Sign In New user? Start here.

 
     
 

जनार्दन केशव म्हात्रे
 
संकटे..

संकटे येतात... अपुला हात हाती घालुनी
का, म्हणे तर एकट्याला लावतो परतावुनी

पाहतो गर्दी सभोती, दूरवर दु:खेच दु:खे
शोधतो आहे सुखाला टाच मी उंचावुनी

एकटा शस्त्राविना हा... मी उभा समरांगणी
प्राक्तनाला घाम फुटतो, झुंज माझी पाहुनी

मी न प्याद्यांच्या पल्याडुन आणतो घोडा कधी
थेट राजालाच देतो मात... ती ही सांगुनी

केवढे संदर्भ सारे... घेवुनी जगतोय मी
जीवनाला नेमके मी काय द्यावे यातुनी?

एकट्या-दुकट्या तडाख्याने न काही व्हायचे
वादळा, खुश्शाल ये तू.. घे मला अजमावुनी

काय रे दु:खा तुझा हा हट्ट, सोबत यायचा
बिकट आहे वाट ही, थकशील मित्रा चालुनी

- जनार्दन केशव म्हात्रे