Sign In New user? Start here.

ऋण..

 
     
 

संगीता जोशी
ऋण..
(1)

आता फक्त चोवीस तास राहिले...फक्त आजचा दिवस.... एकच दिवस... याच दिवसाची त्यानं उत्कंठेनं वाट पाहिली होती.. समजायला लागल्यापासून आणि स्वत:चं जीवनरहस्य अर्धवट कळल्यापासून ह्या एकाच दिवसाची यश वाट पाहात होता... आणि तो दिवस आता जवळ आला..... नव्हे येऊन ठेपला.. उद्या त्याचा वाढिदवस. १८ ऑक्टोबर. आणि उद्या त्याचं वय १८ वर्षे पूर्ण होणार..!....आणि मग......

पण एवढी कशाची उत्कंठा होती यशच्या मनात? १८ वर्षे पूर्ण होणार अन् तो फोर-व्हीलर चं लायसेन्स घेऊ शकणार म्हणून का? पण वाहन चालविण्याची हौस तर सोळाव्या वर्षी टू-व्हीलर मिळाली तेव्हाच पूर्ण झाली होती. १८ पूर्ण झाल्यावर मतदान करता येणार याची कसली आलीय् उत्कंठा ! त्याच्या दृष्टीने राजकारण म्हणजे चिखल होता. याला त्यात अजिबात रस नव्हता. तरीही तो १८व्या वाढदिवसाची एवढी का वाट बघत होता? कारणही तितकंच गंभीर होतं......नुसती त्याची उत्कंठा शमणार होती इतकंच नाही तर त्याचं आयुष्यच एक वळण घेणार होतं.....कुठलं वळण ? काय असणार होतं त्या वळणावर? तिथून पुढे रस्ता होता की पुढे डेड-एण्ड होता? ..... तसं असलं तर तो मागे तरी कसा फिरणार होता? काय करणार होता? ..... असंख्य प्रश्न....दिवस त्याने विचार करण्यात घालवला अन् रात्र जवळजवळ जागूनच काढली.

पहाटे पहाटे त्याचा डोळा लागून गेला.. पण मनातल्या उत्कंठेपोटी काही वेळातच जाग आली. ..तो कपाटापाशी गेला. आईने दिलेलं ते बंद पाकिट त्यानं काढलं. आईच्या प्रेमामुळेच तिला दिलेलं वचन त्यानं मोडलं नव्हतं. नाहीतर ते तो आधीच फोडू शकला असता. आता काही क्षणातच त्याच्यासमोर रहस्य उलगडणार होतं.....न राहवून त्यानं पाकिट फोडलं. आत त्याच्यासाठी एक १०-१२ ओळींचीच चिठ्ठी होती. व सोबत आणखी एक बंद पाकिट.

ब़ाळ यश, मला माहित आहे, तू उत्सुकतेनं हे पाकिट फोडशील. ..पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी नाही रे देऊ शकणार. तुझे वडील कोण ? त्यांचं नाव काय ? हेच आहेत ना तुझे प्रश्न ? पण त्यासाठी तुला आणखी थांबावं लागेल.'

म्हणजे काय? आईचे अनेकांशी .......? ती माझ्या वडलांचे नाव का सांगू शकत नाही? यशचं मन पत्र पुढे वाचण्याआधीच पेटून उठलं. मग माझं नाव यश किरण वडनेरे असं का लावलं? किरण वडनेरे कुठे आहेत? मला त्यांना भेटायचंय्... यशचं मन धावत होतं..

मधे एक-दोन क्षणच गेले असतील, तेवढ्यात यशच्या मनात काहूर माजलं..... तो पुढे वाचू लागला. ‘मी नाव का सांगू शकणार नाही , असा प्रश्न पडला ना तुला? त्याचं उत्तर कळण्यासाठी तुला डॉ.खांबेटे यांची भेट घ्यावी लागेल. मला माहीत होता, तो त्यांचा पत्ता मी खाली दिला आहे. फोन नंबरही आहे. तू त्यांच्याशी बोल. तुला सारं काही समजेल. मला खात्री आहे, तू मला समजून घेशील. तरीही मी तुझी अपराधी आहे असं तुला वाटत असेल तर, मला क्षमा कर.'-तुझी, आई. सहीखाली खूप जुनी तारीख होती.

पाकिटाची घडी करून ते खिशात ठेवण्यापूर्वी यशने तो मोबाईल फोन नंबर लावला.
‘डॉक्टर खांबेटे का?'
‘राँग नंबर ! 'म्हणून फोन बंद झाला. दोन-तीन वेळा यशनं काळजीपूर्वक नंबर लावला. आता समोरची व्यक्ती वैतागून म्हणाली, ए।।, तुला किती वेळा सांगितलं राँग नंबर म्हणून ! ठेव आता....'

यश मनातून चिडला. आता ऍक्टिवा काढून पत्ता शोधणं भाग होतं. शहराच्या जुन्या भागातला तो पत्ता होता. ह्या भागात राहणाऱया डॉक्टरकडे का आली होती आई? आणि त्यांना कसं माहीत असणार माझं जन्मरहस्य? ते आईचे नातेवाईक होते की कोण होते? पण आम्हाला तर नातेवाईकच नाहीत ! आई म्हणायची तिचे आई- वडील तिच्या लहानपणीच गेले..मला मामा-मावशीही नाही.....आणि कधी काका- आत्याही असल्याचं ऐकलं नाही....यशच्या मनातला गुंता वाढत होता.....

--आणि अचानक समोर पाटी दिसली. अश्विनी हॉस्पिटल. डॉ.खांबेटे. यश एकदम उल्हसित झाला. आत शिरताच काउंटरपाशी जाऊन त्यानं विचारलं,

‘मला डॉक्टर खांबेटेंना भेटायचंय्. कुठे आहेत ते ?'
जोरजोरात श्वास चालल्यामुळे त्याचे शब्द धाप लागल्यासारखे येत होते.
‘अरे, ! जरा हळू ! समोरची प्रौढ सिस्टर म्हणाली. डॉक्टर पराग तुला संध्याकाळी भेटतील.'
‘ते नाहीत हो , मला एन्. पी. खांबेटे हवे आहेत, कुठैत ते ? '
‘मोठे डॉक्टर आता हॉस्पिटलला येत नाहीत. त्यांचा मुलगा डॉक्टर पराग. तेच बघतात सगळे पेशंट्स्.'

‘नाही हो, मला काही करून त्यांनाच भेटायचंय्.' यश पुढे अडखळत राहिला.

‘मला सांग, तुला काही होतंय् का? डॉक्टर पराग बघतील ना तुला संध्याकाळी. ते जनरल पेशंटही बघतात.'

‘नाही हो, मला काही होत नाहीए. पण मला डॉक्टर एन.पी. खांबेटेंना भेटायचंय्. फार महत्त्वाचं काम आहे हो. कुठे आहेत ते ? मला त्यांचा घरचा पत्ता सांगा ना.....माझं त्यांच्याकडेच काम आहे. '

काकुळतीला येऊन यश सिस्टरना विनवीत होता. शेवटी सिस्टरनी एक कार्ड दिलं. त्यावर डॉक्टरांचा घरचा पत्ता होता.....

यशची ऍक्टिवा बंगल्याच्या बाहेर उभी राहिली. त्याचे पाय जमिनीवर ठरत नव्हते. लोखंडी गेटची कडी काढून तो आत जाणार तेवढ्यात मोठा कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. पण सुदैवाने कुत्रा साखळीने बांधलेला होता.

कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने एक गृहस्थ बाहेर आले. पांढरा शुभ्र पायजमा, पांढरा हाफ कुर्ता पायात संडलवजा पांढऱया सपाता, गोरापान चेहरा आणि डोळ्यावर चष्मा..... हेच डॉक्टर खांबेटे असावेत, यशने ताडलं.....

‘आपणच डॉक्टर एन. पी. खांबेटे ना? सीनियर खांबेटे ?'
हो, मीच. काय काम आहे?' हे बोलतांनाच यशला पाहून डॉक्टराच्या मनात कुठलेतरी संदर्भ जुळत चालले होते. यशने नाव सांगताच कॅमेऱयाचं दृष्य फोकस व्हावं तसा त्यांना भूतकाळ आठवू लागला. ते मनात म्हणाले, आता मी ओळखलंच. हा तर अगदी वडलांसारखाच हँडसम, रुबाबदार दिसतोय्....

मला तुम्हालाच भेटायचंय्. आज मी अठरा वर्षांचा झालोय्.... आईनं ही चिठ्ठी दिलीय् तुमच्यासाठी. माझ्या पाकिटात हे दुसरं पाकिट होतं. मला आईनं फक्त तुम्हला भेट, एवढंच लिहिलं आहे..'
यशनं बंद पाकिट त्यांच्यासमोर धरलं.
‘डॉ. एन.पी. खांबेटे.' डॉक्टरांनी वरचं नाव मनातच वाचलं आणि पाकिट फोडून ते वाचू लागले. पाच मिनिटातच ती पूर्ण करून त्यांनी यशला आत बोलावलं.....

‘बस; तू यश ना? यश किरण वडनेरे ?'
‘हो. तोच मी. माझी आई तुमची पेशंट होती का ? तुम्ही नातेवाईक आहात का आमचे?? की.....'
थांब, सांगतो..सांगतो.. तुझा जन्म माझ्याच हॉस्पिटल मधे झालाय्..म्हणजे तुझे आई माझी पेशंटच होती. अधूनमधून यायची भेटायला. तुला मी फार लहान पाहिलं होतं. त्यानंतर इतक्या वर्षांनी पाहातोय्..पण तू एक दिवस येणार हे माहित होतं.....'थोडं थांबून ते पुढे म्ह़णाले, तुझ्या आईचा अपघाती मृत्यू झाल्याचं पेपरमधे वाचलं होतं मी... पण मग तुझ्याकडे कोण बघत होतं ?'

‘आईनं मला हॉस्टेललाच ठेवलं होतं..पैशाची व्यवस्थाही तिनंच करून ठेवली होती. तसं मला, ती असतांनाच लहानपणापासूनच जाहिरातीत मॉडेलिंगची कामं मिळत होती... अजूनही मिळतात... त्यावर चालतं.. आमची दोन खोल्यांची जागा होती तिथं मी आता राहतो. मित्राचे वडील मार्गदर्शन करतात....'

यशला अशा गप्पांमध्ये रस नव्हता..तो उतावीळ झाला होता. त्यामुळे स्वत:बद्दल त्यानं भराभर सांगून टाकलं.
सांगा ना, माझे वडील किरण वडनेरे , कुठे असतात ते? तुम्ही ओळखता त्यांना? ते मला भेटतील ? पण इतकी वर्षं त्यांनीही का नाही आमचा शोध घेतला ?'
‘थांब, सगळं सांगतो. आता तू अठरा वर्षांचा झाला आहेस , तेव्हा तुला ही माहिती कळणं हा तुझा कायदेशीर हक्कच आहे. आधी तुझ्या आईबद्दल सांगतो. तुझ्या आईचं म़ूळ नाव मनीषा. हे नाव तुला अपरिचित असणार. कारण पुढे तिनं सोयीसाठी नाव बदलून घेतलं बिचकू नकोस. मी सांगतोय् ते लक्षपूर्वक ऐकून घे. तुझी आई एका अनाथालयात वाढली. तुला कोणीच नातेवाईक नाहीत याचं कारण की, तुझ्या आईला, तिच्या आईनं जन्मत:च रस्त्याच्या कडेला टाकून दिली होती. त्याचं कारण काय असेल ते असो... कुणीतरी ते बाळ अनाथालयात पोहोचवलं. तिथं तिचं नाव मनीषा ठेवलं होतं.त्या गावात ती मोठी झाली .. थोडीफार शिकली.. फार शिकली नसली तरी तिचं वाचन अफाट होतं. मुळात हुषार होती..इथे शहरात आल्यावर माझ्या हॉस्पिटलमधे कामाला लागली होती. कामाला चोख.. कधी चुकारपणा नाही..कंटाळा नाही..तिला कोणीच नसल्याकारणानं ती हॉस्पिटलमधेच रहायची. बाळंतिणींची सेवा कारायची.......'

‘आता बाकीचा इतिहास जाऊ दे..... मुद्याचं सांगतो. एकदा मला म्हणाली,
डॉक्टर मला देखील एखादं मूल व्हावंसं मला वाटतं..'
‘अगं, मग लग्न करून टाक.. मी पाहतो तुझ्यासाठी चांगलं स्थळ.'
‘नको डॉक्टर. मी अशी अनाथालयात वाढलेली. कोण करणार माझ्याशी लग्न ? ना आगा..ना पीछा..ना घराण्याचं नाव.. त्यापेक्षा.....' ती अडखळली.
त्यापेक्षा काय? लग्न न करताच मूल कसं मिळणार तुला? हां , दत्तक घेऊ शकतेस ..'
पण दत्तक घेतलं तर माझ्या पोटचं, माझ्या रक्तामासाचं मूल नाही मिळणार मला.. मी अशी.. अनाथ.. निदान मूल तरी माझं स्वत:चं असावं.. इन्सेम्नेशन बद्दल मी इथंच ऐकलंय्... तुम्ही त्या एका डॉक्टरांशी बोलतांना... त्या पध्दतीनं मिळेल की मला माझं मूल.....'

मला हे अनपेक्षित होतं. मी म्हटलं, मी विचार करतो.
‘एकदा असं बोलणं झाल्यावर ती मला अधून मधून विचारायची, &डॉक्टर, तुम्ही काय ठरवलंत माझ्याबाबतीत ?'

पुढील पानावर >>