Sign In New user? Start here.

ज्वलंत विषयावरील संवेदनशील नाटक “अ‍ॅग्रेसिव्ह”

 
 

ज्वलंत विषयावरील संवेदनशील नाटक “अ‍ॅग्रेसिव्ह”

सध्या अनेक बोल्ड नाटकं रसिकांसमोर येत आहेत. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. पण नाटकं बोल्ड असणं पुरेसं नसतं. त्याचा आशय, विषय हा ही तितकाच सखोल असावा लागतो. तरच त्यातला सामाजिक आशय लोकांपर्यंत पोहोचतो. मल्हार निर्मित व साई एंटरटेनमेंट प्रस्तुत, निर्माते जे. विष्णु यांचं “अ‍ॅग्रेसिव्ह” हे अशाच एका सामाजिक आशयावरील नाटक दि. ८ फेब्रुवारी रोजी रंगमंचावर येत आहे. एक अ‍ॅग्रेसिव्ह पण तितकंच विचार करायला लावणार्‍या हया संगीतमय आशयघन नाटकाचे लेखन निनाद शरद शेटये यांचे असून दिग्दर्शन सुनील नाईक यांनी केले आहे तर निर्मिती प्रमुख संतोष वाजे हे आहेत.

सहज उपलब्ध होणार्‍या बीपीच्या सीडी, इंटरनेटवरील अश्लील वेबसाइटस, एमएमएस यासारख्या आधुनिक तंत्राच्या सहाय्याने आजची तरुणाई आहारी गेली आहे ही प्रसार माध्यमातून रोजच्या रोज समोर येत आहे. हयाचा गांभिर्याने विचार व्हायला हवा. याचा नेमका परिणाम काय ? यावर “अ‍ॅग्रेसिव्ह” प्रभावीपणे भाष्य करते. पहाणार्‍याला अंतर्मुख करून विचार करायला लावणार्‍या या नाटकातून एक अतिशय प्रभावशाली संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

“अ‍ॅग्रेसिव्ह” हया नाटकाची कथा आहे रंजन या तरुणाची. एका सुसंस्कृत, सोज्वळ, खानदानी तरुणीशी त्याचा विवाह होतो. पण नेटसर्फिंग आणि अश्लिलतेच्या आहारी गेलेला रंजन तिच्यावर अत्याचार करतो. त्यानंतर काय होत याचं प्रत्ययकारी चित्रण हया नाटकातून करण्यात आले आहे. संतोष वाजे निर्मिती प्रमुख असलेल्या हया नाटकात दोन गाणी असून ती अमोल कांबळे यांनी संगीतबद्ध केली आहेत. या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन राहुल काळे यांनी केले आहे. पार्श्वसंगीत आशीष केळकर, नेपथ्य अशोक पालेकर, रंगभूषा जगदीश शेळके, वेशभूषा स्वाती पाटील तर संदीप दळवी हे सुत्रधार आहेत. या नाटकात गौरी पाटील, संध्या कुठे, वैभव सातपुते आणि मौसमी तोंडवळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.