Sign In New user? Start here.

दिवाळी दिवाळी आली...

 
     
 

अदिती मोहिले
दिवाळी दिवाळी आली...

दिवाळी म्हणजे फटाके, दिवाळी म्हणजे अभ्यंग स्नान, दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे नवीन कपडे, दिवाळी म्हणजे रांगोळी, दिवाळी म्हणजे पणत्या, रोषणाई. दिवाळी म्हणजे लांबलचक सुट्टी, दिवाळी म्हणजे घराची साफसफाई.

यातल्या कुठल्याही एका कारणासाठी किंवा संपूर्ण package deal साठी म्हणा मला दिवाळी अतिशय आवडते. लहानपणी, आम्हाला दिवाळीच्या एखादा आठवडा आधी सुट्टी पडायची. हुशार मुलं पटापट दिवाळीच्या अख्या सुट्टीसाठी दिलेला अभ्यास उरकून टाकायची. पण मला ते तंत्र कधीच नाही जमलं. दिवाळीच्या आधी आम्ही waste मधून best तत्वावर आकाश कंदील बनवायचो, पणत्या आणून त्या रंगवायचो. आणि दुपारी उन्हात मनसोक्त १ रुपयात भाड्याची सायकल फिरवत बसायचो. ४ दिवस आधी मग दिवाळी ची साफसफाई चालू व्हायची. सगळ्यात आवडीचं काम म्हणजे भिंती धुवायच्या आणि साबणाच्या पाण्याने फरशी धुवायची. मी आणि दादा एकेक कोपरा वाटून घ्यायचो आणि मग कोणाचा जास्त लखलखतोय यावर आई आम्हाला दिवाळीला एक करंजी extra द्यायची.

आई फराळाची जय्यत तयारी करायची आणि खास करंज्यासाठी फक्त मी आईला मदत करायचे.. ती फक्त मदत नसायची तर मी आई आणि आजीचा तो bonding day असायचा.. काही वर्षाने आजी गेली, मी अमेरिकेला गेले आणि तो करंजी special दिवसही हरवला. पण आता परत आल्यावर आवर्जून आईबरोबर ती परंपरा चालू ठेवलीये.. जसा करंजी special day , तश्याच आमच्या करंज्या उर्फ कानोलेही special. सुदैवाने मी लग्नानंतर CKP घरात गेल्याने तिथेही तश्याच special करंज्या बनतात. अमेरिकेत असताना एकदा घरी कोणीतरी बख्लावा नावाचे स्वीट आणले. आणि त्यातले ingrediants वाचून माझ्या करंजीच्या stuffing चा मला साक्षात्कार झाला. माझी special करंजी recipe बघायला येथे click करा.

संपूर्ण वर्षभरात कधीही स्वतःहून न उठणारे आम्ही, पहिल्या दिवशी नरकचतुर्दशीला न हाक मारता पटकन उठायचो. आईच्या पहिल्या उटण्यावर कोणाचा हक्कं हे ठरवायला, मिट्ट काळोखात कुडकुडत आंघोळ करायला, पहिल्या अंघोळीला, नरकासुराला मारल्याबद्दल सगळ्यात पहिला फटका कोणाचा हे नंतर मित्रांमध्ये brag करायला.. खाली मनसोक्त फटके उडवून झाल्यावर दिवाळीसाठी नवीन शिवलेले कपडे घालून देवळात मिरवायला जाण्यामागचा आनंद काही औरच असायचा. सगळे भावुक (?) तरुण मंडळी देवळाच्या बाहेर गर्दी करायचे, आजही करतात पण त्यामागचे कारण देव हे नसून fashion parade होता हि बात वेगळी. देवळातून घरी आल्यावर एकत्र फराळ.. पहिल्या दिवसापर्यंत आई, केलेला फराळ कुठेतरी लपवून ठेवायची जो आम्हाला आजतागायत कधीही मिळाला नाही. फराळानंतर रांगोळी काढायला बसलो की २-३ तास सहज. beginners ठिपक्यांची रांगोळी काढायचे. मला ते जास्त कठीण वाटायचं म्हणून मग मी कार्टून characters पासून सुरवात केली ते scenes आणि मग थेट portraits.

रात्री गच्चीवरून मोठी मुलं रॉकेट्स लावायची. आम्ही लक्ष्मीपूजनाला गेलो तरी घाई घाईत घरी यायचो ते गच्चीतली रोकेट्स बघायला. रंगबिरंगी, महागडी रॉकेट्स बघून त्याचा अंदाज लावायचा कितीचे असेल याचा. भाऊबीजेला मात्र आकाशात दिव्यांची पार्टी असायची.. ती आजही तितकीच असते पण आता रस्त्यावर दिव्याचा प्रकाश इतका जास्त असतो (आणि बहुतांशी टोवेर्सना गच्ची नसते) कि पूर्वीइतकी रॉकेट्स ची मजा लुटता येत नाही. गेले काही वर्ष आम्ही एक दिवस मुरबाडला खास फटाक्यांसाठी जातोय. तिथल्या मिट्ट काळोखात अनार, भुईचक्र सुद्धा हिऱ्यासारखे उठून दिसतात.

आमच्या लहानपणी संध्याकाळच्या काळोखाची एक अनोखी खुबी होती. पणत्या, दिव्यांच्या माळा सगळी रोषणाई म्हणजे अख्खी मुंबई लग्नघरची वाटायची. ते लग्न पण घरचंच आणि सगळे वऱ्हाडी पण त्यात उत्साहाने भाग घ्यायचे. आता काळानुसार काही गोष्टी बदलल्यात. बरचसं outsource केल्यासारखं वाटतं. फराळ तर फारच कमी घरी बनतो. बनवणाऱ्या गृहिणींना यात गृहित धरण्यापेक्षा खाणारे पण तितकेच हौशी? वर्षभर मिळणाऱ्या सगळ्या फराळाच्या items मुळे, आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे, पूर्वीसारखा वेळ राहिलंय कुठे? वर्षभर नवीन कपडे येताच असतात. अभ्यंग-स्नानासाठी आळस केला जातो. सकाळचे ८ म्हणजे हल्लीची नवी पहाट. पण हे सगळे असूनही, दिवाळीचा तो हवेतला एक खास सुगंध (फटके मिश्रित), गुलाबी थंडी, shopping साठी मार्केट मध्ये उडालेली झुंबड, उत्साहाने नवे कपडे घालून नटलेली मुली मुले, फटके उडवतानाची छोटी मुले, लक्ष्मीपूजनाच्या रात्री मार्केट मधल्या भाजीवाल्यांच्या दिवाळी, पणत्यांची रांग, आणि अजूनही आईच्या हातचा फराळ खाणारे आम्ही (खाली चटई वर बसून) ....हे तर सगळं अजूनही आहे तसंच आहे.. माहेरी आल्यासारखं .. आपलेपणाचा ओलावा जपावं असं..

अदिती मोहिले