Sign In New user? Start here.

डॉ. अमोल कोल्हे निर्मित बंध-मुक्त रंगभूमीवर

 
 

डॉ. अमोल कोल्हे निर्मित बंध-मुक्त रंगभूमीवर

मृत्यू हे अंतिम सत्य असले तरी त्यावरील चर्चा अनेकांना नकोशीच असते. मृत्यूबद्दल अनामिक भीती प्रत्येक सजीवाच्या मनात कायम असते. त्यामुळे जगण्याच्या इच्छेने आणि इर्षेने प्रवास करणाऱ्यांना इच्छामरण हा विषयही वर्ज्य वाटतो. असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला रोज मरण यातना भोगण्यापेक्षा इच्छामरण हे नेहमीच सोयीचे वाटते. परंतु आपल्याकडे कायदेशीररित्या त्याला संमती नसल्याने जगणेही सक्तीचे झाले आहे. इच्छामरण या गंभीर सामाजिक विषयावर अभिनेते डॉ. अमोल कोल्हे ‘बंध-मुक्त’ हे नवकोरं नाटक घेऊन येताहेत. विशेष म्हणजे अभिनयासोबत या नाटकाच्या निर्मितीत देखील डॉ. अमोल कोल्हे यांचा सहभाग आहे.

एरव्ही चित्रपटांचा प्रिमिअर आपल्याला माहीत आहे. परंतु रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच ‘बंध-मुक्त’ नाटकाचा शुभारंभ धमाकेदार प्रिमिअर सोहळ्याने होतोय. शुक्रवार १२ ऑगस्टला रविंद्र नाट्य मंदिर येथे सायंकाळी ७.३० वा. ‘बंध-मुक्त’ नाटकाचा प्रिमिअर आयोजित करण्यात आला असून सिनेनाट्य, वैद्यकीय, राजकारण, साहित्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची यावेळी आवर्जून उपस्थिती असणार आहे. मराठी रंगभूमीवरील नक्कीच हा एक अनोखा प्रयोग ठरणार आहे.

‘जगदंब क्रिएशन्स’ निर्मित, ‘तिरकिटधा’ प्रस्तुत ‘बंध-मुक्त’ नाटकाचे दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर करीत आहेत. ‘बंध-मुक्त’ या नावावरूनच हे नाटक काहीतरी निराळं असणार याची कल्पना येत असली तरी त्याचे सादरीकरण वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. इच्छामरण या सारख्या गंभीर विषयावर यात प्रामाणिकपणे चर्चा करण्यात आली आहे. एक सर्जन, त्याची गुन्हेगारांच्या मानसशास्त्रात डॉक्टरेट असलेली बायको, एक वकील आणि एक मानवी हक्क चळवळीची लीडर या चौघांमध्ये घडून आलेली वैचारिक चर्चा म्हणजे ‘बंध-मुक्त’ हे नाटक. यात कोणाभोवती बंध आवळले जाऊन तो बंदिस्त होणार आणि कोणाभोवतालचे पाश मोकळे होऊन तो मुक्त होणार हे नाटकं पहाताना उलगडेल.

डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव यांची निर्मिती असलेल्या ‘बंध-मुक्त’ नाटकाची सहनिर्मिती डॉ. अजित देवल यांनी केली आहे. केतकी थत्ते, राजन बने, शंतनु मोघे, विवेक आपटे, पंढरी मेदगे, लतिका सावंत आणि डॉ. अमोल कोल्हे अशी स्टारकास्ट यात एकत्र आली आहे. विवेक आपटे यांनी ‘बंध-मुक्त’ नाटकाचे लेखन केले असून राहुल रानडे यांनी पार्श्वसंगीताची साथ दिली आहे. प्रकाश योजना शीतल तळपदे तर नेपथ्य राजन भिसे करणार आहेत. वेगळ्या कथाविषयावरील हे नाटक प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरणारं ठरेल.

----------