Sign In New user? Start here.
Riteish Deshmukh Wishes 'Rakhandar' एखाद्या चित्रपटाशी आपला कुठल्याही प्रकारे संबंध नसतानाही केवळ त्या चित्रपटाचा ट्रेलर आवडला किंवा विषय आवडला म्हणून एखाद्या चांगल्या कलाकृतीला पाठिंबा देण्यासाठी अनेक कलाकार पुढे येताना दिसत आहेत.
 
 
zagmag

“रितेशने दिल्या ‘राखणदार’ला शुभेच्छा"

चित्रपटसृष्टी म्हणजे गळेकापू स्पर्धा, एकमेकांचे पाय ओढण्याची इथे अहमहमिका लागलेली असते, असा समज असतो. मात्र, गेल्या काही काळातील घडामोडी बघता हा समज खोटा ठरवण्याचा विडा चित्रपटसृष्टीतील मंडळींनी उचलला आहे की काय, अशी शंका यावी. एखाद्या चित्रपटाशी आपला कुठल्याही प्रकारे संबंध नसतानाही केवळ त्या चित्रपटाचा ट्रेलर आवडला किंवा विषय आवडला म्हणून एखाद्या चांगल्या कलाकृतीला पाठिंबा देण्यासाठी अनेक कलाकार पुढे येताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार डॅा. मृणालिनी पाटील निर्मित–दिग्दर्शित ‘राखणदार’ या चित्रपटाबाबत घडला असून सध्याचा ‘लय भारी’ अभिनेता रितेश देशमुख याने या चित्रपटाचे ट्रेलर यू ट्यूबवर बघून डॅा. मृणालिनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुख लातूरचा म्हणजे मराठवाड्याचा आहे आणि डॅा. मृणालिनी पाटील याही नांदेडच्या म्हणजे मराठवाड्यातल्याच आहेत. त्यामुळे रितेशने ट्वीटरवरून त्यांना शुभेच्छा देताना ‘मराठवाड्यातून फिल्ममेकर पुढे येत असल्याचं बघून आनंद वाटला’ असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे रितेश सध्या लेह येथे एका चित्रपटाच्या चित्रिकरणात गर्क असतानाही त्याने वेळात वेळ काढून ‘राखणदार’चा ट्रेलर पाहून ट्वीटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नव्हे, तर त्याने डॅा. मृणालिनी पाटील यांनाही व्यक्तीश: शुभेच्छा संदेश पाठवला आहे.

येत्या शुक्रवारी, २६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणा–या ‘राखणदार’मध्ये अजिंक्य देव, जीतेंद्र जोशी, अनुजा साठे यांच्या प्रमुख भूमिका असून यतीन कार्येकर, सतीश पुळेकर, रवींद्र महाजनी, हंसराज जगताप आणि अनुप चौधरी यांनी त्यांना भक्कम साथ दिली आहे. आनंद मोरे लिखित या चित्रपटाचं छायालेखन जहांगीर चौधरी यांनी केलं असून फ. मु. शिंदे आणि प्रकाश राणे लिखित गीतांना कनकराज आणि समीर फातर्पेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. प्रेमकथेच्या माध्यमातून देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा अनोखा प्रयत्न निर्माता–दिग्दर्शक डॅा. मृणालिनी पाटील यांनी ‘राखणदार’ या चित्रपटातून केला आहे. ‘कगार’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती आणि ‘मंथन एक अमृत प्याला’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केल्यानंतर डॅा. मृणालिनी पाटील यांनी ‘राखणदार’ची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे.

 

------------------