Sign In New user? Start here.

जुनं ते सोनं...

 
     
 
जुनं ते सोनं...

सिनेमा मनोरंजनाचं आणि माहितीचं एक प्रभावी माध्यम म्हणून प्रसिद्ध असल्याचे आपणा सर्वांना माहिती आहे. परिवर्तन, विकास हा समाजाचा एक महत्वाचा भाग आहे. त्यानुसारच इतर घटकांप्रमाणे सद्या मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत अशी काही लोकांची धारणा आहे. काहीप्रमाणात ती खरीही आहे. पण मराठी सिनेमातील कोणत्या गोष्टीला चांगले दिवस आलेत हे बघणेही महत्वाचे वाटते. एकंदर आपलं रूप बदलवलेला मराठी सिनेमा बघता जुन्या गोष्टी नव्याने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा ट्रेंड आता समोर येत असल्याचं दिसून येतय. सोबतच ग्रामीण भागातील संवेदनशील विषयांवर देखील अनेक सिनेमे तयार होत असल्याचंही दिसून येतंय. एकंदर असं म्हणता येईल की, मराठी सिनेमाला चांगले दिवस आले आहेत ते त्यांच्या दर्जेदार विषयांमुळे....मला वाटतं असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

महाराष्ट्राच्या मातीत अनेक कला अनेक काळांपासून रूजलेल्या आहेत ज्या आपण नेहमी वाचत आणि पाहत असतो. ज्याप्रमाणे प्रतिभावंत कलाकार मराठीत दिसतात तसेच प्रतिभावंत लेखकही महाराष्ट्राच्या मातीत बघावयास मिळतात. मराठी सिनेमांमध्ये जुन्या काळातील मोठ्या कलाकारांवर आणि प्रसिद्ध साहित्यकृतींवर सिनेमे बनवण्याचीही एक लाट इतक्यात आलेली दिसते. अलिकडचेच उदाहरण द्यायचे झाल्यास मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवर तरूण दिग्दर्शक सुजय डहाके याने उत्तम चित्रपट बनवला. त्यापाठोपाठ व.पु.काळे यांच्या ‘पार्टनर’ या कादंबरीवर आधारीत ‘श्री पार्टनर’ सिनेमा तयार करण्यात आला. आणि प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांच्या ‘उचल्या’ या कलाकॄतीवर सुद्धा एका चित्रपटावर काम सुऋ आहे. त्याआधी आत्मचरीत्रपर चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस आलेत त्यात ‘बालगंधर्व’, ‘नटरंग’, ‘हरीश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमांचा उल्लेख करावाच लागेल. येत्या काळात व्यक्तीमत्वावर आधारीत काही सिनेमे येऊ घातले आहेत त्यातील एक महत्वाचा म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट असणार आहे. महाराष्ट्रात अनेक जुन्या रूढी-परंपरावर अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एका विषयावर ‘जोगवा’ हा सुद्धा सिनेमा रसिकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर आलेला ‘काकस्पर्श’ हा देखील लोकांना पसंत पडला. या सर्व सिनेमांच्या विषयांकडे एक नजर टाकली तर असे दिसून येते की, मराठी निर्माते - दिग्दर्शक सिनेमाच्या विषयांच्याबाबतीत अधिक गांभीर्याने विचार करीत आहेत. आणि दुसरा मुद्दा असा की ग्रामीण कथांवर आधारीत अनेक चांगले चित्रपट तयार केले जात आहेत. त्यात ग्रामीण भागातील प्रश्न, चांगले विषय हाताळले जात आहेत. जरी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मॉल संस्कृती आली असली तरी

ग्रामीण भागातील विषयांना घेऊन चित्रपट तयार करणे हे मराठी चित्रपटसॄष्टीसाठी काही नवीन नाही. पण त्याच विषयांना नव्याने मांडण्याची पद्धत आता बदलली आहे. दिग्दर्शक, कलाकार, लेखक आणि काही निर्माते चित्रपटाच्या विषयांचा सखोल अभ्यास करायला लागले आहेत. त्यामुळे मराठी सिनेमा जागतीक पातळीवर झेंडा रोवून येतोय. ही गोष्ट खरंच लक्षात घेण्यासारखी आहे. बरं विषयांबाबत फक्त मराठी सिनेमाच गंभीर झालाय असं नाहीये. तर मराठी मालिका आणि मराठी रंगभूमी सुद्धा जुन्या विषयांच्या आणि कलाकृतींच्या प्रेमात पडल्याचं दिसून येतं. ‘उंच माझा झोका’ हे त्याचेच एक उदाहरण देता येईल. सोबतच निर्माता-अभिनेता सुनील बर्वे यांनी केलेला जुन्या नाटकांचा हर्बेरियम उपक्रम सुद्धा याचाच एक भाग आहे. तसेच ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘कट्यार काळजात घुसली’ या सारख्यां प्रसिद्ध संगीत नाटकांचेही पुनरूज्जीवन करण्यात आले. या सर्वात एका गोष्टीकडे कदापि दुर्लक्ष करता येणार नाही ती म्हणजे नव्या पिढीला आणि प्रेक्षकांना ह्या सर्व गोष्टी आवडायला लागल्या आहेत. हे सर्व पाहता ‘जुनं ते सोनं’ हे वाक्य सतत आठवतं. पण हेही तितकंच खरंय की, त्याच विषयांवर तयार करण्यात आलेल्या कलाकृती तितक्याच ताकदीने आणि उत्तमपणे तयार व्हायला हवी. तरंच त्या कलाकृती प्रेक्षकांच्या मनात घर करतील...

अमित इंगोले