Sign In New user? Start here.
"शूटिंगदरम्यान हंसराजने खाल्ला होता मार"
 
 
zagmag

शूटिंगदरम्यान हंसराजने खाल्ला होता मार

shooting of hansraj

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटलं असेल ना ? राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसराज जगताप, इतका गुणी मुलगा आणि त्याला कोणी बरं मारले असावे? ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचा सहकलाकार आशिष गाडे आहे. आशिष एवढा का भडकला की त्याने न रहावून हंसराजला थोबाडीत लगावले? शांतनू अनंत तांबे लिखित, दिग्दर्शित 'यारी दोस्ती' या आगामी सिनेमात हंसराज आणि आशिष हे दोघेही एकत्र दिसणार आहेत. यांच्यासोबतच आकाश वाघमोडे आणि सुमित भोकसे हे दोघेही मुख्य भूमिकेत आहेत.

या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान आशिष हंसराजच्या कानाखाली मारतो असा एक सिन होता. काही केल्या तो सीन नाटकी वाटू नये असा अट्टाहास दिग्दर्शकांचा होता. सिनेमातील उत्तरार्धात असणारा हा सीन नैसर्गिक वाटण्यासाठी अभिनेता संदीप गायकवाड यांनी आशिषला अजून इंटेन्सने अभिनय करण्याचा अनुभवी सल्ला दिला होता. त्यांचा हा सल्ला मान्य करत आशिषने आवेशात येत हंसराजला दुसऱ्या टेकला जोरात कानाखाली लगावली. त्याने इतक्या जोरात मारले की त्याच्या बोटांचे ठसे हंसराजच्या गालावर उमटले. इतका मोठा आवाज झाला की सारे जण हबकलेच. त्यावेळी हंसराजचे वडीलदेखील उपस्थित होते. सर्वांनाच वाटले आता काहीतरी बाचाबाची होईल की काय. मात्र, हंसराजने प्रसंगावधान दाखवत आपला अभिनय सुरूच ठेवला, आपल्याकडून घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळलेल्या आशीषनेसुद्धा मग तात्काळ स्वतःला सावरत संवाद बोलत राहिला. त्यामुळे दिग्दर्शक तांबे यांनीही कॅमेरा रोलिंग सुरूच ठेवत हा सीन पूर्ण केला. सीन पूर्ण झाल्यानंतर मात्र आशिषने हंसराजला मिठी घट्ट मारून माफी मागितली. हंसराज आणि त्याच्या वडिलांनीही हे सर्व पॉझिटीव्हली घेतले.

बिपीन शाह मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट निर्मित 'यारी दोस्ती' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्रेयस राजे, मिताली मयेकर, निशा परुळेकर, अशोक पावडे, नम्रता जाधव आणि जनार्दन सिंग यांच्या ठळक भूमिका पहायला मिळणार आहेत.