Sign In New user? Start here.

‘कोकणी शिमगा …………!

मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू मारण्यापर्यत पडेल ते काम आम्ही सगळी पोरं हव्शेने करतो. मुळात आताच्या पिढीच्या या समवयीन तरुणांनमध्ये एक वेगळी समज आली आहे.

 

कोकणी शिमगा …………!

परळ आगारात चार पाच मोठ्या ब्यागा घेऊन आलेल्या लोकांची गर्दी वाढत चाललेली . जो तो कोकणात शिमग्यासाठी जाणाऱ्या गाड्या पकडायला आलेला. गावातली काही ओळखीचे चेहरे दिसले कि कसा हायस -कोणची गाडी- किती दिवस रजा-देव सोमवारी येयील - यंदा वरच्या आळीच्या भावकिंन एक ड्रेस केलाय - त्या कदमाच्या राजूचा लग्न ठरलाय अशा अनेक रंजक विषयांवर चर्चा रंगते इतक्यात एस टीच्या माईक वर कंट्रोलरच्या भेसड आवाजातली सूचना प्रसारित होते - १० वाजता सुटणारी मंडणगड मार्गी जाणारी मुंबई - दापोली गाडी फलाट क्रमांक ४ वर लावण्यात आली आहे . या गाडीचं आरक्षण असलेल्या प्रवाशांनी गाडीत बसून घ्या .लोक फलाट क्रमांक ४ च्या दिशेनं धावत सुटतात. अंगाखांद्यावर ब्यागा घेत एकदाची विंडो सीट पकडण्यात जी काय मजा आहे ना ती काही ओर्रच. इस्त्री केलेल्या उंची कपड्यापासून ते किडूक मिडूक भरलेल्या पिशव्यांची कमालीची अडचण गाडीभर पसरलेली. कुणी जाण्यायेण्याच्या रस्त्यात बोचकं ठेवून त्यावर बसायची सोय करतो तर कुणी ड्रायवरला मस्का मारीत केबिन मधली जागा पदरात पाडून घेतो. अखेर मास्तरची बेल पडते आणि एकदाची एसटी मार्गस्थ होते.

गाडीत एव्हाना सगळे सेट होतात कुणाचा बसल्या जागेवर खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या झुळकिन डोळा लागतो . तर इकडे तरुण पोर महागड्या मोबईल मधल्या चाटिंग मध्ये टिक टिक करीत असतात. मध्यम वयीन बाया एकमेकींशी बोलण्यात गुंततात.गाडीनं एकदाका मुंबई सोडेपर्यंत बहुतेक सगळेच झिरमलेले असतात. पेंग सरत्या रात्री आणिक वाढत जाते. आणि पनवेल - रामवाडी - गोरेगाव - मंडणगड जाऊन पालगड येतं . कि पुन्हा उतरायच्या तयारीचा एकच कालवा उडतो .वर किती ब्यागा- सीट खाली किती- ती नारंगी रंगाची ब्याग कुठाय , ये उठ दापोली आली . आधी ते केस बांध ,ओ तुम्ही याला पकडा मी घेते पिशव्या नुसता गदारोळ. एसटी मात्र दापोलीच्या दिशने शेवटचा टप्पा पार करीत घुर घुर करीत पळत असते. आणि एकदाचं गाव येत डेपोत उतरलेली माणसं त्याच्या ज्यांच्या -त्यांच्या ठिकाणाकड रवाना होतात . गारठा पडलेल्या सकाळी रिक्षा चिंचोळ्या रस्त्यानं वाडीचा नाका सोडत घरासमोर उभी राहते . बाबू आला म्हणत बाबा पुढ येतात. बारा हायस ना म्हणत गालावरन त्यांचा हात फिरतो .मणभर कामं उपसलेला ह्या करड्या हातात मायेचा मऊपणा आपसूक जाणवतो. अख्ख घर आनंदून जातं मुंबईतून गावात आल्याचा फील इथल्या मोकळ्या हवेत , सारवलेल्या अंगणात, चुलीच्या उबेत आणि आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरच्या आनंदात जाणवायला लागतो. दिवस वर येईसतोवर गावात कोण कोण आलेत याची बातमी याच्या त्याच्या कडून गावभर होते. शिमग्याला न चुकता येत राव्हा बाबानो किती मोट झालाव तरी ……. … पोटासाठी गाव सोडलाव पन रीतभात सोडू नका लेकांनो वाडीचे माझी अध्यक्ष बंडा अण्णा चहाचा घोट बशीत ओततांना पोटतीड्कीन सांगत होते. इतक्या सकाळी आण्णा शेतात जातांना वाटेत कुणीतरी मी आल्याचं त्यांना सागितलं आणि ते वाटमोडून मला भेटायला आल्याचं जेंव्हा कळल तेंव्हा वाटलं गावात अजूनही जिव्हाळा टिकून आहे. रात्री होळीवर भेटूच म्हणत अण्णा पुन्हा वाटधरतात पण त्यांचे शब्द मात्र खूप वेळ कानात वाजत राहतात .तसही हल्लीची पोरं सणासुदीला न चुकता गावात येतात. गणपती ,दसरा ,होळी च्या उत्सवात सामील होतात.

मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू मारण्यापर्यत पडेल ते काम आम्ही सगळी पोरं हव्शेने करतो. मुळात आताच्या पिढीच्या या समवयीन तरुणांनमध्ये एक वेगळी समज आली आहे . होळीला नवीन झाडं तोडण्यापेक्षा पावसात आडवी झालेली रस्त्यालगतची सरकारी झाडं परवानगी घेऊन ती होळीवर आणूया . होळीवर जमलेल्या जास्तीच्या लाकडांचा काही भाग वर्षाभरच्या इतर कामांसाठी ठेवूया ,यंदा होळीसाठी जमलेल्या वर्गणीतली काही रक्कम गावातल्या गरजू मुलांना शालेय साहित्य घेण्यासाठी देवूया, होळीवर येणाऱ्या प्रत्येकाला दारू बंदी सक्तीची करूया अशा लोकउपयोगी गोष्टी जुन्या जाणत्यांना पटवून देत . त्या लागू करून घेण्यात हि पोरं यशस्वी झाली आहेत. हे विशेष . मोठी होळीसंपली कि लगेच गावदेव सानेवर ( गावाचा चव्हाटा ) बसतो . आणि मग दोन दिवस देवाचा मुक्काम एकाच जागी …………दोन दिवसांनी जेव्हा देव गावभर फिरण्यासाठी पालखीत बसतो तेव्हा गावातल्या १२ बलुतेदारांना मान मिळतो मग यात चांभार - कुंभार - न्हावी - गोंधळी-सोनार-गुरव -कुणबी -मराठा -ब्राम्हण या विभिन्न जातीतले मानकरी एकत्र येतात एका बैठकीवर बसतात कोकणातली हि पारंपारिकप्रथा जातीभेत आणि वर्णभेदाला छेद देणारी आहे .शिवाय आता काळानुरूप या प्रत्येक समाजातली नवी पिढी गावकृत्यात पुढे आलीय. उच्च शिक्षित असूनही हे सगळेजण त्यांचा पूर्वजानपासून चालत आलेला मान पुढे कायम चालू ठेवतायत. मग गळ्यात समेळ अडकवून देवाचा जागर घालणारा कुणी इंजिनियर असला तरी किवां देवाला आरसा दाखवणारा कुणी आर्किटेक असला तरी इथे तो देवाचा मानकरी म्हणून न लाजता ह्या सगळ्या धर्मिक कार्यात समरस होत सहभाग घेतो.

मुळात आजच्या या न्यू जनरेशनची be particle हि खासियत आहे .सानेवरून देव पालखीत बसला कि तो १२ वाड्या फिरत संबध गाव पालथा घालतो. प्रत्येक वाडीवर दोन -चार मानकरी ठरलेले. शिमग्याला वर्षांनी देव स्वतः आपल्या घरी येतो अशी समजूत आहे. पालखीतून मिरवत गावदेव जेव्हा आपल्या दारात येतो तेव्हा आनंदाला उधाण आलेलं असतं . तरुण चाकरमनी विरुद्ध-गाववाले असा जंगी ढोल ताशे बडवण्याचा खेळ सुरु होतो . धुपारती घेवून गुरव पालखीच्या सोमर फेर धरतो काही बाया वाडायला लागतात. दह्या दुधाच्या पवित्र अमृताते देवाचे पाय धुतले जातात , सुवासिन तिच्या पदराने देवाचे पाय पुसते पंचारती घेवून मानकऱ्याची मालकीण देवाची आरती करून स्वागत करते. रांगोळीचा सडा अंगणभर पडलेला असतो. देवाला पाय घड्या घातल्या जातात . पण देव मात्र रितीप्रमाणे खरखरीत घोंगडीवरच बसतो. पालखी खाली बसवतांना पुन्हा खेळी गजर करतात आणि एका मिनिटात वाजंत्री शांत होतात. पाण्याचे तांबे मांडवात फिरतात खेळी घटा घटा पाणी पितात खांद्यावरचा ढोल खाली उतरवतात आणि मांडवाच्या खांबाला टेकून जरा लांब होतात.

इकडे देव बसून विसंत घेतोय न घेतोय तोच ओट्या भरण्यासाठी बायकांची झुंबड लागते. गुरव पुन्हा एकदा धूप करतो देवाचा गजर करीत मानकऱ्याच्या बायकोला पहिला मान देतो. डोक्यावरचा पदर सावरत मानकऱ्याची बायको गर्दीतून वाट काढत पालखीच्या दिशेने येताना दिसते. गळ्यातल्या चार पदरी मंगळसुत्राने तिची श्रीमंती अधिक झळकत असते गुरवाला १ ० ० रुपयाची कोरी नोट देत मानकरी गाऱ्हाणे घालायला सांगतो आणि गुरव त्याच्या चढ्या आवाजात "हे देवा भैरी महाराजा " म्हणत मानकऱ्याच्या नावाने देवाला convince करतो. … मानकऱ्याच्या बायकोचं आवरलं कि इतर जणींनीची देवाचं दर्शन घ्यायची घाई उडते . नवस फेडायला आणलेल्या पावशेर पेढ्यांच्या बॉक्स चा आणि नारळाच्या तोरणांचा ढीग जमा होता. हे नवसही मजेशीर असतात. त्यात १० ला पास झाला , लग्न जमलं , नोकरी लागली , आजार बरा झाला , पाळणा हलला ,नवीन घर घेतलं , पोरगा परदेशात गेला . इत्यादी नवसांची मोठी यादी असते. दुपारच्या वेळात पालखी अशाच एका मानकऱ्याच्या घरी विसावली कि वाडीतली सगळी माणसं एकत्र जमतात . दोन तीनशे लोकांचं जेवण शिजत गावातल्या बाया झटून कामाला लागतात . आणि त्यांना सोबत असते ती या तरुण मंडळाची भाजी कापून दे ,तांदूळ निवड , मोठाले टोप चुलीवरून उतर ,लाकड आण ,पत्रावळ्या मांड - जेवण वाढ अशी बरीच बारीक सारीक काम अगदी शिस्तीत आणि स्किलन हि टीम उरकते. पाच -सहा पंगती उठल्या कि पान सुपारी मांडवात फिरते आणि मग मुंबईकर आणि गावठाण असा चर्चेचा फड उभा राहतो.

ती नवीन पार्टी कोणती आलीय र , काय त्या दिलीच्या मुख्यमंत्र्याचा नाव ता ,आणि मुंबईत खराच काय भिंतीवर टीरेन चालते काय ? चाकरमनी झेपतील तेवढ्या प्रश्नांना उत्तरं देतात. पाणी खरी दमछाक होते ती जेंव्हा गावातल्या विषयांना हात घातला जातो. कुण्या मुंबईकर सहज नुसता बोलला हल्ली गावात काजू फणस म्हणावे तसे लागत नाहीत . झालं मग एक एक जाणकार जागा होतो. कुणी हवामान खात्यावर PHD केल्यागत निष्कर्ष सांगीत सुटेल तर मधेच कुणीतरी काहीतरी भलतीच माहिती तुम्हाला पूरवेल याचा नेम नाही पण त्या निमित्ताने शहरी आणि ग्रामीण मतांच मनोमिलन होतं आणि लोक मोकळे व्यक्त होतात . गाव -शिव आणि रूढी परंपरेत दडलेल्या कित्तेक कुतूहल जागवणारे पूर्वीचे किस्से गावठाण खेळी याच बैठकीत उघड करतो .एव्हाना बायांची लगबग कमी झालेली असते . पोर मधेच ताश्यावर एकादी डाव मारतात . मांडवात गावकरी शेत- भाता पासून ते अगदी राजकारणातल्या गप्पा गोष्टीत रमलेले असतात . त्यातच एकदा मुंबईचा चाकरमनी त्याच्या मोबाईल वर फेसबुक चे update पाहण्यात रमलेला असतो . त्याच्या कडक इस्त्रीच्या कपड्यामुळे आणि सुगंधित अत्तराच्या वासाने तो मांडवात अधिक भडक पणे उठून दिसतो. देव जागेवरून उठवायला एक थाप तमाशा होऊदे असा आग्रह कुणी तरी पै पाहुणा करतो. आणि खेळ्यांचा मेन मानकरी ढोलकी वर थाप मारतो. बाईच्या वेशातला १ ० - १ २ वर्षाचा पोरगा पायाला हिसके देत "नाद नका करू सोडा पदराचा काट …. अशी अडवू नका वाट … भावोजी नका धरू हात " या गाण्यावर ताल धरत त्याची पावलं थिरकायला लागतात. गण -गवळण जागर घालीत तासभर हा तमाशा चालतो.दरम्यान बऱ्याच जुन्या लोकगीतांची उडती चाल मनात फेर धरते. रंग अधिकाधिक चढत जातो. आणि तमाशा थांबला कि विसाव्याला बसलेला देव उठवायचा हुकुम मानकरी देतो . खेळी (पालखी सोबतची सेवेकरी मंडळी) उठतात खिशातून बटवा बाहेर काढून तंबाकू हातावर चांगल मळून एक बार तोंडात टाकतात आणि ढोल ताशे पुन्हा गळ्यात अडकवतात . गुरव पण तयारीला लागतो देवाच्या पालखीत जमलेले पैसे नारळ काढले जातात पुन्हा धूप घालून गाऱ्हाण घातलं जातं मानकरी पालखी उचलतो आणि अंगणात येतो . देव परत जायच्या आधी आपल्या दारात देव नाचला पाहिजे म्हणून मानकरी पालखी खांद्यावर घेतो. ताशे बडवले जातात आणि ठेक्यात पालखी अर्धा एक तास घुमते. अंगणात तांदूळ , फुलं आणि अंगाऱ्याची उधळण होते . खेळी पालखी आपल्या ताब्यात घेतात आणि देव पुन्हा त्याचा मार्गाला लागतो. दूर -दूर त्याचा ढोल घुमत असतो . पुढच्या वर्षी पुन्हा येतो मानाने म्हणत रस्त्याला लागेलेल खेळी आणि पालखी हळू हळू दिसेनाशी होते . ढोल ताशे हवेत विरून जातात चाकरमनी कपडे गुंडाळतो आणि पुन्हा मुंबईच्या एसटीत बसतो . टीचभर पोटा साठी घरदार सोडून पुन्हा शहरांच्या या गर्दीत पैसा मिळवायचाय या विचारत त्याला झोप लागते आणि सकाळी पहाटे मास्तर दादरला कोण हाय काय उतरणारं अशी दमात हाक मारतो आणि पुन्हा जाग येते.

लेखक - संतोष टाकळे

सौजन्य - युवा साप्ताहीक

 
 
 
 
 
IMAGE पळभरी तू झोप सुर्या जागलो आहोत आम्ही
सुधीर मुळीक .   पळभरी तू झोप सुर्या जागलो आहोत...
IMAGE छोटी गोष्ट कळाली डोळ्यांना पुसल्यावर
सुधीर मुळीक   छोटी गोष्ट कळाली डोळ्यांना पुसल्यावर छोटी...