Sign In New user? Start here.

 
     
 

सुभग ओक
हे जीवन सुंदर आहे ....
(1)

सुरेश वाड:
माझे वय ४५. वयाच्या १८व्या वर्षी, दिवाळीचे फटाके उडवताना, एक सुतळी बॉंब माझे डोळे घेऊन गेला. माझ्या पाठी तो बॉंब कोणी लावला हे आज हि मला मला माहित नाही... कधीच ते कळणार नाही!

माझे डोळे परत आलेच नाहीत पण म्हणून माझी दृष्टी गेली नाही. डोळे असताना न दिसलेले रंग मला त्या अपघातानंतर दिसू लागले.... हि दुनिया किती सुंदर आहे ते मला डोळे नसून दिसत गेले.

आज दिवाळी आहे आणि ह्या वर्षी हि दरवर्षी प्रमाणे काही विशेष व्यक्तींचा सत्कार करायचे आमच्या संस्थेने योजिले आहे. तोच हा कार्येक्रम, मी विंगेत उभा राहून पडदा वर जाण्याची वाट बघतोय....

आयुष्यात ‘मानाने’ मोठ्या व्यक्ती खूप असतात, पण खरी मेहनत करून, हि दुनिया सुंदर करणाऱ्या व्यक्ती फार दुर्मिळ, स्वतःला जे मिळत नाही ते दुसऱ्याला देणारी माणसं मला नेहेमीच मोठी वाटत आली आहेत. अशाच माणसांचे सत्कार आम्ही करतो.... कारण ते प्रेरणा देतात आणि आम्ही त्यांना उत्तेजन देतो. समाजाला अशा यशस्वी माणसांची ओळख करून द्यावी हाच हेतू मनात धरून आम्ही प्रत्येक दिवाळी ला हा उपक्रम राबवतो. ह्या व्यक्तींकडून काही-ना-काही शिकायला मिळतं म्हणून हा अट्टाहास. ज्या दिवाळीने माझे ‘बघणे’ माझ्यापासून हिरावून घेतले, त्याच दिवाळीला आम्ही हा “नेत्र-दीपक” उत्सव साजरा करून, ह्या समाजाला नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो.

आजपर्यंतचे माझे आयुष्य खड-बडीतच आहे. मला इंजिनियर व्हायचे होते पण अचानक आलेल्या अंधत्वामुळे मला कमी मार्क मिळाले, पण एक नवी दिशा सापडली. "सायन्स" ला न जाता, मी "सोशिअल-सायन्स" विषय घेतला. मला लोकं आणि नाती आवडू लागली, मी त्यांच्यासाठी जगू लागलो...... मी स्वतः लोक प्रतिनिधी कधी झालो हे कळलच नाही. आमच्या वस्तीच्या गरीब मुलांना शिवकु लागलो, त्यांना स्वतःच्या पायावर

उभे राहायला मदत करू लागलो.....चालताना मला काठी लागत असताना, मी अनेक मुलांचा आधार झालो. अजून तो मुलगा मला चांगलाच आठवतो जो मला २२ वर्षा पूर्वी भेटला होता ..... आमच्या वस्तीतला, मुन्ना. काय तेजस्वी होता तो, बुद्धिमान होता आणि खूप मेहेनती ही होता. त्याचे संपूर्ण नाव मला आजही माहित नाही. जेव्हा मुन्ना मला सापडला तेव्हा तो प्रचंड घाबरला होता, त्याच्या वडिलांची नोकरी गेली होती आणि घर चालवायला ते त्याला कुठलेतरी काम करायला जबरदस्ती करत होते... पण त्याला शिकायचे होते आणि म्हणून तो माझ्याकडे आला, आधारासाठी...मी त्याला शिकवले. पण माझे आयुष्य वाऱ्यासारखे बेभान.... मी स्थलांतर केले आणि मग त्या मुलाचे काय झाले देव जाणे ... पण काहीतरी चांगलेच झाले असणार कारण हे जीवन सुंदर आहे.

माझे आयुष्यपुराण पुरे झाले. पडदा वर गेला आहे, सत्कार समारंभ सुरु झाला आहे ..... प्रमुख पाहुणे आले आहेत आणि कार्येक्रमाची रूपरेषा खूप मोठी आहे. प्रेक्षक ही मोठ्या संखेने आले आहेत कारण त्यांना हि आजच्या सत्कार-मूर्ती पहायच्या आहेत, त्यांना ऐकायचे आहे....माझ्या पोटात मात्र गोळा आला आहे. टाळ्यांच्या गड-गडाटात आजच्या पहिल्या मान्यवर सत्कार-मूर्तीला पाचारण केलं गेलय .... त्यांची गोष्ट ते लोकांना सांगायला लागले. ते उभे राहिले आणि माईक समोर आले आहेत. माझ्या सारखे मनात येत होते कि मी ह्या व्यक्तीला कुठे तरी ऐकलेले आहे, आवज ओळखीचा वाटत होता.... पण काहीच आठवत नव्हते. असो, ते मान्यवर बोलू लागले, त्यांचे वय जास्त नव्हते...

दीपक डोईफोडे:

माझे वय ३० वर्षे आणि माझे नाव दीपक डोईफोडे. आज मी “सॉफ्ट-कॉम” ह्या अमेरिकन कंपनीचा चीफ एक्झिक्य़ूटीव ऑफिसर आहे. पण मुळात मी मुंबईत राहायचो, परळला.... कपडा-मिल च्या समोरच्या झोपडपटीत.. तिथेच मी जन्माला आलो, तिथेच मी खरा “मोठा” झालो. रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केलाय मी, खेळलो आहे मी आणि त्याच दिव्यात दिवाळी साजरी केली आहे मी लहानपणी.

माझे वडील परेलच्या कपडा-मिल मध्ये काम करायचे आणि माझी आई घर काम करायची. मी आणि माझी बहिण समोर म्युनिसिपाल्टीच्या शाळेत जायचो. आमच्या बाजूला एक मुलगी "नूर" आणि तिची आई राहायची.

नूर सुद्धा आमच्या बरोबर शाळेला यायची. नूर माझी खूप चांगली मैत्रीण होती....माझ्यावर खूप प्रेम करायची. तिच्या अम्मीने बनवलेले गोड-धोड मला खायला घेऊन यायची, माझ्याशी खेळायची आणि

माझ्यासोबत अभ्यास हि करायची. एक दिवशी घराबाहेर खेळत असताना माझ्या बहिणीचा अपघात झाला आणि त्यातच ती देवाघरी गेली. माझ्या आईच्या मनावर तिच्या मृत्यचा वाईट परिणाम झाला आणि त्यामुळे ती तिचे मानसिक संतुलन हरवून बसली. अचानक आमचे ‘सुखी’ जीवन खूप-खूप कठीण आणि अवघड झाले. बाबा दारू पियू लागले... मला मारू लागले. त्यातच त्यांची नोकरी गेली. मग ते मला नोकरी करायला जबरदस्ती करू लागले.

माझे हाल हाल करायचे....काम करायला ओढत घेऊन जायचे.... माझे वय फक्त ७/८ वर्षाचे असेल. मला ते अजिबात आवडत नव्हते कारण मला शिकायचे होते, शिकून मोठे व्हायचे होते.

बाबांच्या धाकला घाबरून मी आमच्या लोकप्रतिनिधी काकांकडे कडे गेलो. मला त्याचे नाव नाही आठवत, पण त्याने मला खूप मदत केली त्यावेळी. मी सकाळी नोकरी करू लागलो आणि रात्री शाळेत जाऊ लागलो. मला अभ्यासाची गोडी होतीच आणि मी हुशार हि होतो त्यामुळे मला शाळा खूपच आवडायची. घरी पैसे येत होते म्हणून बाबा हि खुश होते. पण म्हणतात ना.... देवाला चांगल्या गोष्टी आवडत नाहीत. दारूच्या नशेत बाबा देवा घरी गेले, आई पाठो-पाठ. वयाच्या १४व्या वर्षी आई-बाबा-घर सगळे सगळे गेले. नूर सुद्धा हरवली ....तिला तिच्या आईने कोणाला तरी विकले असे समजले ....

देव नेतो .... पण काहीतरी देतो हि....अशा परीस्थित एक देव माणसाने माझी मदत केली, त्याच आमच्या लोकप्रतिनिधी काकांनी.... त्यांनी मला शाळेत प्रगती करताना पहिले होते. त्यांनी मला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. पुढे मोठेपणी मी त्यांना विचारले कि “सर तुम्ही मला मदत कशी केलीत, तुमची परिस्थिती हि बेताचीच आहे, शिवाय तुम्हाला दिसत नाही .... तुम्ही हे सगळे कसे करता?”. ते म्हणाले होते ... “मुन्ना, तुला मदत करणारा दुसरा कोणीतरी आहे, त्यांनी तुला आपल्या शाळेच्या विज्ञान संमेलनात पाहिलं होते.... पण त्यांना हि मदत निनावी करायची आहे.... तेव्हा तू पुन्हा कधीही हा प्रश्न विचारू नकोस, फक्त शिक.... त्यांची हि आस्था, तुझ्यावरचा भरवसा, तुझ्यावरचा विश्वास खरा ठरव.” तेव्हा तो देव-माणूस कोण आहे हे मला आज हि माहित नाही... पण जसा देव असतो पण दिसत नाही ...तसेच ते हि आहेत.

मी खूप शिकायचे ठरवले....कॉलेज पूर्ण केले... इंजिनिअर झालो. पुढे अमेरिकेत शिक्षण केले आणि नोकरी ही .... खूप मोठा झालो, खूप पैसा मिळवला, कपडा-मिलच्या जागी असलेल्या हाय-राईज बिल्डींग मध्ये पेंट हाउस आहे. दर दिवाळीला मुंबईत येतो, त्याच माझ्या वस्तीत जातो. आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगितली कारण, दिवाळी म्हणजे सुखाचे ते क्षण... पण प्रत्येक सुखामागे दुख लपलेले असते. आज मी सुखी आहे पण तृप्त नाही कारण आज ही मी ३ व्यक्तींच्या शोधात आहे. त्या चांगल्या माणसाच्या ज्याने माझे "शिक्षण" सुरु ठेवले, त्या भल्या माणसाच्या ज्याने मला शिक्षणासाठी "शिष्यवृत्ती" दिली आणि माझ्या छोट्या नूरच्या ........

पुढील पानावर >>