Sign In New user? Start here.

आयना का बायना- घेतल्या शिवाय जाईना

 
     
 

समीत कक्कड
आयना का बायना- घेतल्या शिवाय जाईना

सद्या मराठी इंडस्ट्रीत पठडीबाहेरचे विषय घेऊन सिनेमा तयार करण्याला चांगलीच बहार आलेली दिसून येतेय. नवीन विषय, नवीन कलाकार, नवी दिग्दर्शक यांच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातंय. असाच एक वेगळ्या पठडीतला ‘वेस्टर्न डान्स’ या विषयावरील ‘आयना का बायना’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आत्तापर्यंत मराठी सिनेमात तुम्ही ‘लावणी’ बघितली असेल, मात्र आता चक्क हिप-हॉप, जॅझ, बचाटा असे वेगवेगळे डान्स प्रकार या सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला पहायला मिळणार आहे. ‘हुप्पा हुय्या’ चे निर्माते अमर कक्कड आणि पुष्पा कक्कड यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन समीत कक्कड यांनी केले आहे. मराठीत पहिल्यांदाच अशा विषयावरील सिनेमा असल्याने प्रेक्षकांसाठी हा सिनेमा एक वेगळाच आनंद देणारा ठरेल....या सिनेमाबाबत समीत कक्कड यांच्याशी केलेली बातचीत...

* हुप्पा हुय्या नंतर ‘आयना का बायना’ हा तुझा नवीन सिनेमा येतोय. त्याबद्द्ल सांग.

- ‘आयना का बायना’ ही एक डान्स फिल्म आहे. सिनेमाचं कथानक आहे विजयाचं...! मराठी सिनेमात पहिल्यांदाच असा वेस्टर्न डान्सचा विषय घेऊन सिनेमा तयार केला जातोय. ज्यातून आम्ही वेस्टर्न डान्सचे वेगवेगळे प्रकार दाखविणार आहोत. त्यात तुम्हाला हिप-हॉप, बचाटा, स्ट्रीट जॅझ असे अनेक वेस्टर्न डान्स प्रकार पहायला मिळतील. प्रत्येक माणूस हा आपल्या पद्धतीने डान्स करीत असतो. कुणी आनंदासाठी, कुणी दु:खात, कुणी होपसाठी, कुणी एनर्जीसाठी, तर कुणी मनात सुद्धा डान्स करतच असतो. डान्सची संकल्पना ही वर्ल्ड वाईड आहे आणि तेच मला या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवायचं आहे.

* आजचा बदलता मराठी सिनेमा बघता अशा पद्धतीचा विषय घेऊन मराठी सिनेमा बनवण्यात रिस्क नाही का वाटली?

- नहीं रिस्क तो नही लगी.! कारण, 'Film is all about entertainment'. मी या चित्रपटाच्या माध्यमातून एक रिअ‍ॅलिटी समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. आज प्रत्येक घरात प्रत्येकाला डान्स करावा वाटतोच. 'Every family wants to dance'. पण प्रत्येकाची डान्स करण्याची पद्धत वेगळी असते. डान्सचं प्रत्येकाच्या जीवनात काय स्थान आहे हेच आम्ही यातून समोर आणतोय. ही कथा आपल्या प्रत्येकाची आहे, ती एका वर्गासाठी नाहीये. त्यामुळे या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल, याची मला खात्री आहे.

* एका डान्स फिल्मचं तू दिग्दर्शन करतोय, पण तूला डान्स येतो का?

- हा हा हा...! "डान्स तो मैं बचपन से ही करतां हूं..! बहोत लोगोने मुझे खुब नचाया और मैने भी बोहतोंको नचाया...". मला वेगवेगळ्या प्रकारचे डान्स शिकण्याचीही आवड आहेच. पण ह्या डान्स फिल्मचं दिग्दर्शन करताना मला या सर्व डान्स प्रकारांचा अभ्यास करावा लागला. आमचं शुटींग चालू असतांना माझे सिनेमटोग्राफर संजय जाधव यांच्यासोबतच सेटवरील सर्वच युनिट माझ्या कलाकारांकडून रोज अर्धा तास डान्स शिकायचे.

* तू महाराष्ट्रातील विविध शहरात कलाकारांच्या ऑडिशन्स घेतल्या आहेत. कसा एकंदर तो अनुभव होता ?

- मला चांगले डान्सर्स हवे असल्याने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ४०० च्या वर मुलांचे ऑडिशन्स घेतले. त्यातून खुप टॅलेंटेड मुलं मला मिळाली. मला वाटतं हे एक प्लॅटफॉर्म आहे चांगल्या डान्सर्ससाठी...ज्यांनी कधी सिनेमात काम केलेलं नाहीये. त्यांच्यासाठी त्यांचं टॅलेंट लोकांसमोर दाखवण्याची ही संधी आहे. अनेक नवीन कलाकार असल्याने कलाकारांना सचीन खेडेकर, गणेश यादव, अमृता खानविलकर हे कलाकार समजावून सांगायचे, मार्गदर्शन करायचे. एका फॅमिलिप्रमाणे आमचं सर्व काम चालायचं. त्यामुळे सर्वांनीच अतिशय उत्तम काम केलं आहे.

* ‘हुप्पा हुय्या’चे संगीत दिग्दर्शक अजित-समीर यांच्याकडे पुन्हा एकदा तू या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवली आहे. त्याबद्दल काय सांगशील?

- अजित -समीर या संगीतकार जोडीने अनेक मराठी चित्रपटांना उत्तम संगीत दिलं आहे. मात्र या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदाच हिप-हॉप, वेस्टर्न पद्धतीचं संगीत दिलं आहे. त्यांचं आणि माझं एक वेगळंच ट्युनिंग असल्याने परत एकदा मी त्यांच्याबरोबर काम केलंय. ते जे काही करतात ते मला हवं तसंच असतं आणि ह्या सिनेमासाठी मराठी सिनेमात कधीही न वापरलेलं संगीत हवं होतं. त्यामुळेच मी अजित-समीर बरोबर पुन्हा काम करतोय.

* वेगवेगळ्या डान्स रिअ‍ॅलिटी शोज मधीलही कलाकारांना तू यात संधी दिली आहेस, त्यांच्याबद्द्ल काय सांगशील?

- हो..! रोहन अ‍ॅन्ड ग्रुप या डान्स ग्रुपला यात मी संधी देतोय, ज्यांनी बुगी वुगी या शो मध्ये ब-याचदा विजय मिळवला आहे. सिद्धेश पै जो ‘डि आय डि’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा फायनलिस्ट होता आणि ई टिव्ही मराठीवरील ‘खल्लास एक डान्स’ या शोचा तो परिक्षकही होता. त्यालाही या चित्रपटात तुम्हाला पाहता येणार आहे. सोबतच अनेक नवीन डान्सर्स सुद्धा पहिल्यांदाच चित्रपटात काम करीत आहेत.

* यातील मुख्य कलाकार आणि तंत्रज्ञांबद्द्ल काय सांगशील ?

- एकतर राकेश वशिष्ठ पहिल्यांदाच मराठी सिनेमात काम करतोय. अतिशय हुशार आणि चांगला अभिनेता आहे तो..अमृताला तुम्ही आत्तापर्यंत लावणी करताना पाहिलंय पण या सिनेमातून ती वेस्टर्न डान्स सुद्धा करताना दिसेल. यांच्याबरोबरच सचीन खेडेकर, गणेश यादव यांनीही धमाल काम केलंय. तसेच सिनेमटोग्राफर संजय जाधव यांनी उत्तम काम केलंय. मला वाटतं की, संजयजी हे भारतातील सर्वोत्तम सिनेमटोग्राफर्स पैंकी एक आहेत. संजयजींबद्दल आणखी गोष्ट सांगायची म्हणजे ते एक उत्तम सिनेमटोग्राफर तर आहेतच शिवाय उत्तम पेंटर सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांचं व्हिज्युअलायझेनशन अप्रतिम आहे. प्रसिद्ध कोरिग्राफर उमेश जाधव यांनी या चित्रपटाची कोरिओग्राफी केलीय. त्यांच्यासोबतच रोहन रोकडे या नवीन डान्सरनेही उत्तम कोरिओग्राफी केली आहे. तर जावेद-एजाज या हिंदीतील प्रसिद्ध जोडीने या सिनेमासाठी धमाल अ‍ॅक्शन डिरेक्शन केलंय.

* तुझ्या सिनेसॄष्टीतील करिअरची सुरवात कशी झाली?

- माझे वडिल अमर कक्कड माझे आदर्श आहे. कारण, ते एक उत्तम अ‍ॅड मेकर, थिएटर पर्सन, कॉर्पोरेट फिल्म मेकर आणि सोबतच ते मराठीतील गाजलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचे निर्माते सुद्धा आहेत. मी या क्षेत्रात येण्याचं श्रेयही मी त्यांनाच देतो. ते यामुळे की, माझ्या लहानपणापासुन मी फिल्म, अ‍ॅड्स याच गोष्टी बघतो आहे. त्यांच्यामुळेच मी या इंडस्ट्रीत उभा आहे.

* मुळात एका पंजाबी कुटूंबातील असूनही मराठी सिनेमा दिग्दर्शनाकडे कसा वळलास?

-मराठी सिने इंडस्ट्रीकडे माझा रूख असण्याचं महत्वाचं कारण म्हणजे ‘बजेट’...! आजकाल असं होतंय की, ४० कोटींची फिल्म बनवली जाते पण ती चांगली असतेच असं नाहीये. मात्र मराठी इंडस्ट्रीत असं नसतं, इथला सिनेमा एक कम्प्लिट सिनेमा असतो. मराठीत सिनेमा फक्त पैसा कमवण्यासाठी तयार केला जात नाही. इथले कलाकार, इथले लोक खुप चांगले आहेत. त्यांच्याबरोबर काम करणं मला नेहमीच अभिमानास्पद वाटतं. शिवाय मराठी सिनेमाचा प्रेक्षक अतिशय सुजाण आणि हुशार आहेत. त्यामुळे इथे काम करण्याची एक वेगळीच मजा आहे.

* ‘हुप्पा हुय्या’ या तुझ्या पहिल्याच सिनेमाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला, त्यानंतर तो भारताबाहेरही दाखवण्यात आला. बीएमएम अधिवेशनात त्याविषयी कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. कसा प्रतिसाद होता तिकडच्या प्रेक्षकांचा?

- हो...! ‘हुप्पा हुय्या’ हा आम्ही दुबईत दाखवला होता. त्यानंतर बीएमएमच्या अधिवेशनात त्याचं प्रमोशन करण्यात आलं होतं. आणि तिकडे अतिशय जोरदार प्रतिसाद मिळाला. कारण, हा सिनेमा आपल्या मातीतला होता. यातील हनुमानाची भूमिका लोकांना खुप आवडली. शिवाय अकरा मारूतींच दर्शन घर बसल्या तुम्हाला करता आलं. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही जेही प्रामाणिक प्रयत्न केलेत, त्याचं फळ आम्हाला अनेक पुरस्काराच्या माध्यमातून मिळालं.

* ज्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढतोय, तसा भारताबाहेरही वाढतोय का?

- बिलकुल..! कारण आज हजारो मराठी लोक भारताबाहेर त्यांच्या नोकरी, व्यवसायासाठी जाताहेत. त्या कारणाने आज भारताबाहेर मराठी सिनेमाला एक नवीन आणि सुजाण प्रेक्षकवर्ग तयार होतोय. तिथल्या मराठी लोकांची खासियत म्हणजे ते लोक त्यांची कम्युनिटी, संस्कृती नाही सोडत. अनेक मराठी सण, उत्सवांना यांना एकत्र येता यावे, यासाठी प्रत्येक देशांमध्ये आज मराठी मंडळं स्थापन झाली आहेत. ही मंडळंही मोठ्या प्रमाणात मराठी सिनेमाला प्रमोट करतात. मराठी माणसांची हीच युनिटी आज प्रत्येक देशात दिसून येत आहे. तसेच आज भारताबाहेर मराठी चित्रपट डिस्ट्रीब्युट करणारे किंवा मराठी चित्रपट फेस्टीव्हल घेणा-या अनेक इव्हेंट्स कंपन्याही समोर येताहेत. आता तुमचीच झगमग कंपनी बघा ना, जी भारताबाहेरील मराठी लोकांपर्यंत उत्तम मराठी मनोरंजनाचा खजाना आणि चित्रपट पोहचवण्याचं काम करताहेत. त्यासाठी ‘झगमग मराठी फिल्म फेस्टीव्हल’ आणि मोठ मोठे इव्हेंट्सही तुमच्या द्वारे घेतले जातात. अशा फेस्टीव्हलमुळेच आज तिकडच्या लोकांना मायबोलीतील अनेक चांगले चित्रपट बघण्याची संधी मिळते आहे.

* ‘आयना का बायना’ चित्रपट रिलिज कधी करणार आहेस ? आणि मी असंही ऎकलंय की, या चित्रपटाचा प्रिमियर तू भारताबाहेर करणार आहेस?

- हो..! खरंतर काही भारताबाहेर असलेल्या मराठी लोकांचे मला फोन आलेत की, त्यांना भारताबाहेर या सिनेमाचा प्रिमियर ठेवायचा आहे. पण अजून त्याचं प्लॅनिंग चालू आहे. मे-जून च्या जवळपास आम्ही हा सिनेमा रिलिज करतोय.

अमित इंगोले