाद्या झंझावाताप्रमाणे आहे. तो एखाद्या झंझावातासारखा येतो, प्रभाव टाकतो आणि निघून जातो ! गंमत म्हणजे त्याचा हा झंझावात आपल्याला बऱ्याचदा खेळाच्या मैदानावरही दिसतो ! क्रिकेटसकट अनेक खेळ तो लिलया खेळतो . कॉलेज मध्ये असतांना प्रवीण, soft ball चा राष्ट्रीय खेळाडू होता. हाडाचा खेळाडू असलेला प्रवीण जितका रांगडा दिसतो आणि वागतो तेवढाच मनाने तो खूप मृदू आणि हळुवार आहे. मैदान, स्टेज आणि चित्रपटसृष्टी गाजवणारा हा रांगडा गडी खूप पुस्तकं वाचतो हे कोणाला खरं वाटणार नाही पण हे खरं आहे. शिवाय पुस्तकांच्या संग्रहाबरोबर मित्रांचा संग्रह करणे हा देखिल त्याचा आवडता छंद आहे. त्याचे जीवाला जीव देणारे मित्र आणि प्रवीण ह्यांची जुळून आलेली chemistry आणि त्यातून निर्माण झालेले equations म्हणजे दोस्तीची अफलातून ‘मिसाल’ आहे !

सध्या ह्या अष्टपैलू प्रवीणचं, अष्ट नाही पण सहा तरी पॅक्स् कमावण्याचं जोरदार काम चाललंय ! प्रवीणनं, ३१ जुलैपर्यंत सहा पॅक्स् कमावणारच ! असं चॅलेंज दिलंय म्हणे आणि त्यासाठी त्याचं शरीर कमावण्यावर जोरदार काम चाललंय, अत्यंत खवय्या असलेला प्रवीण त्याच्या डाएट प्लान प्रमाणे संध्याकाळी सातनंतर मात्र, काहीही खात नाही. पण हे सगळं तो का करतोय ? मैदानावरच्या कोणत्याही मॅचसाठी नाही, तर त्याच्या आगामी चित्रपटासाठी ! पण हा चित्रपट कोणता ? त्यात त्याची काय भूमिका आहे …. हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे !

------------------------------------------.