Sign In New user? Start here.

तुझ्या जखमा...

 
     
 

सुधीर मुळीक
 
तुझ्या जखमा...

जन्मभर तुझ्या जखमांची मी वेठबिगारी केली
या गझलांचा झालो मालक पण लाचारी केली ..

तू रोज नको कुरवाळू माझ्या कवितांचे कागद
आज पुन्हा या शब्दांनी बघ मारामारी केली ..

परतून दिली व्याजाने तू या स्वप्नांची मुद्दल
डोळ्यांनी मग झोपेशी दररोज उधारी केली ..

मी काल नव्याने लिहिले तळहातावर नाव तुझे
फ़िर्याद जुन्या घावांनी मग बारी-बारी केली ..

भेट तुझी नक्की होती, जर असता खोटा पत्ता
केला नाही शोध तुझा ही एक हुशारी केली ..

कातरवेळी येण्याची पाळत जा तू वेळ तुझी
काल अचानक डोळ्यांनी आंघोळ दुपारी केली ..

हो, नाही, बघुया, नंतर.. तू कुठलेही दे उत्तर
हार, गुलाल, रुमाल, सुरा सगळी तैयारी केली ..

लावून चुना ओठांनी चढला हा रंग विड्याला
हिरव्या हिरव्या पानाची मी पानसुपारी केली ..

ना लिहिले लिहिण्यापुरते हे आयुष्याचे गाणे
मी जिवनाची यात्रा अन जगण्याची वारी केली ..

सुधीर मुळीक, पुणे